स्पेनचा मध्यफळीतील २८ वर्षीय खेळाडू जोर्गे मेंडोझाने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवाने महत्त्वाच्या सामन्यात जमदेशपूर एफसी संघावर ३-० अशी एकतर्फी मात करीत हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल गुरुवारी सफाईदार विजय मिळविला. बाद फेरीच्यादृष्टिने गोव्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरेल.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्य फळीतील स्पेनचा २८ वर्षीय खेळाडू जोर्गे मेंडोझा याने गोव्याचे खाते १९व्या मिनिटाला उघडले. मग ५२व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल केला. एक मिनिट बाकी असताना बचाव फळीतील स्पेनचा ३० वर्षीय खेळाडू इव्हान गोंझालेझ याने संघाचा तिसरा गोल केला.
गोव्याने ११ सामन्यांत पाचवा विजय नोंदविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १८ गुण झाले. हैदराबाद एफसीला मागे टाकून गोव्याने तिसरा क्रमांक गाठला. हैदराबादचे १० सामन्यांतून चार विजयांसह १५ गुण आहेत. या लढतीआधी गोवा आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी १५ गुण होते. दोन्ही संघांचा गोलफरकही दोन असा समान होता. त्यात हैदराबादचे दोन गोल जास्त होते. अर्थात हैदराबादचा एक सामना कमी झाला आहे.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या गोव्याला मागील लढतीत एससी ईस्ट बंगालविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. याआधीच्या चार लढतींत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळविता आले नव्हते. त्यामुळे हा निकाल त्यांच्या आक्रमक शैलीला साजेसा आणि चाहत्यांसाठी स्वागतार्ह ठरला.
इंग्लंडच्या ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या जमशेदपूरसाठी बाद फेरीच्यादृष्टिने हा निकाल प्रतिकूल ठरला. ११ सामन्यांत त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण कायम राहिले, मात्र मोठ्या फरकाने हरल्यामुळे गुणतक्त्यात त्यांची एक क्रमांक खाली घसरण झाली. आता त्यांचा सातवा क्रमांक आहे. बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकावर जमशेदपूरला मागे टाकले. बेंगळुरूचा गोलफरक उणे १ (१३-१४), तर जमशेदपूरचा उणे ३ (१२-१५) असा आहे.
मुंबई सिटी एफसी १० सामन्यांतून आठ विजयांसह २५ गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसर्या क्रमांकावर असून १० सामन्यांत सहा विजयांसह त्यांचे २० गुण आहेत.