भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी आजपासून

0
195

>> संघ समतोलासाठी टीम इंडियाची कसरत

>> शार्दुल ठाकूरला मिळणार संधी

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा व निर्णायक सामना आजपासून खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांनंतर उभय संघ १-१ असे बरोबरीत असल्याने या सामन्याचा विजेता मालिका विजयाचा मानकरी ठरणार आहे.
‘गॅब्बा’ हा ऑस्ट्रेलिया अभेद्य किल्ला मानला जातो. या मैदानावर त्यांचा कसोटीतील रेकॉर्ड २४-० असा आहे. त्यामुळे भारताची खर्‍या अर्थाने या मैदानावर कसोटी लागणार आहे.

भारतीय संघासमोर दुखापतींचे संकट असले तरी आपल्या झुंजार व लढवय्या वृत्तीने टीम इंडियाने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. तिसरी कसोटी अनिर्णीत राखताना विहारी व अश्‍विनने केलेली धीरोदात्त फलंदाजी तसेच पुजारा व पंत यांची फलंदाजी भारतासाठी तारणहार ठरली होती. दुखापतीमुळे विहारी चौथ्या कसोटीला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दलही प्रश्‍नचिन्ह असून अश्‍विनही पाठदुखीने बेजार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर ‘अंतिम ११’ निवडताना डोकेदुखी वाढली आहे. विहारीच्या जागेसाठी मयंक अगरवाल, वृध्दिमान साहा हे प्रमुख दावेदार आहेत. फॉर्मचा विचार केल्यास पृथ्वी शॉचा विचार केला जाणार नाही. अश्‍विन खेळू न शकल्यास संघातील उर्वरित एकमेव फिरकीपटू कुलदीप यादव संघात येऊ शकतो. अष्टपैलू रवींद्र जडेजाची संघातील जागा जलद मध्यमगती गोलंदाज तसेच तळातील उपयुक्त फलंदाज शार्दुल ठाकूर घेणार आहे. ठाकूरच्या समावेशाने संघ अधिक समतोल होणार आहे. बुमराह फिट न ठरल्यास टी. नटराजन कसोटी पदार्पण करणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केल्यास सलामीवीर विल पुकोवस्की दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची जागा मार्कुस हॅरिस याने घेतली आहे. २०१९ ऍशेसनंतर त्याचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. हॅरिसमुळे दोन डावखुरे फलंदाज कांगारूंच्या डावाची सुरुवात करताना दिसतील. हा एकमेव बदल वगळता संघात अन्य बदल संभवत नाही. स्टीव स्मिथला पुन्हा गवसेला फॉर्म व मार्नस लाबुशेनचे सातत्य ही ऑस्ट्रेलियाची बलस्थाने असून डेव्हिड वॉर्नरच्या फलंदाजीवर त्यांना सुरुवात कशी मिळते हे अवलंबून असेल. कर्णधार व यष्टिरक्षक टिम पेन याची तिसर्‍या कसोटीतील ढिसाळ कामगिरी चर्चेेचा विषय ठरली होती. त्यामुळे त्याला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. फिरकीपटू नॅथन लायनचा हा शतकी कसोटी सामना असेल. ४०० कसोटी बळींसाठी त्याला केवळ चार बळी हवे आहेत. त्यामुळे हा मैलाचा दगड ओलांडण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्‌ट्यांमध्ये ब्रिस्बेनचा समावेश होतो. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांचे नंदनवन मानली जाते. ढगाळ वातावरण व पावसाची शक्यतादेखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारताने पाच पराभव व एक अनिर्णीत असे प्रदर्शन ‘गॅब्बा’च्या या मैदानावर केले आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानावरील पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असेल.