>> मुख्यमंत्र्यांची माहिती
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना नवी दिल्ली येथील एम्स इस्पितळात हालविण्याची गरज नाही. नवी दिल्लीतील एम्स इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केंद्रीय मंत्री नाईक यांच्यावरील वैद्यकीय उपचारांचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
उत्तर कर्नाटकात कार अपघातात जखमी झाल्यानंतर आयुषमंत्री नाईक यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. नाईक यांच्यावरील वैद्यकीय उपचारांचा आढावा घेण्यासाठी एम्स इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे. श्रीपाद नाईक यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत, त्यांना नवी दिल्ली येथील एम्स इस्पितळात हालविण्याची गरज नसल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
एम्स इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दोन दिवस श्रीपाद नाईक यांच्यावरील वैद्यकीय उपचारांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. श्रीपाद नाईक यांच्यावरील उपचारांबाबत एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
विजया नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार
उत्तर कर्नाटकातील गोकर्णानजीक हिल्लूर-होसकांबी गावात गेल्या ११ जानेवारीला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारगाडीला झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या पत्नी सौ. विजया ऊर्फ तिलोत्तमा श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर आज गुरुवार दि. १४ जानेवारी रोजी आडपई फोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केंद्रीय मंत्री नाईक यांच्यावर गोमेकॉमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
गुरूवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत विजया नाईक यांचे पार्थिव त्यांच्या सापेंद्र रायबंदर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी आडपई येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी सकाळी ९.३० ते १२ यावेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन पुत्र सिद्धेश, साईश, योगेश, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.