महापौरपदी पुन्हा फुर्तादोच

0
76

सुरेंद्र फुर्तादो यांचीच काल पणजीच्या महापौरपदी फेरनिवड झाली. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजप गटाचे उमेदवार रुपेश हळर्णकर यांचा १७ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदासाठी एकाही नगरसेवकाने उमेदवारी अर्ज न भरल्याने विद्यमान उपमहापौर लता पारेख यांची बिनविरोध फेरनिवड झाली. यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, बाबुश मोन्सेर्रात व पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांचे आभार मानले.

कचरा प्रकल्प उभारणार
यावेळी आपण कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे व सांतइनेज नाल्याची साफसफई या कामांना विशेष प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा सरकारकडून महापालिका कर्मचार्‍यांसाठी वेतन अनुदानासाठीचे १५ कोटी रु. अपेक्षित आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेला द्यायचे असलेले हे वेतन अनुदान आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे महापालिकेला देतील, असा विश्‍वास यावेळी फुर्तादो यांनी व्यक्त केला.

नगरपालिकांना अधिकार द्या
केरळ सरकारने घटना दुरुस्तीद्वारे राज्यातील नगरपालिकांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार दिलेले असून राज्याच्या अर्थसंकल्पातील ४० टक्के एवढा निधी नगरपालिकांना दिला आहे. गोवा सरकारनेही नगरपालिकांना तसे हक्क द्यावेत, अशी मागणी यावेळी फुर्तादो यांनी केली. सरकारने जिल्हा नियोजन समित्याही बळकट करण्याची सूचना त्यांनी केली. जर महापालिकेला सरकारकडून आवश्यक तेवढा निधी मिळाला नाही तर महापालिकेला आपल्या करांत वाढ करा लागेल, असे संकेतही यावेळी फुर्तादो यांनी दिले.