ब्रिक्स काळातील अन्न घोटाळ्याच्या सविस्तर चौकशीचा सरकारला आदेश

0
63

गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेच्यावेळी जो अन्न पदार्थ घोटाळा झाला त्याची स्वतंत्रपणे सविस्तर चौकशी करण्यात यावी असा आदेश निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. डी. साळकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मानवी हक्क आयोगाने काल गोव्याच्या मुख्य सचिवांना दिला.

आमोणकर क्लासिक कॅटरर्स यांना ब्रिक्स परिषदेच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना जेवण देण्यासाठी ५१ लाख ६० हजार रु.चे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी एका अन्य कंत्राटदारांकडून सदर काम करून घेतले. मात्र, त्या कंत्राटदाराने वेर्णे येथील दफनभूमीजवळील उघड्यावर हे अन्य पदार्थ तयार केल्याचा तसेच त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करून ऍड्. आयरीश रॉड्रिग्ज यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती.
मुख्य सचिवांनी याविषयीचा आपला अहवाल येत्या ३० दिवसांच्या आत द्यावा, अशी सूचनाही आयोगाने केली आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी होणार आहे. पोलीस हेही माणूसच असून सरकारवर जेव्हा जेव्हा त्यांना अन्न पदार्थ पुरवण्याची वेळ येते तेव्हा त्यांना चांगले व स्वच्छ वातावरणात बनवलेले अन्न पुरवण्यात यावे, अशी मागणी आपण वेळोवेळी सरकारकडे केली होती, असेही ऍड्. रॉड्रिग्ज यांनी यावेळी न्यायालयाच्या नजरेस आणून दिले.