त्या’ कॉंग्रेस नेत्यांवर कारवाई करावी

0
53

>> विश्‍वजित राणेंचे राहुल गांधींना पत्र

 

गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्वाधिक १७ आमदार निवडून येऊनही पक्षाचे जबाबदार नेतृत्व सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने नाराज बनलेले आमदार विश्‍वजित राणे यांनी या अपयशास कारणीभूत ठरलेल्या कॉंग्रेस नेत्यांवर कारवाईसाठी थेट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
विश्‍वजित राणे यांनीच ही माहिती काल पत्रकारांना दिली. कॉंग्रेसकडे स्वतःचे १७ आमदार असूनही केवळ विधीमंडळ नेता निवडण्यासाठीच या कामाची जबाबदारी असलेल्या नेत्यांनी दोन दिवसांचा वेळ वाया घालवला. त्यामुळे बहुमताची संख्या प्राप्त करून सरकार स्थापनेचा दावा विरोधी भाजपच्या आधी करण्याची संधी हुकली असे राणे यांनी सांगितले. संबंधितांची ही कृती अत्यंत बेजबाबदारपणाची व गैर व्यवस्थापनाची असल्याचे ते म्हणाले.
सरकार स्थापनेची जबाबदारी असलेले हे कॉंग्रेसचे नेते अनुभवी असूनही त्यांना सरकार घडविण्यासाठी नेमके काय करायचे ते समजलेच नाही. तर मनोहर पर्रीकर दिल्लीहून आले व तातडीने त्यांनी सर्व संबंधितांशी संवाद साधत सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या २१ आमदारांची जमवाजमव केली याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ज्या रितीने संबंधित कॉंग्रेस नेत्यांनी हाती आलेली सुसंधी घालवली ते पाहिल्यास त्यांना गोव्यात कॉंग्रेसचे सरकार आलेले नको होते असेच आपल्याला वाटते असे राणे म्हणाले.
या पार्श्‍वभूमीवर आपण राहुल गांधींना भेटणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय (पक्षात राहण्याबाबत) घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पत्राला गांधी यांनी प्रतिसाद न दिल्यास आपण पक्षासाठी लायक नाही असे समजेन अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.