- संगीता अभ्यंकर, फोंडा
जीवशास्त्र शिक्षक, लेखक आणि निवेदक
वेगवेगळ्या पालकांचा जनुकीय वारसा घेऊन आलेली मुले मातृछायातल्या संस्कारांच्या मुशीत घडतात आणि इथल्या संस्कारांची परंपरा त्यांच्या वर्तणुकीतून पुढे नेताना दिसतात. अधिजनुकशास्त्राच्या भविष्यातील प्रगतीतून मानसिक जडणघडण, मानवी उत्क्रांती, रोगराई यावर प्रकाश पडेल. परंतु इथे मला आवर्जून जाणवते ते या शास्त्राचे मातृछायातील मुलांमधले दृश्य स्वरूप! संस्कारांचे बालसंगोपनातील महत्त्व इथे नक्कीच अधोरेखित होते!
सकाळी सकाळी ‘अधिजनुकशास्त्र’ (एळिसशपशींळली) या नव्याने विकसित होत असलेल्या शास्त्राबद्दल वाचत बसले तेव्हा समोरच ठेवलेल्या मातृछाया ट्रस्टच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर गेली. ९ जानेवारीला होणार्या बालिका कल्याण आश्रमाच्या प्रशस्त आणि सुसज्ज प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमाला जायलाच हवं याची मनाने नोंद घेतली आणि पुन्हा ‘एपिजेनेटिक्स’ वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता नकळत माझ्या मनात मातृछायातील अनाथ आणि निराधार बालकांचे केले जाणारे संगोपन आणि अधिजनूकशास्त्राची कार्यपद्धती (शळिसशपशींळल ाशलहरपळीाी) यांची तुलना सुरू झाली. मनातली ही विचारशलाका, तुलनात्मक निरीक्षणे आणि विश्लेषण आता कागदावर उतरवलेच पाहिजे असे तीव्रतेने वाटू लागले आणि माझे व्हॉईस टायपिंग सुरू झाले.
मातृछाया हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे तिथून सुरुवात करते आणि नंतर अधिजनूकशास्त्राकडे वळते. मातृछाया ही संस्था म्हणजे गोव्यातच नाही तर देशभरातील सेवाकार्यांमध्ये आदराने घेतले जाणारे एक नाव! १९७६ साली रुजलेल्या सेवाकार्याच्या या छोट्याशा बीजाचा आज महाकाय वटवृक्ष झाला आहे. याच्या पारंब्या संपूर्ण गोवाभर आपल्या विविध सामाजिक प्रकल्पांच्या रूपात पसरल्या आहेत. ४४ वर्षांपूर्वी एका अनाथालयापासून सुरू झालेल्या कार्यात आज अनेक नव्या प्रकल्पांची भर पडली आहे. तळावली आणि मडगावचे बालकल्याण आश्रम, कालापूरचे रूग्णाश्रय, गोमेकॉ इस्पितळ आणि म्हापशातील अझिलो इस्पितळ येथील रुग्णसेवा केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे, जयपूर फूट केंद्र, मॅमोग्राफी केंद्र, फिजिओथेरपी केंद्र, गृह परिचारिका केंद्र, संस्कार वर्ग इत्यादी.
मातृछायातील बालिकांच्या सर्जन प्रक्रियेला चालना देणारे खेळ घेण्यासाठी मी वीसेक वर्षांपूर्वी तिथे जाऊ लागले आणि माझी नाळ मातृछायाशी जोडली गेली. त्यानंतर माहिती पत्रके व मुखपृष्ठांचे डिझाईनिंग, त्यासाठी लिखाण, अखिल भारतीय अर्भकालय परिषदेचे दस्तऐवजीकरण आणि संस्थेच्या पस्तीस वर्षांच्या कार्यकालावर संशोधन करून एका लघुपटाची निर्मिती अशा अनेक प्रकारे माझे अल्प स्वरूपातील योगदान देण्याची संधी मला मातृछाया कार्यकारिणीने वारंवार दिली.
मातृछायेचा मायेचा पदर हा नीतिमूल्ये आणि सद्वर्तनाच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेला आहे याची प्रचिती इथल्या बालकांच्या सहजसुंदर आणि सुसंस्कृत वागणुकीतून आपल्याला येते. मातृछायेत पहिल्यांदाच येणार्या पाहुण्यालाही लगेच भावतो तो इथल्या मुलींच्या व्यक्तित्वातील आत्मविश्वास, सहज संवाद साधण्याची हातोटी आणि मोठ्यांना मान देणारी त्यांची वर्तणूक! या मुलांच्या दैनंदिन जगण्याला एक विलक्षण सुंदर लय आहे, ही लय आपल्या घरांमधून हरवत चाललीय की काय असाच प्रश्न बरेचदा पडतो. सकाळी लवकर उठून एकत्रितपणे प्रार्थना आणि योगासने करून, आरोग्यदायी नाष्टा करून, नीटनेटके तयार होऊन शाळेत गेलेल्या मातृछायाच्या लेकी दुपारी घरी येतात; तेव्हा गरमागरम सुग्रास भोजन त्यांची वाट पाहत असते. ‘वदनी कवळ घेता’ म्हणून जेवणार्या मुलींना वाढण्यासाठी काही जणी मागे थांबतात. थोड्याशा विश्रांतीनंतर मुली आपापल्या गृहपाठ-शिकवण्या उरकतात. मग मात्र त्या फुलपाखरांसारख्या विहार करू लागतात. कोणी अंगणात खेळायला पळतात, तर कोणी आवडीनुसार संगणक कक्षात किंवा वाचनालयात जातात. सांजवेळी तुळशीजवळ दिवा लागला की ही पाखरं घरट्यात परततात. सगळ्यांचा हलका नाश्ता झाला की प्रशस्त माजघरातील देवघरासमोर सगळ्या पुन्हा सायंप्रार्थनेला एकत्र जमतात. श्लोक, स्तोत्रपठण, पाढे म्हणणे झाले, की गोष्टी सांगणे, कोडी घालणे, गाणी म्हणणे अशी गंमत जंमत सुरू होते. कधी एकमेकींच्या खोड्या काढल्या जातात, लटकी भांडणे होतात आणि मिटतातही! तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ होते आणि जेवून सगळ्या चिमण्यांची निजानीज होते. अगदी सख्ख्या भावंडांसारखे त्यांच्यातील हे रेशिमबंध मातृछायेच्या घरातील खुल्या, प्रेमळ वातावरणाची साक्ष देतात.
सहवास, सहकार्य आणि सहवेदनेचे संस्कार हीच इथल्या मुलींना मिळणारी शिदोरी! अगदी घरच्यासारखी कामात मदत करणार्या आणि एकमेकांची काळजी घेणार्या या मुलींना पाहून मन प्रसन्न होते. स्वयंपाकघरात रत्नाताईंना मदत करणे, लहान बाळांसोबत खेळणे, त्यांची काळजी घ्यायला शिकणे, आल्यागेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायला हातभार लावणे, कोणी आजारी पडलं तर दादा किंवा मावशींसोबत दवाखान्यात जाणे, अशी सगळी मदत आळीपाळीने या मुली करतात. इथल्या कार्यकर्त्यांशी जुळलेले त्यांचे भावबंध त्यांना काका-मामा, मावशी-आत्या, ताई-दादा, आजी-आजोबा अशी सगळी नाती मिळवून देतात.
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आयुष्याला भिडण्याची तयारी या मुलींकडून नकळत करून घेतली जाते. जीवनानुभव आणि समाजात मिसळण्याच्या अनेक संधी बालकांना मिळतात. मोठ्या बहिणीचा विवाहसोहळा, नव्याने घरात आलेल्या बाळाचे बारसे, दत्तक विधानाचा हृद्य प्रसंग, सण-उत्सव, मातृछायाचे विविध कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, कलाक्षेत्रातील सहभाग या सार्यांतून या मुलींचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. हे सगळं करताना दिसणारा एक नैसर्गिक सहजभाव आणि मुक्तपणा हीच इथल्या मातृत्वाची खरी ओळख! मोबाईल-लॅपटॉपला चिकटून आपापल्या विश्वात हरवलेली स्वकेंद्रित मुले आणि त्यांचे पालक असे आजचे ’ई-कुटुंब’ आणि मातृछायाचे विशाल कुटुंब यातला फरक तुम्हीही मान्य कराल.
एका गोष्टीचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलंय. ती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या घरातून आपापला जनुकीय वारसा घेऊन आलेली ही इतकी सारी मुले गुण्यागोविंदाने एका लयतालात सुंदर जीवन जगायला कशी शिकतात? त्यांची वेगवेगळी आनुवंशिक स्वभाववैशिष्ट्ये मातृछायेच्या घरकुलात आल्यावर इतकी संतुलितपणे कशी बरे व्यक्त होतात? एका शिस्तबद्ध, संयमित आणि आनंदी दैनंदिन चक्रात त्यांना सामावून घेण्याची किमया केवळ इथले संस्कारच करू शकतात!
याच अनुषंगाने आता माझ्या दुसर्या आवडत्या विषयाचा संदर्भ देते. जनुकशास्त्र (ॠशपशींळली) हे आपल्याला परिचित असलेले अनुवंशशास्त्र आहे. तर अधिजनुकशास्त्र (एळिसशपशींळली) ही तशी झपाट्याने विकसित होणारी नवी शास्त्रशाखा आहे.
आपल्यातील गुणदोषांना, ते माझ्या रक्तातच आहे किंवा हे माझ्या जीन्समध्येच आहे असे आपण सहज म्हणू लागलो. त्यामुळे आपले दोष जनुकांवर ढकलून नामानिराळे होण्याची आयतीच सोय झाली. नंतर मात्र शास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागले की आपल्या डिएनए आणि जनुकांवर (ऊछअ रपव ॠशपशी) पर्यावरणाचाही प्रभाव पडतो. त्यामुळेच जनुकांचा वारसा आणि बालसंगोपन या दोन्हीच्याा एकत्रित परिणामामधून आपली जडणघडण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकसारखी जुळी मुले! (खवशपींळलरश्र ींुळपी) या जुळ्यांचे संगोपन जर दोन वेगवेगळ्या प्रदेशातील निरनिराळ्या कुटुंबात झाले; तर त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि मानसिकतेत लक्षणीय बदल झालेला आढळतो.
हे असं नक्की कशामुळे होतं? याची कारणे आता शास्त्रज्ञांना समजू लागली आहेत. जनुकांच्या अभिव्यक्तीत (ॠशपश शुिीशीीळेप) बदल घडवून आणणारी सूक्ष्म यंत्रणा (चेश्रशर्लीश्ररी ाशलहरपळीा) अभ्यासणारे हे शास्त्र म्हणजे अधिजनुकशास्त्र! अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर आपल्या वर्तणुकीचा, वातावरणाचा आणि अनुभवांचा आपल्या जनुकांच्या कार्यपद्धतीवर कसा परिणाम होतो ते समजून घेणारे शास्त्र म्हणजे अधिजनुकशास्त्र! आपले जनुकीय संचित बदलत नाही. अधिजनुकीय बदल आपल्या डीएनए क्रमामध्ये कोणताही बदल करीत नाहीत. परंतु अधिजनुकीय बदल हे परिवर्तनीय असतात हे त्यांचे महत्त्वाचे वेगळेपण! म्हणजेच आपला आसमंत आणि अनुभव बदलले की सूक्ष्म पातळीवर अधिजनुकीय बदल घडून येतात.
हे बदल नेमके कसे होतात? याच्या खोलात न जाता मला महत्त्वाचे वाटते ते म्हणजे अशा बदलांना प्रवृत्त करणारी नेमकी ठिणगी! या ठिणग्यांना एक उत्तम शब्द भारतीय संस्कृतीत आहे तो म्हणजे ’संस्कार’! संस्कारांमधेच आनुवंशिक स्वभावगुण बदलण्याची ताकद असते. त्यामुळेच ‘स्वभावो दुरतिक्रम:’ हा आपला समज आता बदलला पाहिजे. स्वभावाला औषध ‘असते’ असे आता म्हणावे लागेल. अधिजनुकीय शोधांमधून पुढे आलेली एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित होण्याची अधिजनुकीय क्षमता! (ढीरपीसशपशीरींळेपरश्र शळिसशपशींळल ळपहशीळींरपलश) या शोधामुळे पूर्वजांच्या अनुभवांचा, संस्कारांचा प्रभाव मुलांवर दिसून येतो या भारतीय सिद्धांताला वैज्ञानिक पुष्टी मिळते. पारंपरिक भारतीय कुटुंबात जीवनाला टक्कर देण्याची, निर्णय घेण्याची, आपली अशी एक पद्धत त्या त्या घराण्याच्या नैतिक अधिष्ठानावर आधारित असते. त्यातूनच घराण्याची परंपरा किंवा वैशिष्ट्ये सांगितली जाऊ लागली असावीत.
मातृछाया या एका मोठ्या कुटुंबाबद्दलही नेमके हेच मला म्हणावेसे वाटते. वेगवेगळ्या पालकांचा जनुकीय वारसा घेऊन आलेली मुले इथल्या संस्कारांच्या मुशीत घडतात आणि इथल्या संस्कारांची परंपरा त्यांच्या वर्तणुकीतून पुढे नेताना दिसतात. अधिजनुकशास्त्राच्या भविष्यातील प्रगतीतून मानसिक जडणघडण, मानवी उत्क्रांती, रोगराई यावर प्रकाश पडेल. परंतु इथे मला आवर्जून जाणवते ते या शास्त्राचे मातृछायातील मुलांमधले दृश्य स्वरूप! संस्कारांचे बालसंगोपनातील महत्त्व इथे नक्कीच अधोरेखित होते!
माझ्या मनात चाललेले हे विचारमंथन शब्दबध्द केल्यावर पुन्हा लक्ष शिलान्यास कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेकडे गेले. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधांसह उभी होणारी ही भव्य आधुनिक वास्तू अधिकाधिक कन्यांना आपल्या पदराखाली घेईल. त्यांना आपली संस्कार शिदोरी देईल. शुभं भवतु.