राष्ट्राध्यक्ष घोषणेच्यावेळी अमेरिकी संसदेत दंगल

0
98

>> चार जणांचा मृत्यू, ५२ जण अटकेत

अमेरिकेच्या संसद सभागृहात काल राष्ट्राध्यक्षपदाची घोषणा व मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी सभागृहात इलेक्टोरल मतदानाबाबत चर्चा सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या इमारतीत घुसून हिंसाचार केला. संसदेच्या इमारतीत गोळीबारही करण्यात आला. या आंदोलनामुळे सभागृह बंद करण्यात येऊन खासदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यावेळी पोलिसांना, सुरक्षा यंत्रणांना मोठे प्रयत्न करावे लागेल. या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान हिंसाचार करणार्‍या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच कॅपिटॉलमधील हिंसाचारप्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली. ही दंगल आटोक्यात आणण्यात पोलिसांना चार तासांनी यश मिळाले.

बायडन यांच्या
नावावर शिक्कामोर्तब

अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींची घोषणा केली. राष्ट्राध्यक्षपदी ज्यो बायडन आणि उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरिस यांची निवड झाल्याचे पेन्स यांनी घोषित केले. अमेरिकन संसदेत याबाबत जवळपास १५ तास चर्चा सुरू होती. तसेच ट्रम्प समर्थकांनी यावेळी दंगलही घडवून आणली. या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी ज्यो बायडन यांच्याकडे योग्य पद्धतीने सत्ता हस्तांतरीत करणार असल्याचे सांगितले. बायडन व हॅरिस २० जानेवारी रोजी अनुक्रमे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. मागील महिन्यात झालेल्या इलेक्टोरल मतदानाचा आज निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी बायडन यांना ३०६ आणि ट्रम्प यांना २३२ मते मिळाली असल्याचे जाहीर करण्यात आले.