श्रीनगरमधील लावापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मंगळवारी सुरू झालेली ही चकमक कालही सुरू होती. दरम्यान, चकमक सुरू असलेल्या ठिकाणी काही स्थानिक तरूणांकडून दगडफेक झाली. त्यांना पळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या.
मंगळवारी जवानांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र जवानांची चाहूल लागताच एका इमारतीमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापूर्वी २५ डिसेंबर रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात चकमक झाली होती.