मुक्तिदिनाच्या आठवणी

0
222
  • पौर्णिमा केरकर

त्या नकळत्या वयात आम्ही भावंडं घरातल्या देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणामुळे भारतीय ध्वज आणि मुक्तीदिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यांसारखे राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले. राष्ट्राविषयीची भावना, प्रेम हे नकळत्या वयापासून माझ्यात रुजले गेले.

विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा उंचा रहे हमारा
हे गीत ऐकू आले की आजही १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तो दिवस साजरा करताना माझ्या बालपणी मी अनुभवलेला हा दिवस आठवतो. आपल्या राज्यात गोवा मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर भारतीय संघराज्याशी गोवा जोडला गेला आणि त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची प्रक्रिया पूर्णत्वाला आली. या दृष्टिकोनातून हा दिवस आपल्या गोव्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे. गोवा मुक्तीनंतर सुवर्णक्षण अनुभवणारे माझे वडील पांडुरंग परब- मास्तर म्हणूनच जे गावात ओळखीचे आहेत, त्या नकळत्या वयात आम्ही भावंडं घरातल्या देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणामुळे भारतीय ध्वज आणि मुक्तीदिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यांसारखे राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले. राष्ट्राविषयीची भावना, प्रेम हे नकळत्या वयापासून माझ्यात रुजले गेले.

माझे वडील प्राथमिक शिक्षक. गावात आपल्या चांगल्या वागण्यामुळे आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळीशी त्यांचा संबंध असल्याकारणाने त्यांना आदर्श स्थान लाभले होते. आजही मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण येते. नाटकांमध्ये रंगणारे माझे बाबा आपल्या आठवणी सांगताना भावूक व्हायचे. मुक्तीपूर्वीच्या कालखंडात मराठी शिक्षणाची गंगोत्री गोव्याच्या खेडोपाडी पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत होते. त्या कालखंडामध्ये पोर्तुगिजांनी मराठी भाषेचे उच्चाटन करण्याचा चंग बांधला होता. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे, या भाषेतून त्यावेळी ‘केसरी’, ‘मराठा’ आणि अन्य वर्तमानपत्रे यायची. गोव्यातल्या जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना त्यामुळे निर्माण व्हायची. भारताशी गोवा एकरूप करण्याची भावना दृढ होत होती. हे जेव्हा पोर्तुगिजांना समजले तेव्हा त्यांनी मराठी शिक्षणावरती प्रतिबंध करण्यास प्रारंभ केला. अशा कालखंडात ग्रामीण भागांमध्ये कोणतीच अपेक्षा न ठेवता माझ्या वडिलांनी मराठीतून विद्यादानाचे कार्य केले. साधी राहणी आणि उच्च विचार हेच त्यांचे तत्त्व होते. आयुष्यभर पांढरा सदरा आणि लेहेंगा असाच त्यांचा वेश! आपल्या तरुणपणातील गोवामुक्तीपूर्वीचा किस्सा माझे वडील म्हणजेच दादा बर्‍याच वेळा सांगायचे. त्यांच्या चेहर्‍याची ठेवण स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांच्यासारखी होती आणि एक दिवस त्यांना मोहन रानडे समजून पोर्तुगिजांनी पकडून नेले. पोर्तुगिजांना वाटले की मोहन रानडे स्वातंत्र्यप्रेमाची भावना जागविण्यासाठी काम करत आहेत. याच संशयाने मोहन रानडे समजून त्यांना अटक करण्यात आली.

गोवा मुक्त झाल्यानंतर ते प्राथमिक शिक्षक झाले. परंतु आपणाला स्वातंत्र्यसैनिकांसाठी असलेले मानधन प्राप्त व्हावे अशी त्यांनी अपेक्षा कधी ठेवली नाही. परंतु आपल्या पाचही मुलांवरती त्यांनी देशप्रेमाचे संस्कार रुजवले. त्यामुळे आजही देशाची संस्कृती, देशाची माती, यांविषयीचे प्रेम आमच्या नसानसांत भिनलेले आहे. प्राथमिक शाळेतले ते दिवस आठवले की आजही गहिवरून येते. राष्ट्रीय सणांच्या महत्त्वाच्या दिवशी आमचे नाना मास्तर, आमच्यावर देशप्रेमाचे संस्कार करायचे. ‘जय हिंद’ म्हणत प्रभातफेरी काढली जायची. अशा या पेडणे तालुक्यातील माझा पालये गाव हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्याला भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व लाभले. कारण तेरेखोल नदीपलीकडचा प्रदेश त्याकाळी भारत देशामध्ये यायचा आणि तेरेखोल-पालये हा परिसर पोर्तुगीज इंडिया या देशामध्ये समाविष्ट व्हायचा. केवळ एकच नदी दोन देशांमध्ये फरक घडवत होती. असे असताना आमचे पलीकडच्या आरोंदा या भागाशी सांस्कृतिक, सामाजिक संबंध होते. आठवड्याच्या बाजारासाठी पालये, किरणपाणी येथून आम्ही नदीपलीकडील आरोंद्याच्या बाजारात जायचो. जेव्हा गोव्यात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे आगमन झाले व १८ जून १९४६ रोजी लोहिया यांनी मुक्तिसंग्रामाचे स्फुल्लिंग आमच्यात पेटवले. गोमंतकीयांची भावना आपल्या प्रदेशाच्या मुक्तीसाठी लढण्याची त्यांनी तीव्र केली. आणि त्यानंतर गोव्यात मुक्तिसंग्रामाचा लढा मोठ्या धैर्याने, मोठ्या गतीने सुरू झाला. स्वातंत्र्यसैनिकांचा जथा तेरेखोल, पत्रादेवी, कॅसलरॉक आणि काणकोण, बांदा यामार्गे लढा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत होता. अशा वेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात स्वातंत्र्यसेनानीना मृत्यू यायचा. कधी ते जखमी व्हायचे. या सगळ्या आठवणी माझ्या वडिलांनी मला सांगितल्या होत्या. आजही माझ्या गावातील भूमिका-वेताळाचे मंदिर बघितले की स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल यादवची आठवण तीव्र होते. सत्याग्रह चळवळ गतिमान झाली. त्यावेळेला भारतभरातून गोवामुक्तीसाठी स्वातंत्र्यसेनानींचे जथे भूमीत येत होते. अशाच मंडळीमध्ये पन्नालाल यादव हे व्यक्तिमत्त्व देशप्रेमाने भारलेले होते. माझ्या गावात पोर्तुगिजांच्या गोळीला ते बळी पडले. त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या कार्याची स्मृती आजही गावातल्या वयोवृद्धांनी जतन केलेली आहे. त्यामुळे पन्नालाल यादवांच्या, त्यांच्या देशप्रेमाच्या या भावना माझ्या हृदयामध्ये निरांजनासारख्या तेवत राहिल्या आहेत. आजही मी जेव्हा १९ डिसेंबरच्या निमित्ताने भारतीय तिरंगा ध्वजासमोर उभी राहते तेव्हा या आठवणींचा पडदा माझ्या डोळ्यांसमोरून सरकत जातो.
लग्न केल्यानंतर मी सत्तरीतील केरी गावात आले. या ठिकाणीसुद्धा माझे सासरे हे गोवा लिबरेशन आर्मी या सशस्त्र क्रांतिदलात क्रांतिकारकांच्या संघटनेचे सदस्य होते. गोवामुक्तीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. त्या खरं तर त्यांचे आजोबा गोवामुक्ती संग्रामाच्या पूर्वी जी १९१२ मध्ये बंडे झाली होती त्यामध्ये सहभागी झाले होते. शेवटचे बंड मोरे घराण्याचे. त्यात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे देशासाठी, आपल्या प्रदेशासाठी हौतात्म्य पत्करण्याची भावना माझ्या सासरच्या मंडळीत आणि माझ्या माहेरच्या मंडळीत असल्याकारणाने आजही देशाविषयीचे प्रेम, देशाविषयीची भावना माझ्या हृदयात तेवत आहे. तिला हा वारसा कारणीभूत आहे. माझ्या आत्याचे घर पत्रादेवी येथे. तिथून बांदा अगदी हाकेच्या अंतरावर. याठिकाणी गोवामुक्तीसाठी वावरणारे कर्नल बनीपाल यांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे आत्याच्या घरासमोरची शाळा ही बनीपाल सिंग यांचे स्मृतिमंदिर म्हणून उभी आहे. पत्रादेवीचा संपूर्ण परिसर जेव्हा मी पाहते तेव्हा गोव्याच्या मुक्तीसाठी देशभरातून त्यावेळेच्या तरुणांनी जो असीम त्याग केला त्याची भावना प्रखरतेने मला उमजते. कोण कुठले, परंतु देशप्रेमाने भारावलेले हे तरुण कोणतीच अपेक्षा न ठेवता शेकडो मैल दूर असलेल्या गोव्याच्या भूमीत येतात. गोव्याची संस्कृती, गोव्याचे लोक यांच्याविषयी त्यांच्या मनात हजारो प्रश्‍न असले तरीही माझ्या भारत भूमीचा भाग पोर्तुगिजांच्या पाशात आहे, त्याला मुक्त करावा आणि त्याच्यासाठी आपले प्राण गेले तरी बेहत्तर अशा प्रकारची भावना त्या युवकांमध्ये होती. पत्रादेवी असो किंवा तेरेखोलचा किल्ला असो, आजही आम्हाला या तरुणपिढीने केलेल्या आत्मबलिदानाची स्मृती जागृत करते. तेरेखोलचा किल्ला मी जेव्हा पाहते तेव्हा शेषनाथ वाडेकर, हिरवे गुरुजी यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी जे बलिदान केले, ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आज आपण गोवामुक्तीच्या ६० वर्षांत प्रवेश करत आहोत. अशा या कालखंडामध्ये शालेय स्तरांवर, विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा, त्यात त्यांनी पत्करले हौतात्म्य हे पुढे त्यांना समजावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांमध्ये या शूरवीरांच्या त्यागाची स्मृती आपण जागवत नाही, त्यांचे चरित्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आपण त्यांना कल्पना करून देत नाही तोपर्यंत त्यांना त्यासंदर्भात की भावना निर्माण होणे कठीण होते आणि यासाठी या पिढीमध्ये ही भावना निर्माण करण्यासाठी गोवामुक्तिसंग्राम आणि त्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ज्यांनी-ज्यांनी गोवामुक्तीसाठी बलिदान स्वीकारले त्यांची स्मृती जागवणे महत्त्वाचे आहे. मी आज जेथे शिकवते ती जागा डिचोली तालुक्यातील मुळगाव ही जरी असली तरी जो अस्नोड्याचा परिसर याच्याशी जोडला गेला, त्या परिसरातील बाळा राया मापारी हे तर गोवा मुक्तिसंग्रामातील पाहिले हुतात्मा. ही सर्वच व्यक्तिमत्त्वे आठवत राहातात आणि मन अभिमानाने भरून येते.