>> निरीक्षकांच्या निबंलनाची मागणी, होंडा-वाळपई मार्ग चार तास रोखला
काल बुधवारी सकाळी होंडा-सोलये खाणीवरील खनिज वाहतूक करताना निर्माण झालेल्या वादातून होंडाचे पंच सुरेश माडकर व सागर नाईक यांना वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी होंडा पोलीस ठाण्यात बोलावून शिवीगाळ व जबर मारहाण करत अटक केली. यानंतर पुन्हा निरीक्षक एकोस्कर हे वाळपई पोलीस ठाण्यात निघून गेले. या प्रकरणाच्या निषेधार्थ काल दिवसभर होंड्यात वातावरण तंग बनले होते. या भागातील ट्रक मालकांनी आणि होंडा तिस्क येथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलीस ठाण्यावर धडक दिली व सुरेश माडकर यांची सुटका करावी व निरीक्षक सागर एकोसकर यांना निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी नागरिकांनी होंडा-वाळपई रस्ता सुमारे चार तास रोखून धरला.
खनिज ट्रकांना चलन
काल सकाळी या भागातील एका खाणीवरील खनिज वाहतूक होत असताना काही ट्रक आवरण न घालता जात असल्याचे लक्षात येताच आणि या भागातील इतर ट्रक मालकांना त्या खाणींवर ट्रक चालवण्याची मुभा न देता सुरू असल्याचे समजल्यावर येथील काही ट्रक मालकांनी हे ट्रक सोलये तिठ्यावर रोखले. या प्रकरणी वाळपई महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा यांनी घटनास्थळी जात सदर ट्रक चालकांना चलन दिले. पुढील सोपस्कारांसाठी सुरेश माडकर, ट्रकमालक सागर नाईक यांना होंडा पोलीस चौकीवर बोलावले. ते दोघेही पोलीस चौकीवर येताच काही वेळातच तेथे निरीक्षक सागर एकोस्कर पोचले आणि त्यांनी पंच सुरेश माडकर यांना मारहाण केली. श्री. माडकर यांना मारहाण झाल्याची खबर पोहोचताच त्यांना पाठिंबा देण्यासाठी होंडा तिस्क परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून पोलीस चौकीवर धाव घेतली. यावेळी त्यांनी माडकर व सागर नाईक यांची तातडीने सुटका करावी व सागर एकोस्कर यांना निलंबीत करावे अशी मागणी करत दुपारी चार तास होंडा पोलीस चौकीसमोर रस्ता अडवण्यात आला.
निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी
त्याचप्रमाणे सदर मारहाणीची वार्ता कळताच पंच शिवदास माडकर, विक्रांत देसाई, सया पावणे, पिसुर्ले पंच देवानंद परब, होंडा जिल्हा पंचायत भाजप उमेदवार तथा पिसुर्लेचे पंच सगुण वाडकर यांच्यासह शेकडो सामाजिक कार्यकर्ते येथे उपस्थित झाले व या घटनेचा निषेध करत लोकप्रतिनिधींवर हात टाकणार्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नागरिकांच्या मागणीनंतर निरीक्षक एकोस्कर पुन्हा होंडा पोलीस चौकीवर येत आपण मारहाण केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित नागरिक संतप्त झाले व पोलीस चौकीवर धक्काबुक्की झाली.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य पाहून डिचोलीतील पोलीस उपअधीक्षक गुरूदास गावडे व सत्तरीचे मामलेदार दरशथ गावस यांनी येथे धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत सुरेश माडकर व सागर नाईक यांची सुटका करून पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली. मात्र यावेळी मामलेदार व उपअधीक्षकांनी नागरिकांना रस्ता वाहतुकीसाठी खुला करा अशी विनंती केली. त्याचा मान राखत सकाळी बारा वाजता अडकवलेला रस्ता दुपारी साडेतीन वाजता खुला केला.
निरीक्षकांनी मागितली माफी
रस्ता खुला केला तरी निरीक्षक एकोस्कर यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागल्याने उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्न हे बार्देश पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, इतर निरीक्षक जिवबा दळवी, तुषार लोटलीकर, महेश गडेकर यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह होंडा पोलीस चौकीवर येत सर्व प्रकरणाची माहिती घेतली. मात्र यावेळी निरीक्षक एकोसकर यांनी, वरिष्ठ अधिकारी व मामलेदार दरशथ गांवस यांच्यासमोर सुरेश माडकर यांना मारहाण केल्याची कबुली दिली व उपस्थितांसमोर माफी मागितली.
परंतु या माफीनाम्यानंतरही नागरिकांनी एकोस्कर यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. यावेळी यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन गावडे यांनी सुरेश माडकर व सागर नाईक यांना निरीक्षक एकोस्कर यांनी मारहाण केल्याची तक्रार नोंदवून घेतली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही नागरिक रात्री उशिरापर्यंत पोलीस चौैकीवर ठाण मांडून होते.
यावेळी साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, प्रवीण ब्लेगन, रीयाज खान, गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, डिचोली कॉंग्रेस अध्यक्ष राऊत, वाळपई कॉंग्रेस अध्यक्ष दरशथ मांद्रेकर, ट्रक मालक संघटनेचे बालाजी गावस यांनीही एकोस्कर यांच्या या कृत्याचा निषेध केला.