गोव्यातील बंद असलेल्या खाणप्रश्नी तोडगा काढून खाणी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज दिल्लीला रवाना होणार आहेत. यावेळी ते केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशींसह अन्य काही मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गेल्या शनिवारी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय खाणमंत्री तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी खाणी सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. या भेटीत त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पुढील आठवड्यात खाणप्रश्नी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी दोन बैठका होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम हेही असतील. या बैठकीला गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे सदस्य व अन्य काही खाण अवलंबितांनाही बोलावण्यात आले आहे.