- ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.
(सांताक्रूझ)
जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते. तू काही कुणाचे वाईट केलेले नाहीस तेव्हा खंत कशाला? आपल्या शरीरावर एखादी गाठ आली तर ती कुरवाळत बसण्यापेक्षा ती कापून टाकणेच श्रेयस्कर नाही का?
आयुष्यात आपण अनेक नाती-गोती जपतो. मित्र-मैत्रिणी जोडतो. खरे तर हे जीवन प्रवासातील सहप्रवासी असतात. ज्याचे जे स्टेशन येईल तिथे तो उतरतो. वेगळ्या दिशेने जातो. पुन्हा भेट होईलच याची काही निश्चिती नसते. परंतु जेव्हा अशी पुनरपि भेट घडते तेव्हा आनंदाचे भरते येते. गिले-शिकवे दूर होतात. मात्र काहींच्या बाबतीत मनाला झालेली जखम कायम राहते. काही केल्या ती बरी होत नाही. काहीतरी बिनसलेले असते. काहीतरी मनाविरुद्ध झालेले असते. अवघड जागीचे दुखणे, न बोलता येत न सांगता येत!
रामभाऊ यांचा असाच एक मित्र त्यांच्या जीवनात आला आणि काही काळाने दुरावला! रामभाऊंचे पदवी शिक्षण गावातच पूर्ण झाले. मात्र गावात नोकरी मिळणे मुश्कील होते. इतरांसारखे तेही गाव सोडून मोठ्या शहरात आले. दूरचे नातेवाईक होते त्यांच्यापाशी राहिले. रोज वर्तमानपत्रातील जाहिराती पहायच्या आणि नोकरीसाठी अर्ज घेऊन बाहेर भटकायचे. कुठे नकार तर कुठे न जमणारे काम! दिवस असेच सरत होते. नातेवाइकांच्या जिवावर फार दिवस राहणे त्यांच्या मनाला पटत नव्हते. ‘पाहुणा झाला तरी तो तीन दिवसांचा, मग तो नकोसा होतो ’ असे म्हणतात. रामभाऊना तर तिथे येऊन दीड महिना होऊन गेला होता. गावाकडची वृद्ध आई आणि दोन लहान भावंडे यांच्याविषयी सतत काळजी वाटत राहायची.
अशीच एके दिवशी वाटेत जुन्या मित्राची- मनोहरची – भेट झाली. तो तिथल्या एका विद्यालयात शिक्षक होता. बालपणीच्या जुन्या आठवणी निघाल्या. गळाभेट झाली. इराण्याच्या दुकानात बसून चहा पिता पिता नोकरीचा विषय निघाला. मनोहरच्या शाळेत विज्ञान व गणित हे विषय शिकविण्यासाठी एका शिक्षकाची गरज होती. मनोहरने संस्था चालक व मुख्याध्यापक यांच्याशी बोलून ही नोकरी रामभाऊना मिळवून देण्याचे वचन दिले.
दुसर्या दिवशी ठरल्यानुसार रामभाऊ त्या इराण्याच्या दुकानावर मनोहरची वाट पाहत थांबले. मास्तरकी तर मास्तरकी पण ही नोकरी आपल्याला मिळावी आणि आपली बेकारीतून मुक्तता व्हावी असे त्यांना मनोमन वाटत होते. दुरून मनोहर येताना दिसला. त्याच्या चेहर्यावरचे हास्य पाहूनच आपले काम झाले आहे याची रामभाऊना खात्री पटली. मनोहर म्हणाला की, तुझे काम होईल परंतु शाळेच्या चेअरमनची अशी एक अट आहे की शाळेच्या वेळेनंतर त्यांच्या मुलीला त्यांच्या घरी येऊन विज्ञान व गणित या विषयाची शिकवणी द्यावी लागेल. रामभाऊ खूश झाले. अटीचे काय ते नंतर पाहू आधी नोकरी पदरात पाडून घेऊ असा विचार करून मनोहरच्या सांगण्यानुसार ते दुसर्या दिवशी नीटनेटके कपडे करून व पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन शाळेच्या पत्त्यावर पोहोचले. शहरातील ती भव्य सुसज्ज शालेय इमारत पाहूनच रामभाऊंची छाती दडपून गेली कारण त्यांच्या गावातील महाविद्यालयदेखील एवढे मोठे व सुसज्ज नव्हते.
सगळे सोपस्कार पूर्ण झाले आणि रामभाऊ नोकरीवर रुजू झाले. वर्ग शिक्षकांच्या खोलीत आल्यावर मनोहरने आपल्या या मित्राची ओळख सर्वांशी करून दिली. यातील बहुतांशी शिक्षक लहान-मोठ्या गावातच शिकून या शहरात आले होते, अनेक अडचणीवर मात करून ते या शहरात स्थिरावले होते. रामभाऊ खूपच लवकर या नव्या वातावरणाशी एकरूप झाले याचे कारण तेच होते. नोकरी बरोबरच रामभाऊ राहायला भाड्याची खोली मिळते का याचा शोध घेतच होते. याची दोन कारणे होती. एक म्हणजे आपल्या नातेवाइकांना अधिक त्रास द्यायचा नव्हता आणि दुसरे म्हणजे आपली वृद्ध आई व भावंडाना त्यांना या शहरात आणायचे होते. भावंडांना इथे उत्तम शिक्षण मिळू शकेल आणि संपूर्ण कुटुंब एकत्र असले की अनेक काळज्या मिटतील हा विचार त्यामागे होता. गावात तसे राहण्यासारखे काही नव्हते. थोडी शेती बागायती होती ती खंडाने देता आली असती.
रामभाऊ ज्या चेअरमनच्या मुलीला शिकवणी द्यायला जायचे त्यांचा बंगला शहरापासून थोडा दूर उपनगरात होता आणि रामभाऊ ज्या नातेवाइकांकडे राहत होते ते ठिकाण होते त्याच्या विरुद्ध दिशेला. शाळेतील कामकाज उरकून आणि जेवण उरकून त्यांच्या बंगल्यावर यायचे जायचे म्हणजे एक प्रकारची सर्कसच करावी लागत असे. त्यांची ही अडचण चेअरमननी ओळखली आणि आपल्या ओळखीने त्यांनी रामभाऊना आपल्याच उपनगरातील एका चाळीत जागा भाड्याने मिळवून दिली. रामभाऊंच्या मनावरचे ओझे कमी झाले. दिवाळीच्या सुट्टीत रामभाऊ गावी आले, शेतीवाडीचे सोपस्कार पूर्ण केले आणि आपल्या वृद्ध आईला व दोन्ही भावंडाना घेऊन ते शहरात आले. सगळे कसे साग्रसंगीत पार पडले. त्याच वर्षी या शाळेचा शालान्त परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. याचे श्रेय मुख्याध्यापक व चेअरमन यांनी रामभाऊंना दिले कारण यापूर्वी गणित विषयात अधिकतर मुले नापास व्हायची आणि निकाल कमी लागायचा. या वर्षीचा निकाल शंभर टक्के लागल्याने सर्वांना आनंद झाला. रामभाऊंचे विशेष कौतुक झाले. चेअरमनची मुलगीदेखील उत्तम गुण मिळवून शालान्त परीक्षेत विशेष श्रेणीत पास झाली. याचे श्रेयदेखील त्यांना देण्यात आले. विश्वस्त मंडळाने रामभाऊना बक्षीस काय हवे असे विचारले. रामभाऊ नम्रपणे म्हणाले की मला शिक्षण विषयातील प्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे की ज्यामुळे मी शाळेसाठी अधिक चांगले काम करू शकेन परंतु नोकरी सोडून मी प्रशिक्षण घेऊ शकत नाही. तेव्हा मला अर्धपगारी का होईना पण एक वर्षाची रजा द्यावी, हे पैसे माझे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर माझ्या नियमित वेतनातून कापून घ्यावेत. त्यांचा हा प्रस्ताव मान्य करणे थोडे कठीण होते. कारण यापूर्वी शाळेने असे कधी केले नव्हते. बराच विचारविनिमय झाला.
विश्वस्त मंडळ आणि खुद्द चेअरमन रामभाऊवर खूश होते. त्यांनी रामभाऊना भर पगारी सुट्टी मंजूर केली मात्र एक अट घातली की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा शाळेतील मुलांना गणित व विज्ञान हा विषय शिकवावा लागेल. कारण तुमच्या या दीर्घ रजेमुळे शाळेच्या शालान्त परीक्षेच्या निकालावर परिणाम होईल. रामाभाऊनी आनंदाने अट मान्य केली. याच ठिकाणी रामभाऊ आणि मनोहर यांच्यात ठिणगी पडली. रामभाऊ कानामागून आला आणि तिखट झाला अशी मत्सराची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. आपण इतकी वर्षे या शाळेत काम केले परंतु असा गौरव व अशी सवलत आपणाला कधी मिळाली नाही याचा राग मनोहरच्या मनात निर्माण झाला. वस्तुतः रामभाऊ नेहमीच मनोहरच्या उपकारांची जाणीव ठेवायचे. त्याच्या अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडायचे. अधून मधून त्याला आपल्या घरी जेवायला बोलवायचे ! शाळेत देखील या दोघांची घट्ट मैत्री पाहून त्यांना राम-लक्ष्मण म्हणायचे !
एका वर्षाने प्रशिक्षण पूर्ण करून रामभाऊ पुन्हा नियमित नोकरीवर रुजू झाले. त्याच वर्षी राज्यातील काही विद्यापीठांनी बहिस्थ वर्ग सुरू केले होते. या संधीचा फायदा घेऊन रामभाऊनी आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करायचे ठरविले. मुख्याध्यापक व विश्वस्त मंडळ यांची मान्यता घेतली आणि पुढच्या दोन वर्षात त्यांनी आपला गणित विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम उच्च श्रेणीत पूर्ण केला. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे ते दुसरे होते. पहिले मुख्याध्यापक आणि दुसरे रामभाऊ! दिवसेंदिवस रामभाऊ विद्यार्थीप्रिय व पालकप्रिय होऊ लागले. कारण त्यांचा अध्यापन विषयात हातखंडा होता आणि प्रशिक्षणामुळे त्यांच्या अध्यापनात कमालीचा सफाईदारपणा आला होता. ही गोष्ट मनोहरच्या मनात सलत राहिली आणि त्याचे रामभाऊबरोबरचे वागणे तुटक बनत चालले.
पाच वर्षांच्या सफल सेवेनंतर रामभाऊना पर्यवेक्षक पदावर बढती देण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले. पर्यवेक्षक म्हणजे भावी मुख्याध्यापक! विद्यमान मुख्याध्यापकांच्या निवृत्तीनंतर रामभाऊ मुख्याध्यापक होणार हे जवळजवळ निश्चितच झाले. हे सगळे पाहून मनोहरच्या मनाचा तिळपापड झाला नसता तरच नवल! पर्यवेक्षक झाल्याने रामभाऊंना मुख्याध्यापकांच्या शेजारची स्वतंत्र केबिन देण्यात आली. वरच्या वर्गाना गणित व विज्ञान हे विषय शिकवायचे आणि अन्य शिक्षकांचे पाठ निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करायचे ही नवीन जबाबदारी रामभाऊंच्यावर पडली. आपला एके काळचा कनिष्ठ आपले पाठनिरीक्षण करणार याचा राग मनोहरला येऊ लागला. काही बोलता येत नव्हते आणि कुणासमोर व्यक्त होता येत नव्हते. शिक्षक खोलीत सतत त्याची चिडचिड व्हायची. इतर शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट नक्कीच आली. परंतु रामभाऊनी स्वतःच्या मेहनतीने हे स्थान मिळवले आहे आणि पर्यवेक्षक झाले तरी इतर सहकारी शिक्षकांशी त्यांचे असलेले नाते अत्यंत नम्र व सौहार्दपूर्ण राहिले होते. त्यामुळे मनोहर वगळता कुणीच त्यांच्याविषयी वाईट बोलत नव्हते. उलट त्यांच्यामुळे शाळेची उत्तरोत्तर प्रगती झाली. शहरातील आपली शाळा एक नामांकित शाळा बनली याचा सर्वाना अभिमान होता.
शेवटी मनोहरने ही शाळा सोडून अन्यत्र नोकरी करण्याचे नक्की केले आणि तो अन्य शहराच्या ठिकाणी गेला! रामभाऊंना वाईट वाटले. आपल्या प्रगतीने मनोहर दुखावला याचे शल्य त्यांच्या मनाला लागले. स्वकर्तृत्वावर मोठे झालेले रामभाऊ हळवे झाले. आपल्या आईच्या जवळ ही खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक ऊन-पावसाळे पाहिलेली ती माउली म्हणाली, राम, मनात अशी वेदना ठेवून जगू नकोस. जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते. तू काही कुणाचे वाईट केलेले नाहीस तेव्हा खंत कशाला? आपल्या शरीरावर एखादी गाठ आली तर ती कुरवाळत बसण्यापेक्षा ती कापून टाकणेच श्रेयस्कर नाही का?