भगवंत चराचरात आहे…

0
347
  • पल्लवी दि. भांडणकर

माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा, आदर, खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात येणारे निर्मळ विचार हे भगवंताने आपल्यावर केलेली कृपा आणि आशीर्वादच आहेत.

आज पहाटे प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात मनाला शांत करणारं स्वामी समर्थांचं गाणं ऐकताना ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी…’ हे बोल हृदयाला स्पर्श करून गेले. देव म्हणजे काय? देव कुठे असतो? तो कसा दिसतो? असे अनेक प्रश्‍न लहानपणी आपण पालकांना विचारतो आणि देवाबद्दलच्या अनेक कथा पालक आपल्याला सांगतात. भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, संत तुकाराम अशा अनेक कथा ऐकून देव आपल्यालाही भेटावा, त्याची कृपादृष्टी आपल्यावरही व्हावी, अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. भक्तांच्या इच्छा आणि बाणीचे प्रसंग हे सर्व पूर्ण करण्यासाठी, भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठी भगवंत नेहमीच आतुर असतो. आपल्याला फक्त निःस्वार्थ भावाने त्याची आर्त भक्ती आणि त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. काही लोकांची अपेक्षा असते की आपण पारायण करतो तेव्हा शेवटच्या दिवशी भगवंत आपल्याला दर्शन देईल. पायी चालल्याने, उपवास केल्याने भगवंताचा साक्षात्कार होईल, अशी भावना असते आणि असे अनुभव कित्येक भक्तांना येतातही. जीवनाचा प्रवास सुरू असताना भगवंत आपल्याबरोबर क्षणोक्षणी असतो. पण त्याला पाहण्याची दृष्टी फक्त आपल्याकडे असावी लागते.

भगवंत आपल्यासोबत नेहमीच असतो आणि क्षणोक्षणी भगवंताच्या प्रेमाचे, करुणेचे अमृत प्रत्येक माणसाला कसे मिळू शकते व ते मिळवण्यासाठी माणसाला कशाची गरज असते, हे सुचवण्यासाठी एक अनुभव खूपच उपयोगी पडला. ही गोष्ट जवळजवळ १९९५-९६ मधली असेल. त्यावेळी वाहतूक मर्यादित होती. सामान्य माणसाशी संपर्क करण्यासाठी बहुतेक लोक एसटीडी वापरत. अशाच एके दिवशी माझी आई पणजीला दातांच्या दवाखान्यात दात तपासणीसाठी गेली होती. परत येताना वाटेत कोणीतरी तिची पर्स मारली. हातात एकही पैसा नव्हता.

त्यावेळी एक रुपयाला फार महत्त्व होते. एक रुपया एक एसटीडी कॉल जोडण्यासाठी अगदी उपयुक्त होता. आईची झालेली पंचाईत पाहून एका भल्या इसमाने आईला एक रुपया देऊन दूरध्वनी करण्यास मदत केली. पण दुर्दैवाने आईचा दूरध्वनी क्रमांक चुकला. आता काय करावं? लोकांना परत परत कसा त्रास देणार? या विचारात असतानाच तिची केविलवाणी नजर ओळखून एक बाई तिच्याकडे आली तिची विचारपूस करत करत. आपली त्याच गावात असलेली ओळख आईला दिली अन् काही घाबरू नकोस, तुझ्या घरापर्यंतचा सर्व खर्च मी करेन, असा दिलासा आईला दिला. पणजीहून घरापर्यंतचा प्रवास कोणत्याही तणावाशिवाय तिला करून दिला. नातेसंबंध नसताना, ओळखपाळख नसताना अचानक आलेली मदत पाहून आई म्हणाली, ‘‘भगवंत आपल्या भक्तांना नकळत मदत करून जातो. आईला मदत करण्यासाठी त्या दिवशी देवी विजयादुर्गा प्रत्यक्ष त्या बाईच्या रूपाने आली.

निःस्वार्थी, निरागस आणि निरपेक्ष वागण्यामुळे देव मानवाच्या मदतीला, त्याला सावरायला सदैव तत्पर असतो. मग तो दूरदर्शन वाहिन्यांवरील छायाचित्रित केलेले आपले दिव्य रूप घेऊनच यायला हवं असं नाही. गरज फक्त असते त्याला ओळखण्याची आणि भगवंत चराचरात आहे हे मान्य करण्याची. माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा आदर खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात येणारे निर्मळ विचार हे भगवंताने आपल्यावर केलेली कृपा आणि आशीर्वादच आहेत. आपले विचार आचार चांगले ठेवा, भगवंत तुमच्यातच असलेल्या निरागसतेत सापडेल आणि तो वेळोवळी तुम्हाला सावरेल.