- पल्लवी पांडे
कोरोनानंतर कदाचित आपल्याला बदललेल्या भारताचं चित्र बघायला मिळेल, जे रेखाटायला अर्थातच आपल्याला हातभार लावायचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण शेवटी बदलणं ही काळाची गरज आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जग एक खूप मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. ते संकट म्हणजे कोरोना व्हायरसचे संक्रमण, ज्यामुळे माणसे अगदी किडे-मुंग्यांसारखी मरत आहेत. त्याला कारण म्हणजे शेवटपर्यंत लक्षात न येणारी या रोगाची लक्षणे आणि योग्य त्या उपचारपद्धतीचा अभाव. ह्या सर्व परिस्थितीमुळे घाबरलेली जनता बहुतेक इतर आजारांना पण बळी पडताहेत- जसे उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, इत्यादी.
वृत्त वाहिन्या त्यांच्या परीने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे. ‘डब्लूएचओ’ने सांगितलेली नियमावली ते आपल्यापर्यंत पोहोचवीत आहेत. पण हळूहळू अभ्यासातून हे लक्षात आलं की एकमेकांच्या जास्त संपर्कात राहून हा रोग बळावतो आहे. म्हणून मग सगळ्यात पाहिला उपाय म्हणजे संपूर्ण जगात लॉकडाऊन (टाळेबंदी) सुरु झाले. वाहतुकीची साधने बंद झाली. पर्यटन स्थळे बंद झालीत आणि माणसे अक्षरशः आहेत तिथेच थांबली किंवा अडकली. असे काही महिने चालू होते. त्यामुळे जगातील अर्थव्यवस्था आणि माणसाचे जीवन खूप बदलले आणि अर्थातच अर्थव्यवस्थेला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. ही विस्कळीत घडी बसवण्यासाठी सर्व व्यवहार परत सुरु झालेले आहेत. पण पुन्हा काही शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
‘धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे!’ हे आपण सगळेच जाणतो.
परत सगळे व्यवहार सुरु झाल्यानंतर अर्थातच त्यात काही बदल अनिवार्य आहेत ते मानवाच्या सुरक्षिततेसाठी कारण कोरोना हा आजार काही रातोरात जाणार नाही. आपण आता पाळत असलेलं सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतर), मास्कचा वापर आणि वारंवार निर्जंतुकीकरण हे सगळं इथून पुढे काही महिने किंवा एखाद वर्षतरी आपल्याला पाळत राहावंच लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जीवनात काही आमूलाग्र बदल केले आहेत ते म्हणजे —
- शक्य तितके एकमेकांपासून दूर राहणे, घरात स्वच्छता ठेवणे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, फळे- भाज्या, किराणा सामानाच्या पिशव्या निर्जंतुक करणे, बाहेर जाताना मास्क लावणे, दुकानांमध्ये गर्दी न करता ठराविक अंतर ठेवून उभे राहणे, हस्तांदोलन- गळाभेट टाळणे, खूप गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि हळूहळू ह्या सगळ्यांची आपल्याला सवयपण लागली आहे.
टाळेबंदी संपून हळूहळू सगळे जीवन सुरळीत होईल पण ह्याचे स्वरूप जरा बदललेले राहील.
आता प्रवास हा आवश्यक असेल तरच केला जाईल. मौज किंवा केवळ इतरांना दाखवण्यासाठी केलेले पर्यटन लोक टाळतील. खूप गर्दीचा आम्ही एक भाग आहोत असे अभिमानाने सांगणारे त्याच गर्दीतून निसटतांना दिसतील.
वीकएंड औटींग जरा कमी होईल. हॉटेल, पर्यटन स्थळे यांना पण निर्बंधाना सामोरे जावे लागणार आहे. स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे सगळे नियम पाळावे लागणार आहेत.
कोरोनामुळे जिवाच्या भीतीने लाखो लोक आपल्या गावी गेल्याचे आपण पाहतो आहे ज्यामुळे अनेक उद्योगधंद्यांना जबर फटका बसल्याचे आपण ऐकतो आहे. हे मजूर कधी परततील किंवा परतणार नाही हे आपण सांगू शकत नाही. अश्या परिस्थितीत आहे त्या कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योग पुन्हा सुरु करणे हे खूप मोठे आव्हान आहे.
आर्थिक मंदी आली आहे. रातोरात अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढे काय?.. हा खूप मोठा प्रश्न नवीन पिढीसमोर उभा आहे. ह्यातूनच आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे स्वयंरोजगारावर आता भर देणे आवश्यक आहे. आपल्यात असलेल्या कौशल्याचा वापर करून त्याला जर छोट्या-मोठ्या अर्थार्जनाचा मार्ग बनवता आला तर त्यात फायदा आहे. थोडक्यात काय तर मोदींनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनण्याकडे सगळ्यांचा कल राहील.
शक्य तितक्या ठिकाणी कॅशलेस व्यवहार होतील. हॉटेल्स, पर्यटन स्थळे या ठिकाणी काम करणारे तसेच बसचालक यांना मास्क वापरणे अनिवार्य राहील. कॅशलेस व्यवहार जिथे शक्य होणार नाही तिथे कदाचित दानपेट्या ठेवून त्यात आपण घेतलेल्या मालाची पूर्ण किंमत टाकण्याचा पर्याय राहील, म्हणजे पैसे परत करण्याची गरज उरणार नाही आणि त्याद्वारे होणारा संसर्ग टाळता येईल.
शाळांपेक्षाही जिथे एका वर्गात जास्त विद्यार्थी असतात असे शिकवणी वर्ग आता बंद होऊन ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु होतील. ई-लर्निंगला आता इतर देशाप्रमाणे आपल्या देशातही वेग येण्याची शक्यता आहे. परीक्षांचे स्वरूप बदलेल. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) व ऑनलाईन परीक्षा होतील जेणेकरून एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यात येईल.
ह्या सर्व परिस्थितीमुळे परदेशात शिक्षण, नौकरी किंवा परदेशातील मुलं-मुली यांचा लग्नासाठी विचार करणे.. त्यांनाच प्राधान्य देणे.. ही मानसिकता भविष्यात कमी होताना दिसेल.
ऑनलाईन खरेदी, विदेशी वस्तूंची खरेदी ह्यावरपण अंकुश बसेल. लोकांनी स्वदेशीचा प्रचार व प्रसार केला तर अर्थातच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात हातभार लागेल.
काही प्रश्न मात्र आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला अजुनही मिळाली नाहीत. आजपर्यंत हे करून ठेवा, आज हा मेन्यू करा असं ज्यांना हक्काने आपण सांगत होतो व ज्या आपल्याला तसा स्वयंपाक करून जेवू घालायच्या त्याच मावशींना आम्ही भीतिपोटी खूप दूर लोटलं आहे. स्वतःचे सण साजरे करण्याआधी आपल्याकडे वडा-पुरणाचा स्वयंपाक करणार्या मावशी मात्र आज स्वतःच्या पूर्ण कुटुंबासोबत हलाखीचे दिवस कंठत आहेत. त्यांची कामे त्यांना परत कधी मिळणार हा एक यक्षप्रश्नच आहे.
त्याचबरोबर रोजच्या कमाईवर जगणारी, रोजंदारीवर जगणारी अनेक कुटुंब आपल्या गावी परतली आहेत. त्यांच्या रोजगारीचं काय?.. हा प्रश्न आहेच. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या कोरोनाच्या महामारीनंतर त्यांच्या आयुष्यात कधी सुख येणार हे आपणही नाही सांगू शकत.
ह्याच काळात अनेक ठिकाणी बंद दुकाने, मग ती किराणा मालाची असो वा सोनाराची, भुयार करून फोडण्यात आली. निर्माण झालेली बेरोजगारी ही चोर्या- दरोडे या गोष्टींसाठी तरुणांना उद्युक्त करेल यात शंका नाही.
त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासाठी अविरतपणे झटणारी स्त्री मात्र आज घरगुती हिंसेला बळी पडते आहे, ज्यामध्ये तिचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक मनाने खचलेल्या स्त्रिया आपल्यासमोर येतील कारण सतत बायकोवर अत्याचार करणार्या नवर्याला या लॉकडाऊनमुळे २४ तास डोळ्यासमोर झेलण्याची कसरत करणे तिला करावी लागते आहे.
ह्या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट सार्यांच्या लक्षात आली आहे ती म्हणजे आपण वाढवून ठेवलेल्या आपल्या अवाजवी गरजा आणि सवयी ज्या कमी केल्या तर कमी मिळकतीतही आपण बचत करून सुखी आयुष्य जगू शकतो.
कोरोनानंतर कदाचित आपल्याला बदललेल्या भारताचं चित्र बघायला मिळेल, जे रेखाटायला अर्थातच आपल्याला हातभार लावायचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण शेवटी बदलणं ही काळाची गरज आहे. ह्या बदलातून एक चांगला यशस्वी भारत निर्माण होईल ही आशा करायला काहीच हरकत नाही.