जीवन गाणे व्हावे…

0
311
  • कालिका बापट
    (पणजी)

गोव्यात शिमगोत्सव ते अगदी दिवाळीपर्यंत आणि त्यानंतर कालोत्सव, जत्रोत्सव कलाकारांसाठीचा सीझन असतो, असे म्हणतात. गोव्याच्या कानाकोपर्‍यात असलेल्या मंदिरांमध्ये गायनाचे कार्यक्रम होतात. परंतु यंदा हे काहीच घडले नाही. तरीही गोव्यातील कलाकार डगमगले नाहीत. गोव्यातील काही कलाकारांनी आपल्या कलेला श्रोत्यांपर्यंत पोचविले…

मनोरंजन करणे त्यातून आनंद लुटणे, आनंद साजरा करणे हा माणसाचा स्थायी भाव आहे. मनोरंजनाशिवाय जीवन फिक्केच. मग तो आनंद कलेतून मिळो. वादन, गायनादी संगीतातून लाभो, वाचनातून लाभो किंवा नृत्य नाटकातून. कोव्हिड-१९ मुळे आलेल्या वैश्विक आपदेमुळे माणूस पिचला गेला. सामान्यरीत्या जगणारा माणूस बेहाल झाला. घरी बसून तरी काय करायचे. मुक्त आयुष्य जगणार्‍या सामान्य माणसाला हा काळ कठीण तर गेलाच, त्याहीपेक्षा कलाकारांना हलाखीतून जावे लागले. केवळ मनोरंजन, कलाव्यवसायातून उदरनिर्वाह करणार्‍या कलाकाराला या आपदेमुळे कठीण दिवस आले. परंतु काही कलाकारांनी कुठलीच तमा न बाळगता कलेचे संवर्धन हेच आपले आयुष्य मानून स्वत:ला त्यात झोकून दिले. मोठमोठ्या कलाकारांनी सोशल मीडियाचा वापर करून श्रोत्यांपर्यंत जाण्याचे कसब जाणले. त्यांचे हे धाडस कमालीचे ठरले. काहींनी त्यावर ताशेरेही झोडले. ‘कलेला आणि कलाकाराला मान राहिला नाही, कलाकार स्वस्त झाला आहे’… अशी वक्तव्ये होऊ लागली. परंतु खरा कलाकार डगमगला नाही. गोव्यातील काही कलाकारांनीदेखील आपल्या कलेला श्रोत्यांपर्यंत पोचविले. यात प्रामुख्याने नाव घेतले जावे असे गोव्यातील युवा कलाकार म्हणजे गोव्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन रसिकांना मनोरंजनाचा आस्वाद देणारे गायक कलाकार अक्षय नाईक आणि अनिकेत दड्डीकर. या दोन्हीही कलाकारांनी तर कुठल्याच ताशेर्‍याना बळी न पडता केवळ संगीत म्हणजेच जीवन हा उद्देश सफल केला.
अक्षय नाईक तर आजही आपल्या चाहत्यांच्या फरमाईशींना सोशल मीडियाच्या माध्यमातून पेंश करीत असतो. त्याचे चाहते त्याला फोन करून आपली कला पेश करायला सांगतात. आणि तोही न कंटाळता आपल्या कलेविषयी निष्ठा पाळतो. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या स्टुडिओतून अनेकांच्या गीतांना चाल लावली आहे. संगीत संयोजनाची बाजू सांभाळली आहे.

हल्लीच गोव्याची युवा शास्त्रीय गायिका मुग्धा गावकर यांच्या संल्पनेतून साकारलेल्या गणेश अंताक्षरीचे त्याने संगीत संयोजन केले आहे. यात स्वत: अक्षय नाईक आणि मुग्धा गावकर यांच्याबरोबरच विभा अळगुंडी, समृध्द चोडणकर, ऋषभ साठे, गौतमी हेदे बांबोळकर यांचा सहभाग आहे. गोव्याच्या सुप्रसिध्द कवयित्री राजश्री सैल सावंत यांच्या कवितांनाही त्यांनी स्वरसाज चढविला आहे. त्यातील दोन गीते ‘ओ दर्या आणि भांगराची तारवा’ नुकतीच यु-ट्यूबवर प्रसारीत झाली आहेत. शिवाय अजून काही गीतांवर काम चालू असल्याचे अक्षय नाईक़ यांनी सांगितले आहे. सर्वत्र लॉकडाऊन पडले तरी संगीताला लॉक न लावता या कलाकारांनी आपली संगीतसाधना चालूच ठेवली आहे. यात अजून उल्लेख करण्यासारखे कलाकार म्हणजे मुग्धा गावकर, प्राची जठार, समृध्द चोडणकर, अजय नाईक आदी. मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांनी स्वरसखीच्या माध्यमातून चाहत्यांना शास्त्रीय गायनाचा आस्वाद दिला. अत्यंत महत्वाची आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गोव्यात लॉकडाऊननंतर पहिला कार्यक्रम नेरूल येथे २६ ऑक्टोबरला झाला. अक्षय नाईक आणि सिध्दी मळिक यांचा हा अभंग व नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम होता. अक्षय नाईक म्हणतो, देवाच्या कृपेने आणि आपण जी या काळात कलासाधना केली त्याचे फळ म्हणून आपल्याला लॉकडाऊन नंतरचा पहिलाच कार्यक्रम करण्याची संधी लाभली. आणि एवढेच नव्हे तर पुढेही अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठरले असल्याचेही तो बोलला.
गोव्याचा लोकप्रिय युवा गायक, संगीतकार अनिकेत दड्डीकर यांनी स्वत: एकलगीते सादर केली आहेतच. शिवाय इतर गायक कलाकारांना सोबत घेऊन युगुलगीते सादर करून संगीताप्रती असलेली प्रेमभावना त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी आत्तापर्यंत शास्त्रीय गायिका समीक्षा भोबे, विभा अळगुंडी, उर्जा नाईक गावकर, शुभम नाईक, तन्मयी भिडे, डॉ.स्वागता सामंत, स्नेहल गुरव, हर्षा वळवईकर, नेहा आजगावकर, अक्षता रामनाथकर, बिंदीया वस्त नाईक, गायत्री पाटील आदींबरोबर युगुलगीते सादर करून संगीताप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्वत: ‘फील द फ्रीडम’ हे स्वातंत्र्यदिनानिमित्त इतर गायक कलाकारांना घेऊन गीतही तयार केले आहे. शिवाय वैष्णवी काकोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रावणात घननीळा बरसला या गीतासाठी त्याचे योगदान आहे. एवढेच नव्हे तर स्वत:च्या संकल्पनेतून त्याने ‘मोग म्हजो’ हे गीतही तयार केले आहे. त्याशिवाय मनसा क्रिएशन्सतर्फे आयोजित स्वरगंधा या फेसबूक लाईव्ह सांगितीक उपक्रमात त्यांनी गायनाचा कार्यक्रम सादर केला होता. अजून एक अशीच कलाकार म्हणजे, रेहा किंबरली कुरीया . या युवा गायिकेने तर इंग्रजी गाण्यांबरोबरच कोकणी, हिंदी अगदी मराठी गाणी सुध्दा गायिली आहेत. तिच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवर तिला ऐकता आणि पाहता येतं. तर अशा या युवा गायक कलाकारांनी कलेप्रती असलेली आपली निष्ठा, प्रेम, आवड, कलासाधाना या कठीण प्रसंगातही जोपासली आहे.