बिहारचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी काल शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षापेक्षा भरीव कामगिरी करूनही भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनाला अनुसरून नितीश यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची कमान जरी सोपविलेली असली, तरी भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ लक्षात घेता नितीश यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद हे नामधारी ठरण्याचीच शक्यता अधिक दिसते. भारतीय जनता पक्षाने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे आपले दोन उपमुख्यमंत्री नितीश यांच्या जोडीला दिले आहेत आणि मंत्रिमंडळावरही आपला प्रभाव निर्माण केला आहे. नितीशकुमार यांच्यासाठी गेली निवडणूक अत्यंत मानहानीकारक ठरली. बिहारमधील ‘जंगलराज’ संपवणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी अत्यंत सकारात्मक छबी संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली होती, तिचा मागमूसही गेल्या निवडणुकीत दिसू शकला नाही. शेवटी शेवटी तर नितीश यांची हताशा एवढी वाढली की, ही आपली शेवटची निवडणूक असे सांगून ते मोकळे झाले. निवडणुकीच्या ऐन तोंडावर लोकजनशक्ती पक्षाचे तरुण नेते चिराग पासवान यांनी नितीश यांनाच आपल्या टीकेचे केंद्र केले आणि जरी लोजपचा एकमेव उमेदवार या निवडणुकीत जिंकू शकला असला तरी किमान दोन डझन जागांवर त्यांनी नितीश यांच्या विजयात कोलदांडा घालण्याचे काम केलेले दिसते आहे.
प्रादेशिक पक्षाच्या सोबत युती करायची आणि हळूहळू त्या पक्षाला संपवायचे ही भाजपची सार्वत्रिक नीती राहिली आहे. नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करून भाजपने बिहारमध्ये आपले हातपाय पसरले. आता हळूहळू नितीश यांचा पक्ष संपवून स्वतःच समर्थ पर्याय म्हणून पुढे येण्याच्या दिशेने पावले टाकल्याखेरीज भाजप राहणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेली मुहूर्तमेढ गेल्या विधानसभा निवडणुकीने रोवली गेलीच आहे. त्यामुळे अशा विस्तारवादी पक्षाच्या समवेत सरकार चालवणे ही नितीश यांच्यासाठी सोपी गोष्ट निश्चितच नसेल. संयुक्त जनता दलाला यावेळी केवळ ४३ जागा मिळाल्या, तर भाजपच्या जागा ७४ वर पोहोचल्या, परंतु तरीही नितीश यांच्याकडेच सत्तासूत्रे सोपवण्यामागे भाजपापाशी बिहारचा चेहरा म्हणता येईल असा दुसरा नेता तूर्त नाही हेच कारण आहे. सुशील मोदी हे नितीश यांच्यासमवेतच्या भाजपच्या सत्तापर्वामध्ये उपमुख्यमंत्री जरूर होते, परंतु ज्या प्रकारे यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रिपदही न देता बोळवण करण्यात आली आहे, ते पाहाता सुशील मोदी हे बिहारच्या दृष्टीने भरवशाचे नाव पक्षाला वाटत नाही हेच स्पष्ट होते. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना केंद्रामध्ये एखादे मंत्रिपद देण्याची चर्चा आहे, परंतु शेवटी बिहारमध्ये भाजपा येत्या पाच वर्षांत स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी कोणाला नेता म्हणून पुढे आणते हे पाहावे लागेल. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार, परंतु खरी सत्ता भाजपची असाच सारा प्रकार येणार्या काळात जर पाहायला मिळाला तर त्यातून नितीशकुमार अस्वस्थ झाल्याखेरीज राहणार नाहीत आणि तसे घडले नाही तरच नवल ठरेल.
दुसरीकडे गेल्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या राष्ट्रीय जनता दलाने कालच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकून आपली आगामी नीती स्पष्ट केली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्यासमोरील आव्हान हे दुहेरी असेल. समोर राजदच्या रूपाने अत्यंत प्रबळ विरोधक आणि सोबत महत्त्वाकांक्षी आणि विस्तारवादी भाजप असा हा पेच आहे.
आणखी एक गोष्ट या निवडणुकीनंतर घडली आहे ती म्हणजे कॉंग्रेसचे झालेले पानीपत आणि त्यातून केंद्रात पुन्हा डोके वर काढलेला असंतोष. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नुकतीच एक मुलाखत देऊन आपल्या या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. बिहारमधील कॉंग्रेसच्या पराभवाचे खापर त्यांनी पक्षामधल्या ‘नियुक्ती संस्कृती’ वर फोडले आहे. केंद्रीय कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्याची जी प्रथा आहे, तीच पक्षाच्या मुळावर येत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. तारीक अन्वर यांनी कॉंग्रेसने बिहारमध्ये जागावाटपास विलंब लावल्यानेच नामुष्कीजनक पराभव झाल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये जेमतेम तीन सभा घेऊन बहीण प्रियांकाच्या शिमल्याच्या घरी सहलीवर गेलेले राहुल गांधी कॉंग्रेस रसातळाला घेऊन चालले आहेत हेच हे नेते परोपरीने सांगत आहेत, परंतु कॉंग्रेस काही चुकांपासून धडा घ्यायला तयार दिसत नाही.
बिहारच्या निवडणुकोत्तर घडामोडींनी भविष्यात होऊ घातलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. भाजप अधिक आत्मविश्वासाने पश्चिम बंगालच्या निवडणुकांना सामोरा जाईल. कॉंग्रेसची घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत आणि कोठेही महागठबंधन करताना यापुढे कॉंग्रेसला त्यात घ्यायचे की नाही यावर फेरविचार जरूर होईल!