>> चुरशीच्या लढतीत राष्ट्रीय जनता दल मोठा पक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर रात्री उशिरा सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यासह रालोआने पुन्हा सत्तेच्या दिशेने कूच केली आहे. रालोआ रात्री उशिरा १२५ जागांनी आघाडीवर होती. तर विरोधी राजदप्रणित कॉंग्रेस व डाव्या पक्षांच्या महाआघाडीने ११० जागांवर आघाडी घेत सत्ताधारी रालोआ समोर कडवे आव्हान उभे केले आहे..
बिहार विधानसभा निवडणूक निकालात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत आहे. मात्र महाआघाडीनेही चुरशीची झुंज दिल्याचे दिसत आहे. त्यातच सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. एकूण २४३ जागा असलेल्या बिहारच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागांची गरज असून सुरूवातीला फार मोठ्या फरकाने पिछाडीवर असलेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुसंडी मारत महाआघाडीला मागे टाकत बहुमताकडे घोडदौड सुरू केली होती. मात्र संध्याकाळनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलाने आघाडी घेतल्याने चुरस पहायला मिळाली. अत्यंत दोलायमान स्थितीत मतमोजणी चालू असल्याने नक्की कोणाचे पारडे जड आहे याविषयी काहीच अंदाज वर्तवला जात नाही.
एकंदरित अंदाज पाहिल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२५ जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी ११० जागांवर आघाडीवर आहे. लोजपला १ तर अपक्षाकडे ७ जागांची आघाडी आहे.
मतमोजणीत गोंधळ ः तेजस्वी
विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केल्याचा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आता केला आहे. इतकेच नव्हे तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत. मतमोजणीत गोंधळ सुरू असल्याचा आरोपही तेजस्वी यांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणच्याही दबावाखाली येऊन काम करत नाही. आपण आपले कर्तव्य बजावत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतमोजणीस विलंब
कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीत बदल करून मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी काही तासांचा उशीर लागत असल्याचे निवडणूक आयोगानं स्पष्ट केले आहे. यंदा बिहार मतदानासाठी एकूण १ लाख ६ हजार ५२६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. २०१५ च्या निवडणुकीत ६५ हजार ३६७ मतदान केंद्र होती. यंदा मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे हा उशीर होत असल्याचे आयोगाने सांगितले. त्यामुळे सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होऊनही निकाल हाती येण्यास उशीर होत आहे.
पोटनिवडणुकीत भाजपचीच बाजी
भाजपने कालच झालेल्या पोटनिवडणुकीतही बाजी मारली आहे. काल झालेल्या एकूण ५९ जागांपैकी ३९ जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मध्यप्रदेशात कॉंग्रेसला पुन्हा सत्ता स्थापन करता आली नाही. मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात बहुमत मिळवत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. तर दिल्लीत आपने बाजी मारली. गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी करत, आठही जागांवर विजय मिळवला आहे. कर्नाटकमध्येही भाजपने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येही सातपैकी ५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. मध्यप्रदेशमधील २८ पैकी १९ जागा भाजपकडे आल्या असून ८ जागी कॉंग्रेस पक्ष विजयी झाला आहे. तेलंगणातील एकमेव जागा भाजपकडे आली.
उशिरापर्यंत मतमोजणी
रात्री रात्री ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार २४३ पैकी १६५ जागांचे निकाल लागले. त्यात एनडीए – ८३ (भाजप ४७, जेडीयू -२९, व्हीआयपी-४, एचएएम- ३) आणि ३९ जागांवर आघाडी. तर महाआघाडी- ७६ (आरजेडी ५२, कॉंग्रेस १२, डावे १२) आणि ३७ जागांवर आघाडी, एमआयएम- ४ वर विजयी, १ जागेवर आघाडीवर, बसपा आणि अपक्षाने प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.
अपक्षांकडे सत्तेच्या चाव्या?
बिहार निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. २४३ मतदारसंघाच्या विधानसभेत स्पष्ट बहुमतासाठी १२२ जागांची गरज असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडी यांच्यात सत्तेसाठी चुरस दिसत असून अशावेळी विजयी अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका निभावू शकतील.
शिवसेनेपेक्षा नोटाला जास्त मते
बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेने ५० जागी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालेले आहे. शिवसेनेपेक्षा नोटाला १.७४ टक्के मते अधिक मिळाली आहेत.