उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा कला मात्र मात्र, लष्करी अधिकार्यासह दोन जवान हुतात्मा झाले. शनिवारी रात्री माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर संशयीत हालचाली आढळून आल्या होत्या. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला व घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल आणि दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या.
माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे हुतात्मा झाले. जवानांकडून परिसरात अद्यापही शोधमोहीम राबवली जात असून एकंदर तीन दहशतवाद्यांचा यावेळी खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांकडून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल २०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात १२ महिन्यांच्या कालावधीत १५७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.