- पौर्णिमा केरकर
इतरांनीही तिची ख्यालीखुशाली सोडली. सासरी ती एकटी… एकाकी पडली. स्वभाव साधाभोळा, भित्रा, त्यामुळे चूक नसतानाही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आयुष्यभर भोगण्याच्या मार्गावर तिची वाटचाल सुरू आहे.
साचीला भरल्या कुटुंबातून तिच्या नवर्यादेखत अलग करण्यात आले. घर दुमजली… छोटा बंगला म्हटले तरी चालेल. घरात साचीच मोठी. तिच्या नवर्याचे दोन भाऊ. साचीच्या लग्नात ते दोघेही आकुवार होते. नव्या नवलाईची सुरुवात. तालेवार घराणे मिळाले म्हणून साचीचे आईवडील खूश होते. लग्न ठरवताना स्वभावगुण, घराण्याची वैचारिक, सांस्कृतिक परंपरा नेहमीच दुय्यम मानली जाते. एकविसाव्या शतकातही ही मानसिकता बदललेली नाही याचीच खंत वाटते. साचीच्या आईवडिलांनीही हीच चूक तिच्याबाबतीत केली. घर, जावयाची सरकारी नोकरी, घराण्याची वरवरची प्रतिष्ठा यालाच प्राधान्य दिले गेले. मुलीने आयुष्यभर तडजोड करायलाच हवी. सासरी तर तिने स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून फक्त कुटुंबातील इतर सदस्यांचाच विचार करायला हवा असे नवर्यासकट सर्वांनाच वाटायचे.
साची गुणी मुलगी. पारंपरिक विचार-आचारात बांधलेली. तिचं मन प्रामाणिक. समोरच्याशी घाबरून बोलणारी, वागणारी. घरातील स्वयंपाकपाणी, धुणी-भांडी, इतर कामे हे सर्व तिला कळत होते, आणि काम करण्याचाही तिला कंटाळा नसायचा. फक्त तिला स्वतःच्या मनाने स्वतःच निर्णय घेऊन मात्र भरल्या घरात काम करता येत नसे. तिच्या मनात सतत भीती की मी रांधलेले जेवण घरातल्यांना आवडेल ना? जेवण त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांना आवडणारे झाले नाही तर? त्यांनी स्वयंपाकाला- मला नावं ठेवली तर? हे विचार तिला भंडावून सोडायचे. दहावीपर्यंत शिक्षण झालेले असूनही तिला व्यवहारज्ञान तसे कमीच होते.
साचीचे लग्न होईपर्यंत या गोष्टी कोणाच्याही लक्षात आल्या नाहीत. ती एकदमच साधीसुधी, निर्णयक्षमता नसलेली. नवीन माणसे, नवी जागा बघितली की ती बुचकळ्यात पडायची. घरी अनोळखी कोणी आले तर त्यांच्याशी कसे बोलायचे तिला कळत नसे. साचीच्या अशा वागणुकीचे मूळ तिच्या बालपणात दडले होते. आईवडील आपल्या मुलीला जेव्हा वाजवीपेक्षा जास्त दक्षतेची वागणूक देतदेतच वाढवितात, जगाविषयी… सभोवतालाविषयी तिला अनभिज्ञच ठेवतात तेव्हा त्यांच्या लक्षातही येत नाही की या सर्वच मर्यादांमुळे तिच्या मनावर कोणते आणि काय परिणाम होणार आहेत? एकविसाव्या शतकातही मुलीच्या जातीला दिले जाणारे संस्कार बदलले जात नाहीत. दूरदर्शनवरच्या मालिकांमधूनही अशीच दृश्ये वारंवार दिसतात. त्यामुळे प्रश्न पडतो की खरंच आपण आधुनिक झालो आहोत ते फक्त बाह्यांग सजविण्यापुरतेच का? विचारात बदल कधी होणार?
साचीला स्वतःहून पुढे पुढे करायला भीती वाटते खरी; मात्र तिच्या सहवासातील जाणकार व्यक्तीने तिला सतत काही ना काही सांगितले की ती मनापासून ते काम करते आणि तेसुद्धा नेटकेपणाने! म्हणजे तिला फक्त गरज आहे समजून घेण्याची. परंतु दुर्दैवाने हे घडत नाही हीच तिची, तिच्या एकटेपणाची शोकांतिका झालेली आहे. आईवडिलांनी तिला कधी बाहेर पडूच दिले नाही. तुला कळणार नाही, तुला कशाला तेथे जायला हवे, तुला जमणार नाही ते, पणजीत तू एकटी कशी जाशील, मी करेन किंवा भाऊ करेल ते काम… अशी अनेक वाक्ये ऐकवून तिला घरीच ठेवले. एकटीने बाहेर पडण्याची तिची भीती वाढतच गेली. पुरुषांशी, अनोळखी व्यक्तीशी बोलता कामा नये, मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जाता कामा नये, सासरी नवरा-सासुसासरे वागवतात तसेच वागावे… हे सतत ती ऐकत आलेली. मोठ्या माणसांनी काही सांगितले तर त्यांना प्रत्युत्तर देता कामा नये या मर्यादांनी ती पुरती जखडली गेली. वयाने वाढत राहिली खरी पण बुद्धीने निरागसच राहिली! हाच तिचा प्रामाणिक निरागसपणा तिच्या वेदनेचे मूळ बनून तिचे तारुण्य कुरतडून टाकत आहे. ती समंजस, सहनशील आहेच! कारण समंजस, सहनशील, त्यागी हे तर स्त्रियांच्या आदर्शत्वाचे दागिने परंपरेने मानले आहेत. घराण्याच्या इभ्रतीसाठी ती स्वतः आतून तीळ-तीळ तुटत असताना तिला ते जतन करायचेच आहेत, हे तिच्या काळजावर कोरून तिने ठेवले. ते तिला सांगताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. वयाने वाढली, लग्नाची झाली तरी काहीच कसे कळत नाही साचीला? असे सारखे तिला ऐकू येऊ लागले. तिलाही मग वाटू लागले की खरेच मला कसं काहीच कळत नाही? मी कमी शिकलेली, अडाणी म्हणून घरची, माहेरची माणसे माझ्याकडे बघतात. सगळ्या हुशार माणसांच्या रांगेत आपणच कमी… ही तिची भावना बळावतच गेली. इतरांनीही तिची ख्यालीखुशाली सोडली. सासरी ती एकटी… एकाकी पडली. स्वभाव साधाभोळा, भित्रा, त्यामुळे चूक नसतानाही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आयुष्यभर भोगण्याच्या मार्गावर तिची वाटचाल सुरू आहे.
माहेर सधन असूनही समाज, लोक काय म्हणतील? या भयास्तव ‘मुलगी दिली तिथे मेली’ याच विचारसरणीचे पालन आजच्या एकविसाव्या शतकातही प्रामाणिकपणे केले जात आहे ही खेदजनक बाब आहे. अलीकडेच प्रसारमाध्यमांनी एक बातमी प्रसारित केली होती. ही अशी एकुलती एक बातमी होती किंवा आहे असे मुळीच नाही. स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या तर सवयीच्याच झालेल्या. त्या ऐकून-वाचून समाजाच्या उरल्यासुरल्या संवेदनाही बोथट होतील की काय? हीच भीती वाटते आहे. ती बातमी अशी होती की, एका नवर्याने दीड वर्ष आपल्या बायकोला शौचालयात बंदिस्त करून ठेवले! इतके दिवस अन्न-पाण्याशिवाय ती महिला कशी बरे जगली असेल? तिला चालताही येत नव्हते, बोलतानाही जीभ अडखळत होती. तिची परिस्थिती बघवत नव्हती. शेजार्यांनी नवर्याविरुद्ध तक्रार केली. तिला जेव्हा बाहेर काढले तेव्हा तिने पहिल्यांदा मागणी केली ती कपाळाच्या कुंकवाची आणि हातातल्या बांगड्यांची. नुसत्या विचारानेसुद्धा आतून सर्वांगाला कंप सुटतो… ज्या कुंकवाच्या धन्याने तिची अशी दशा केली होती त्याच्याच नावाचे कुंकू ती मागत होती. तिच्याही माहेरच्यांनी ‘लोक काय म्हणतील?’ म्हणून ओठांवर चुप्पी ठेवली. ही घटना घडली तेव्हा देशभर नवरात्री- स्त्रीशक्तीचा जागर- उत्साहात संपन्न होत होता. मात्र घराघरांतील स्त्री-शक्ती गलितगात्र, असहाय, विकल अवस्थेत दिवस कंठीत आहे. या विसंगतीचेच मनाला क्लेश होतात. मंदिरातील देवी दगडाची, ती निश्चल, तरीही तिचा केवढा सन्मान? जित्याजागत्या लक्ष्मीला मात्र तिच्या मन, भावना, विचारांसकट घरातीलच दुसर्या एका लक्ष्मीने
समजून घेऊ नये?