पणजीतील ग्रंथालये

0
120
  • शरत्चंद्र देशप्रभू

ग्रंथ आणि संस्कृती असे अतूट समीकरण प्राचीनकाळापासून अस्तित्वात असल्याचे अनेक दाखले इतिहासाच्या दप्तरांत आढळतात. मध्ययुगात मध्य आशियामध्ये ग्रंथभांडारांना आक्रमकांनी लावलेल्या आगीचे पण उल्लेख आढळतात. बॉबिलोनिया संस्कृतीत ग्रंथालयांना लावलेल्या आगी सहा-सहा महिने धुमसत राहिल्याचे संदर्भ पण दस्तऐवजात सापडले आहेत. परंतु सुसंस्कृतपणा आणि ग्रंथप्रेम यांचा विलोभनीय मिलाफ ठायीठायी दृग्गोचर होतो.

ग्रंथालय आणि पणजी शहर यांच्या नात्याबद्दल वयस्क नागरिकांना सांगोपांग माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठांना वयस्कर म्हणता आपण वयस्कर या विधानाची सीमारेषा केव्हा पार केली हे लक्षातच आले नाही. पणजीतील प्रमुख वाचनालय म्हणजे ‘सेंट्रल लायब्ररी’; जिचे नामकरण ‘कृष्णदास शामा सेंट्रल लायब्ररी’ असे २०१२ साली झाले अन् स्थित्यंतर पण कला आणि संस्कृती विभागाच्या ‘संस्कृती’ या भव्य इमारतीत झाले. सेंट्रल लायब्ररीची स्थापना पोर्तुगीज राजवटीत १५-९-१८३२ साली झाल्याचे संदर्भ सापडतात. प्रथमतः तिचा ताबा पोर्तुगीज सैनिकी विभागाकडे होता अन् नामकरण झाले होते- ‘पुब्लिक लिव्हरारीय द आकादेमीक मिलितार.’ १८७० साली या ग्रंथालयाचे ‘बिब्लीमोग्रफिय द नोव्ह गोअ’ असे नामांतर झाले. १८९७ मध्ये याला ‘नासियोनल’ हा शब्द जोडून लांबलचक नाव दिले गेले- ‘बिब्लीयोग्राफिय नासियोनाल द नोव्हा गोअ’ असे नाव प्रचलित झाले. कालांतराने या ग्रंथालयाचे नाव बदलून ‘बिब्लीयोथेक नासियोनाल वास्को द गामा’ असे ठेवले गेले. १९५९ साली या ग्रंथालयाचा शासकीय ताबा ‘सेरव्हिसियु द इन्स्ट्रुसांव इ साउद’ या सरकारी खात्याकडे दिला गेला. मुक्तीनंतर हे ग्रंथालय सेंट्रल लायब्ररी या नावाने ओळखले जाऊ लागले.

सेंट्रल लायब्ररी त्या काळी मिनेझिस ब्रागांझा या संस्थेच्या खालच्या भागात कार्यरत होती. १९६६ ते १९७० च्या काळात या वाचनालयाकडे आमचा सतत संपर्क असायचा. वाचनालयाचा बहुतांश भाग विद्यार्थी अभ्यासासाठी वापरत. संस्थेची पण याला आडकाठी नव्हती. किंबहुना विद्यार्थ्यांना सोयिस्करपणे अभ्यास करता यावा अशा सोयिसुविधा पण पुरविल्या जात. अट एकच होती की, विद्यार्थ्यांनी शांतता पाळावी. आचार्य अत्रेसारखा दिसणारा एक कर्मचारी टेहळणी करत फिरायचा. हुबळी हे या वाचनालयाचे क्युरेटर. वाकड्या मानेने चालण्याची यांची ढब होती. परंतु यांचे आगमन झाल्यावर सर्वजण चिडीचूप. हे गेल्यावर चिवचिवाट चालू. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या जागेचे स्थित्यंतर नंतर सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत झाले. सेंट्रल लायब्ररीत असताना आम्हा विद्यार्थ्यांचे विविध उद्योग चालू. कॅफे प्रकाश किंवा कॅफे भोसलेमध्ये चहापानासाठी जायचे. आझाद मैदानावरील सभांना हजेरी लावायची. सार्वमतावेळच्या दोन्ही पक्षांच्या सभांना आम्ही हजेरी लावल्याचे स्मरते. उल्हास बुयांव व अमर शेख यांची जुगलबंदी, आचार्य अत्रे, उदय भेंब्रे यांची भाषणे, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मार्मिक भाषण, भुपेश गुप्ता, कृष्णा मेनन यांची शैलीदार भाषणे, मगो-युगोची तडाखेबंद भाषणे, जॉर्ज वाझ, जेराल्ड परेरा या कामगार नेत्यांची आक्रमक भाषा. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम. या वाचनालयाच्या ग्रंथसंभाराचा उपयोग पदवी संपादन केल्यानंतरच झाला. विविध कादंबर्‍या, कथासंग्रह, दिवाळी अंक यांची रेलचेल होती. सदस्य असल्यामुळे शैक्षणिक विषयावरची पण पुस्तके घरी न्यायला मिळत. या वाचनालयांमुळे आम्हा विद्यार्थ्यांची ज्ञानोपासना पूर्णपणे भागली, दृष्टिकोन बदलला, अभिरूची संपन्न झाली.
पणजीत साठाव्या दशकात नगरपालिकेचे वाचनालय ‘फार्मासिस अनंत’च्या वरच्या बाजूला होते. नक्की आठवत नाही. परंतु जवळच त्या वेळचे सुप्रसिद्ध कामत टायपिंग इन्स्टिट्यूट पण त्याच मजल्यावर होते. या वाचनालयात पुस्तके होती, परंतु वाचक ‘लाईफ’ आणि ‘टाईम’ या इंग्रजी नियकालिकांच्या ओढीने येथे येत. श्री. माधव बोरकर यांच्या माहितीनुसार कै. अ. ना. महांबरेंचे विद्यार्थिदशेतील हे आवडते वाचनालय होते. तिथल्या रसिक ग्रंथपालामुळे पण ते या वाचनालयाकडे आकर्षित झाले होते असे समजते. कालांतराने हे वाचनालय नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर स्थलांतरित झाले आणि नंतर सांतइनेजला स्थिरावले.

सरस्वती मंदिर हे आणखीन एक नावाजलेले वाचनालय. हे वाचनालय पहिल्यांदा नवरेकरांच्या जुन्यापुराण्या वाड्यात माडीवर होते. भारदस्त जिना. संगीतरत्न श्रीपादराव नेवरेकरांचे हे वसतिस्थान. माझा मुष्टिफंडमधला वर्गबंधू डॉ. प्रसाद नेवरेकर पण या घरातला. वाचनालयाला दिलेली जागा अपुरी परंतु हवेशीर, भरपूर खिडक्या असलेली. येथे रहस्यकथांना मागणी होती. शिवाय वर्तमानपत्रे पण वाचायला बुजुर्ग मंडळी संध्याकाळी जमत. मासिके, साप्ताहिके पण मिळत. इथला ग्रंथपाल कै. उमेश सुखटणकर कडक शिस्तीचा होता. वेळ झाल्यावर वाचन बंद करण्याचा इशारा आम्हाला त्यावेळी अरसिकपणा वाटत असे. परंतु हे वनाचनालय आपल्या प्रशस्त वास्तूत स्थलांतरित झाल्यावर आमची दोस्ती जमली. याच्या रोखठोक स्वभावामुळे व्यवस्थापनाशी पण संबंध दुरावले होते. याची परिणती याच्या सेवामुक्तीत झाली. कठोर संघर्ष झाला. या लढ्यात याला ऍडव्होकेट पी. जे. कामत यांची भक्कम साथ मिळाली. दीर्घ चर्चेद्वारे अनेक फेर्‍यांतून मी अथक प्रयत्नाद्वारे दोन्ही पक्षात समेट घडवून आणला. या माझ्या योगदानाची आठवण उमेश सुखटणकरने शेवटपर्यंत ठेवली. नीलिमा आंगले ही कवयित्री पण येथे ग्रंथपालपदावर कार्यरत होती. अंकुश तारी, श्रीमती आमोणकर सगळ्यांशी संबंध सलोख्याचे होते. कै. उमेश महांबरेच्या अर्धांगिनीने पण येथे थोड्या अवधीसाठी काम पाहिले. कै. यशवंत रामाणी यांनी या संस्थेच्या प्रगतीत फार मोठे योगदान दिले. हे दिवंगत कवी शंकर रामाणी यांचे ज्येष्ठ बंधू. कार्यक्रम सादर करण्याचा पायंडा कदाचित यांच्या कालावधीत पडला असावा. नक्की आठवत नाही. परंतु आता संस्थेचे स्वतंत्र असे सभागृह झालेले आहे. या संस्थेने चांगल्या योजना राबविल्या. अल्प मोबदल्यात दिवाळी अंक वाचकांना पुरवायची अभिनव योजना कार्यान्वित केली. यामुळे शंभर ते दीडशे दिवाळी अंक वाचकांना नजरेखाली घालता येऊ लागले. इथले वाचक चोखंदळ. ऍडव्होकेट जोशी व तेलीश हे तर या वाचनालयाला दररोज भेट द्यायचे. निवृत्तीनंतर आर्थिक महामंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी बोरकर पण रोजचे वाचक. आता वयोमानाप्रमाणे त्यांचे येणे कमी झाले आहे असे कर्मचारी वर्गाकडून कळले. इथले काही वाचक आपल्या तर्‍हेवाईकपणामुळे कायमचे स्मरणात राहिले. एक होता आंध्र प्रदेशातला. वेश अक्षरशः भिकार्‍याचा. दाढीचे खुंट वाढलेले. केस अस्ताव्यस्त. पिवळी दंतपंक्ती अन् दोन्ही हातांत वर्तमानपत्रांच्या कात्रणांनी शिगोशिग भरलेल्या पिशव्या. तासन्‌तास याचा मुक्काम वाचनालयात असायचा. आम्ही विद्यार्थिदशेत असल्यामुळे आम्हाला या व्यक्तीबद्दल कुतूहल. ओळख वाढवून केलेल्या गप्पांच्या ओघात याचे इंग्रजीवरचे प्रभुत्व दिसून आले. दुसरा गौरवर्णीय शिडशिडीत बांध्याचा मध्यमवयीन वाचक. याचे वाचन कायम डोळ्यांसमोर एक भिंग घेऊनच. कदाचित चष्मा विकत घेणे परवडत नसेल. परंतु एकच भिंग आलटून-पालटून वापरत तो वाचनात गुंग असायचा.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे पण एक आटोपशीर जागेत वाचनालय होते. अजूनही असेल. प्रभाकर भुसारी, श्री. शरद इंगळे, श्रीमती आठवले यांनी इथले संचालकपद भूषविले होते. १९७० ते ८० च्या दशकात या केंद्राने विविध साहित्यिक अन् सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे आठवते. मागच्या सभागृहात सेतू माधवराव पगडी, माधन मनोहर, चित्तरंजन कोल्हटकर यांची व्याख्याने ऐकल्याचे स्मरते.

मळा भागात पण महालक्ष्मी वाचनमंदिर नावाचे वाचनालय कार्यरत आहे. परंतु येथे जाण्याचा योग क्वचितच आला. आता सरकारी प्राथमिक शाळेत वर्तमानपत्रे व नियतकालिके वाचण्यासाठी एक दालन सेंट्रल लायब्ररीने राखून ठेवले आहे.

जागतिकीकरणामुळे वाचनाची आवड कमी झाल्याचे सांगण्यात येते. ई-बुक आणि व्हिडिओ पुस्तके पण प्रचलित झालेली आहेत. परंतु मुद्रित पुस्तकाबद्दलची ओढ कायम आहे. व्यस्त जीवनामुळे जरी वाचनालयात होणारी हजेरी कमी झाली तरी वाचनालय ही संस्था माणसाच्या सांस्कृतिक जडणघडणीत अविभाज्य भाग आहे यात संदेह नाही. काळाच्या ओघात वाचनालयात नव्या सुविधा येणे साहजिकच आहे. सेंट्रल लायब्ररीने अशा सुविधा पुरवण्याचे केलेले प्रयोग यशस्वी झाल्याचे संकेत मिळताहेत. तरुण वाचकाच्या आवडीनिवडी अन् आकांक्षा, गरजा ओळखून फेरफार करणे आणि काळाच्या ओघात वाचनसंस्थांनी टिकणे आवश्यक आहे. प्रगल्भ व्यक्तिमत्त्व अन् निकोप मनाच्या वाढीसाठी येणार्‍या काळात वाचनमंदिराचे योगदान महत्त्वाचे ठरेल.