- सुधाकर रामचंद्र नाईक
वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेे दखल घेतली असून त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारतीय संघात टी-२० संघात स्थान दिले आहे. या फिरकीपटूसाठी ही नवा आत्मविश्वास देणारी बाब असून पुढील सामन्यात तो आणखी चमत्कार घडविण्यास उत्सुक असेल.
‘कोलकाता नाइटरायडर्स’चा लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीने संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या ‘इंडियन प्रिमियर लीग’च्या तेराव्या पर्वात पाच बळींचे घबाड मिळविणारा पहिला गोलंदाज बनण्याचा मान प्राप्त केला. ‘शतक’ ही जशी क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण मर्दुमकी तसेच डावात पाच वा त्याहून अधिक बळी घेणे हीदेखील तेवढीच कर्तृत्ववान बाब होय. गेल्या २४ रोजी अबुधाबी येथील शेख झायद स्टेडियमवर झालेल्या दुसर्या टप्प्यातील सामन्यात ‘कोलकाता नाइटरायडर्स’ने प्रथम फलंदाजीत ६ बाद १९४ धावांचे तगडे आव्हान खडे केले. प्रत्युत्तरात चक्रवर्तीने भेदक गोलंदाजीत घेतलेल्या २० धावांतील पाच बळींमुळे ‘दिल्ली कॅपिटल्स’ला ९ बाद १३५ पर्यंतच मजल गाठता आली आणि ५९ धावांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. चक्रवर्तीने प्रभावी गोलंदाजीत ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर, कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कुस स्टॉयनिस आणि अक्षर पटेल यांचे बळी घेत स्पर्धेंतील पहिले पाच बळी मिळविण्याचा मान प्राप्त केेला.
२९ ऑगस्ट २०९१ रोजी बिडर, कर्नाटक येथे जन्मलेल्या वरुण चक्रवर्तीने २०१८-१९ मधील मोसमात तामिळनाडूतर्फे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सप्टेंबरमध्ये विजय हजारे चषक स्पर्धेंेत आणि नंतर नोव्हेंबरमध्ये रणजी पदार्पण केलेल्या चक्रवर्तीने प्रभावी कामगिरी बजावून ९ सामन्यांत २२ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे गतवर्षीच्या मोसमात ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ने चक्क ८.४ कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला संघात घेतले, पण पदार्पणातील सामन्यातील पहिल्याच षटकात तब्बल २५ धावा मोजलेल्या लेगस्पिनरला आणखी संधीच मिळाली नाही. त्याने या एका सामन्यात केवळ एक बळी मिळविला. पंजाबने वरुण चक्रवर्तीला ‘रिलीज’ केल्यावर विद्यमान मोसमात ‘कोलकाता नाइटरायडर्स’ने संघात घेतले आणि त्याने आपला करिष्मा दर्शविला. चक्रवर्तीने आतापर्यंतच्या अकरा सामन्यांत १३ बळी मिळविले आहेत.
विशेष म्हणजे वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सीनियर सिलेक्शन कमिटीने दखल घेतली असून त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारतीय संघात टी-२० संघात स्थान दिले आहे. तामिळनाडूच्या या विस्मयकारी फिरकीपटूसाठी ही नवा आत्मविश्वास देणारी बाब असून पुढील सामन्यात तो आणखी चमत्कार घडविण्यास उत्सुक असेल.
प्रतिष्ठेच्या ‘इंडियन प्रिमियर लीग’मध्ये आतापर्यंत २१ गोलंदाजांनी आपल्या चार षटकांच्या कोट्यात पाच बळींचे घबाड मिळविण्याचा मान प्राप्त केला आहे. भारताचा ज्येष्ठतम फिरकीपटू तथा माजी कर्णधार अनिल कुंबळेची पाच धावांत पाच बळी ही आतापर्यंतची सर्वोत्तम इकॉनॉमिकल कामगिरी होय. २००८मधील शुभारंभी प्रतियोगितेत ‘राजस्थान रॉयल्स’च्या सोहेल तन्वीरने ‘चेन्नई सुपर किंग्ज’विरुद्ध १४ धावांत ६ बळी घेत आयपीएलमधील पहिल्या पाच बळींच्या घबाडाची नोंद केली होती. जेम्स फॉल्कनर आणि जयदेव उनडकड या दोघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी दोन वेळा पाच बळींचे घबाड नोंदले आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सतर्फे आतापर्यंत सर्वाधिक तीन पाच बळींच्या घबाडाची नोंद झालेली आहे तर ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघांनी प्रत्येकी तीन वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाच बळींचे घबाड दिलेले आहे.
आयपीएल ‘बळींचे पंचकवीर’
गोलंदाज संघ दिनांक स्थळ प्रतिस्पर्धी कामगिरी
१. सोहेल तन्वीर आरआर ४ मे २००८ जयपूर सीएसके ६-१४
२. लक्ष्मीपती बालाजी सीएसके १० मे २००८ चेन्नई केइपी ५-२४
३. अमित मिश्रा डीडी १५ मे २००८ दिल्ली डीसी ५-१७
४. अनिल कुंबळे आरसीबी १८ एप्रिल २००९ केपटाउन आरआर ५-५
५. लसिथ मलिंगा एमआय १० एप्रिल २०११ दिल्ली डीडी ५-१३
६. हरभजन सिंग एमआय २२ एप्रिल २०११ मुंबई सीएसके ५-१८
७. ईशांत शर्मा डीसी २७ एप्रिल २०११ कोची केटी ५-१२
८. मुनाफ पटेल एमआय १० मे २०११ मोहाली केइपी ५-२१
९. रविंद्र जडेजा सीएसके ७ एप्रिल २०१२ विशाखापट्टणम डीसी ५-१६
१०. दमित्री माश्कारेन्हासकेइपी १२ एप्रिल २०१२ मोहाली पीडब्ल्यूआय ५-२५
११. सुनिल नारायण केकेआर १५ एप्रिल २०१२ कोलकाता केइपी ५-१९
१२. जेम्स फॉल्कनर आरआर २७ एप्रिल २०१३ जयपूर एसआरएच ५-२०
१३. जयदेव उनडकट आरसीबी १० मे २०१३ दिल्ली डीडी ५-२५
१४. जेम्स फॉल्कनर आरआर १७ मे २०१३ हैदराबाद एसआरएच ५-१६.
१५. ऍडम झंपा आरपीएस १० मे २०१६ विशाखापट्टणम एसआरएच ६-१९.
१६. अँड्र्यू टाय जीएल १४ एप्रिल २०१७ राजकोट आरपीएस ५-१७.
१७. भूवनेश्वर कुमार एसआरएच १७ एप्रिल २०१७ हैदराबाद केइपी ५-१९.
१८. जयदेव उनडकट आरपीएस २६ मे २०१७ हैदराबाद एसआरएच ५-३०.
१९. अंकित राजपूत केइपी २६ एप्रिल २०१७ हैदराबाद एसआरएच ५-१४.
२०. अल्झारी जोसेफ एमआय ६ एप्रिल २०१९ हैदराबाद एसआरएच ६-१२.
२१. वरुण चक्रवर्ती केकेआर २४ ऑक्टोबर २०२० अबुधाबी डीसी ५-२०.