कोरोना बळींची संख्या ६०० पार

0
122

>> शुक्रवारी राज्यात पाच मृत्यू

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येने काल शुक्रवारी ६०० चा आकडा पार केला. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ मृत्यू झाले असून एकूण बळींची संख्या ६०२ झाली आहे. या पाच बळींमुळे ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत राज्यात १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. काल शुक्रवारी बळी गेलेल्यांमध्ये गोमेकॉत चार तर मडगावच्या हॉस्पिसियोे इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्ण इस्पितळात आणल्यानंतर चोवीस तासांत मृत्यू पावले तर एकाचा मृत्यू केवळ १५ मिनिटांत झाला.

काल बळी गेलेल्यांमध्ये वास्कोतील ७२ वर्षीय पुरुष, हळदोणा येथील ७७ वर्षीय महिला, डिचोलीतील ७० वर्षीय पुरुष, पेडण्यातील ६४ वर्षीय पुरुष व केपे येथील ३६ वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.

दरम्यान, २२ जून रोजी गोव्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये १५०, सप्टेंबरमध्ये २३४ तर ऑक्टोबरमध्ये आत्तापर्यंत १७४ जणांचा बळी गेला आहे.

२१५ नवे बाधित
राज्यात चोवीस तासांत नवीन २१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४१६ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २४०५ एवढी झाली आहे.

बांबोळी येथील गोमेकॉतील कोविड प्रयोगशाळेत नवीन १७१७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २१५ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ९८ हजार ७९२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

२४१ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी २४१ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ४०९ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०७ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी १८० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७६१ एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन ४२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

चिंबलमध्ये १३८ रुग्णसंख्या
उत्तर गोव्यात चिंबल येथे सर्वाधिक १३८ रुग्णसंख्या असून पर्वरी येथे १३५ रुग्ण आहेत. पणजीत १२५, कोलवाळ १२०, कांदोळी येथे १०९ रुग्ण आहे. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक २०८ रुग्ण आहेत. फोंडा येथे १४५ आणि वास्को येथे ११२ रुग्ण आहेत.