मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच कॅसिनो परवान्यांचे नूतनीकरण

0
260

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती

पणजी महानगरपालिकेने कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण केलेले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मांडवीतील तरंगत्या कॅसिनो बोटींच्या विषयावर भेट घेतल्यानंतर कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्यांच्या नूतनीकरणाच्या विषयावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती काल महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

आमदार बाबूश मोन्सेरात यांनी शंभर दिवसांत मांडवीतील कॅसिनो हटविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मनपाने कॅसिनोच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मांडवी नदीतील कॅसिनो चालकांना त्यांच्या कार्यालयासाठी व्यापार परवाना घ्यावा लागणार आहे. तूर्त, पणजी महानगरपालिकेने कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्यांची फाईल प्रलंबित ठेवली आहे.

मांडवीतील कॅसिनो येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याची घोषणा केली असली तरी १ नोव्हेंबरपासून कॅसिनो सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. बंद असलेल्या कॅसिनो बोटी पुन्हा कार्यान्वित करणे, कर्मचारिवर्ग, परवाने आदींमुळे कॅसिनो सुरू होण्यास थोडा वेळ लागणार आहे. पणजी मनपाने कॅसिनो व्यावसायिकांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो सुरू करण्यासाठी मान्यता देण्याची घोषणा बुधवारी केली. कॅसिनो जहाजे, कर्मचारी वर्ग आदी गोष्टींमुळे दिवाळीनंतरच तरंगते कॅसिनो सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांना कोविड मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन करावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.