नेसायमध्ये रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू

0
264

>> रेल्वे अधिकारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास सांजुझे आरियल येथील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे विकास निगम लिमिटेड या कंपनीने सुरू केलेल्या दुहेरी रेल्वेमागाच्या कामास स्थानिकांनी विरोध केला. यावेळी स्थानिकांचे नेतृत्व अभिजित प्रभुदेसाई यांनी केले. यावेळी स्थानिकांनी रेल्वे अधिकार्‍यांशी हुज्जत घालत हे काम बंद करण्याची मागणी केली. त्यावेळी रेल्वे अधिकारी व स्थानिकांत शाब्दिक चकमक उडाली. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता दि. २८ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत काम करण्यास परवानगी दिली होती.

श्री. प्रभुदेसाई यांनी रेल्वे अधिकार्‍यांना पंचायतीची परवानगी न घेता काम सुरू केल्याबद्दल जाब विचारला. त्यावर रेल्वेला या कामासाठी स्थानिक पंचायतीच्या परवान्याची गरज नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच हे काम रेल्वेच्या मालकीच्या जागेत सुरू असल्याचे ते म्हणाले.
यावर सरकारच्या परवागनीची कागदपत्रे दाखवण्याची मागणी विरोधकांनी केली असता अधिकारी ती कागदपत्रे दाखवू शकले नाहीत.

टप्प्याटप्प्याने कामास परवानगी
रेल्वे दुपदरीकरणास स्थानिकांचा विरोध तीव्र होत असल्यामुळे दक्षिण पश्‍चिम रेल्वेने मडगाव ते चांदर दरम्यान टप्प्याटप्प्याने काम करण्याचे ठरवले आहे. चांदर, नेसाय व दवर्ली अशा तीन ठिकाणी रस्ता कापून रुंदीकरणासाठी तारखा निश्‍चित केल्या आहेत. दि. २८ रोजी नेसाय, दि. २ रोजी रात्री १२ ते ५ चांदर ते गिरदोली, तर दि. ९ रोजी रावणफोंड ते दवर्लीपर्यंत परवानगी दिली आहे.