योगसाधना – ४७८
अंतरंग योग – ६३
- डॉ. सीताकांत घाणेकर
विसर्जनामागे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक अर्थ म्हणजे … मातीतून आलेली मूर्ती एक दिवस मातीतच मिसळणार. तसेच पंचमहाभूतांतून आलेले हे शरीरदेखील तसेच नश्वर आहे. मृत्यूनंतर ते मातीतच जाणार. त्याबद्दल मिथ्या शोक करू नये… हे जीवनाचे तत्त्वज्ञानही श्रीगणेश चतुर्थी शिकवते.
विश्वांत काहीही घडो- सृष्टीचे कालचक्र अव्याहत चालूच राहते. जगातील घटना- चांगल्या/वाईट, जन्म/मृत्यू, सुख/दुःख… काळाचा काहीसुद्धा संबंध नाही. भाद्रपद संपला, आश्विन आला… चतुर्थी साजरी झाली, नवरात्री आली… दसरा जवळच आहे.. तदनंतर लगेच दिवाळी येणार… मग इतर सण.
विविध सण येतात. कर्मकांडे करतो, मौजमस्ती करतो. विसरून जातो. यावर्षी कोरोनामुळे थोडे नियंत्रण आहे. त्याचे अस्तित्वही जाणवतेच आहे. अजून किती दिवस राहणार? कमी-जास्त होणार? … काहीच माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की की जगभर मानवाची चिंता वाढली आहे. समस्या वाढताहेत. अशावेळी हे उत्सव म्हणजे एक चांगला विरंगुळा असतो.
मुख्य म्हणजे भारतातील उत्सव फार गहन तत्त्वज्ञानावर आधारलेले असतात. त्याचा अध्यात्माशी सूक्ष्म संबंध आहे. संपूर्ण मनःशांतीसाठी या आध्यात्मिक पैलूचा संपूर्ण अभ्यास व चिंतन अत्यावश्यक आहे आणि या दोन्ही गोष्टी जीवनभर चालू असल्या तर जीवनविकासासाठी खूप फायदा होतो.
श्रीगणेश चतुर्थी आली तेव्हापासून आपण त्यातील तत्त्वज्ञानाचा विचार सुरू केला. सण संपला पण जीवन अविरत सुरूच राहणार. म्हणून आपण काही राहिलेल्या मुद्यांवर विचार करू या.
१. गौरीमातेने बनवलेली मूर्ती (अंगावरील मळापासून)- सुविद्य व्यक्तींनी – एवढा मळ होता का आमच्या देवीच्या अंगावर… असले बालीश प्रश्न विचारायचे नसतात. लहान बालकांचे ठीक आहे. कारण त्यांचे निरागस मन, मर्यादित बुद्धी. सूज्ञांच्या मनात असा विचारदेखील येऊ नये! त्यांनी त्याच्या सूक्ष्म, गूढ तत्त्वज्ञानावर चिंतन करायला हवे. याबद्दल विचार, मते अनेक असतील पण ज्ञान महत्त्वाचे. ज्ञानामध्ये अनेक पैलू आहेत- शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक… पण सर्व ज्ञानाचा पाया आहे तो म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. त्यामागील तत्त्वज्ञान.
१. पार्वतीने मातीपासून मुलगा बनवला. याचा अर्थ म्हणजे हे शरीर मातीचे आहे. म्हणजे ते नाशवंत आहे. आणि आपण त्या शरीरसुखाच्याच मागे धावतो आहोत. इंद्रियसुखच सर्वश्रेष्ठ आहे असा आपला समज झाला आहे. लक्षात ठेवायला हवे की शरीर हे एक फक्त साधन आहे, माध्यम आहे एका अत्युच्च ध्येयपूर्तीसाठी. पण अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे आपण त्या बहुमूल्य शरीरालादेखील व्यवस्थित सांभाळत नाही. त्यामुळे ते भयानक कष्टदायक रोगांचे संग्रहालय झाले आहे.
खरे म्हणजे त्यानंतर पार्वतीमातेने त्या शरीरात प्राणशक्ती घालून त्या बालकाला जिवंत केले. हे प्रतीक प्राणाचे, आत्म्याचे आहे. शेवटी हा आत्माच अजर, अमर आणि अविनाशी आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्या सांख्य योगाच्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला हेच समजावतात.
२. शंकर भगवान दीर्घ तपश्चर्येसाठी हिमालयात गेले होते. परत आले तेव्हा त्या अनोळखी बालकाने त्यांना घरात प्रवेश नाकारला. देवाला राग आला व त्रिशुळाने त्यांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले, असे म्हणायचे.
अशावेळी सहज एक विचार मनात येतो की तपश्चर्या करून आलेली व्यक्ती शांत असायला हवी. क्षुल्लक कारणावरून ती कोपिष्ट व्हायला नको. पण तत्त्वज्ञान काय म्हणते?…
- हा बालक आपल्या पित्याला म्हणजे शंकराला ओळखत नाही म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यामुळेच शंकराने एक अत्यंत बुद्धिमान जनावर- हत्तीचे शिर त्याला लावले. याचा अर्थ असा की ज्ञानी व्यक्तीनेतरी बुद्धी वापरून सर्व गोष्टींचा अभ्यास करायला हवा.
आपणही हेच करतो. देवांचा देव महादेव हाच आपला पिता आहे, हेच आपण विसरलो आहोत. प्रतीक रूपाने बघितले तर लक्षात येते की भगवान आम्हाला त्या नात्याची आठवण करून देतो. गर्भितार्थ आहे- अज्ञान जाऊन ज्ञान आले. इथे आध्यात्मिक अर्थ आहे- मी आत्मस्वरूप- परमात्मा शिव हे माझे पिता.
या गोष्टीची नित्य जाणीव प्रत्येकाने ठेवावी. सारांश एकच- की आपण आपल्या मातापित्याची सदैव आठवण ठेवावी. म्हणजे आपले वर्तन सद्वर्तन आपोआप होईल.
३. गणपतीचे वाहन –
आपण असा विचार करायचा नाही की अशा क्षुद्र, कुरूप उपद्रवी प्राण्याला गणपतीने वाहन का बनवले? त्याचादेखील गर्भितार्थ बघायला हवा.
उंदराचे दात अत्यंत तीक्ष्ण असतात. त्यामुळे तो कुठल्याही घट्ट अशा वस्तूला सहज तोडू, कापू शकतो. आपले विकार-वासनादेखील असेच आहेत. अनेक जन्मांच्या प्रभावामुळे ते अगदी घट्ट मनबुद्धीत बसलेले आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी आम्हाला सशक्त व्हायला हवे. हे प्रभावी विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व त्यासोबत अहंकार. त्याचबरोबर अनावश्यक बंधनेसुद्धा तोडायला हवीत.
विश्वातील सर्व समस्यांचे कारण हेच आहे. त्यांचा नाश केल्याशिवाय आपण गणपतीचे लाडके भक्त होऊ शकत नाही.
४. गणपतीची आरती –
प्रत्येक देवाच्या आरतीत देवाची स्तुती असते. गुणगायन असते. ज्यांनी या आरत्या रचल्या त्यांचा हा हेतू नाही की त्यामुळे देव प्रसन्न होऊन इच्छिलेले फळ देईल. तर भगवंताच्या गुणांचे ज्ञान झाले की भक्ताला आत्मविश्वास येतो की संकटाच्या वेळी देव आपले रक्षण करील व त्याची श्रद्धा वाढते.
गणपतीच्या आरतीतदेखील काही अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत….
- सुखकर्ता *दुखहर्ता * विघ्ननाशक * दर्शनमात्रे कामना पुरती *मंगलमूर्ती.
आपण असाही विचार करणे आवश्यक आहे की जर देव तसा आहे तर मी भक्त कसा असायला हवा?- लोकांना सुख देणारा, दुःखाचे निवारण करणारा, सर्वांचे मंगल इच्छिणारा, संकटात पावणारा…. आपणही देवाचे आवडते होऊ कारण आपण लोकांचे आवडते होऊ.
‘‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला….’’!
५. गणपती विसर्जन –
श्रीगणेश चतुर्थीचा प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीचे केव्हातरी विसर्जन करायलाच हवे. लहानपणी मुले त्या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. जेवढे दिवस गणपती घरी असेल ते दिवस अगदी मजेत, आनंदात जातात आणि मग तो विसर्जनाचा दिवस येतो. विसर्जनाला जातानादेखील थोडा उत्साह असतो. पण एकदा विसर्जन झाले मग मन उद्विग्न होते. म्हणून कदाचित वयस्कर व्यक्ती मुलांना शिकवतात…‘‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’’.
- त्यावेळी आठवण होते की गणपती पुन्हा पुढच्या वर्षी येणार आणि ते कोमल बालमन पुन्हा प्रतीक्षा करते.
लहानपणी मनात विचार येत असे की हा गणपती विसर्जन केल्यानंतर जातो कुठे? म्हणून विसर्जनाला जाता जाता म्हणतात….
‘‘गणपती पुत्र पार्वतीचा, जातो गंगा पाण्याला!’’ - इथेही अद्भुत असा सूक्ष्म भाव आहे. विसर्जनामागे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक अर्थ म्हणजे … मातीतून आलेली मूर्ती एक दिवस मातीतच मिसळणार. तसेच पंचमहाभूतांतून आलेले हे शरीरदेखील तसेच नश्वर आहे. मृत्यूनंतर ते मातीतच जाणार. त्याबद्दल मिथ्या शोक करू नये… हे जीवनाचे तत्त्वज्ञानही श्रीगणेश चतुर्थी शिकवते. तसेच आत्मा परत दुसर्या शरीरात पुनर्जन्म घेणार हे कळते.
६. मोदक –
गणपतीला आवडणारा मोदक प्रसाद म्हणून मिळाला की त्याची गोडी, मधुरता जाणवते. इथेसुद्धा गर्भितार्थ आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन असेच मधुर बनवावे ज्यामुळे आपण देवाचे लाडके होऊ.
उत्सव येतात व जातात. त्यातील गोडव्याबरोबर त्यातील तत्त्वज्ञान व अध्यात्म प्रत्येकाने समजून घेणे अत्यावश्यक आहे. तरच आपले पूर्वज, थोर ऋषिमहर्षींना आनंद होईल. भारतीय संस्कृतीचे तर हेच वैशिष्ट्य आहे.
आता जाणून घेऊ नवरात्री आणि दसर्याच्या सणातील गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ. या कोरोनाच्या आक्रमणाच्या वेळी सर्व प्रकारची शक्ती प्रत्येकाला हवी आहे. ती आपण मिळवूच. (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्ववि., माउंट अबू यांची प्रवचने).