स्तनांचे आजार भाग – १

0
370
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

लोकांच्या बेजबाबदारपणा, गैरसमज, अंधविश्वासामुळे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असूनदेखील कर्करोगाचे निदान प्राथमिक टप्प्यात होऊ शकत नाही आणि ह्या जागेचे आजार लवकर पसरतात व नंतर नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसते.

स्तन हे अवयव फक्त स्त्रियांपुरतीच मर्यादित नसून पुरुषांमध्ये देखील असतेच पण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ते जास्त व अधिक प्रमाणात विकसीत असते. अर्भकाचे व बाळाचे पोषण हेच तर प्रमुख कार्य असते यांचे. पण योग्य स्तन्यपानामुळेच तर प्राथमिक टप्प्यात प्रत्येक बाळाचा विकास होत असतो व त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढत असते. यांच्याकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन जो कित्येक लोकांचा असतो, तो बदलणे जरुरी आहे. लोक विसरत असतात की ते स्वतःसुद्धा त्यांच्या आईने केलेल्या स्तनपानामुळेच तर जिवंत आहेत.
जी परिस्थिती अगोदर होती की या विषयावर बोलणे म्हणजे एक प्रकारचे दुष्कृत्यच समजले जायचे, कलंकित विषय होता, ती परिस्थिती आता कुठेतरी बदलताना दिसते आहे. पण याबद्दल तरीही अनेकांच्या मनात गैरसमज व अंधश्रद्धा अजूनही आहेतच.
तर काही गैरसमज जे समाजात आहेत त्याबद्दल आज येथे बोलू.

  • काहींचा असा गैरसमज असतो की स्तनांची अतिरिक्त वाढ रोखण्यासाठी ब्रेसीयर(स्त्रियांचे अंतर्वस्त्र) ही घट्टच वापरली पाहिजेत जेणेकरून स्तन खाली लोंबकळणार नाहीत व शरीराची ठेव बिघडवणार नाहीत.
    हे अत्यंत चुकीचे आहे. हे खरे आहे की ब्रेसियर ह्या स्तनांना आधार व आकार देतात पण त्या अधिक काळासाठी जर वापरल्या गेल्या (दिवसात १२ तासांपेक्षा जास्त) तर दुष्परिणाम अजूनच घातक ठरू शकतात. असे केल्याने स्तनांवर दाब येईलच पण या अवाजवी दाबामुळे तेथील रक्तसंचार व रक्तपुरवठासुद्धा कमी होतो. सर्वेक्षणानुसार मध्यमवर्गीय महिला ज्या घट्ट अंतर्वस्त्र घालून वावरतात, त्यांच्यात स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाणदेखील वाढते. कारण त्या किमान तेवढा वेळतरी नक्कीच काम करतात. निदान रात्री झोपतानातरी ब्रेसियर काढून ठेवावी जेणेकरून छाती व स्तनांवरील दाब कमी होईल.
    स्तनांतील पेशींना प्राणवायू व पोषकांशांची नेहमीच गरज असते जी अशा प्रकारच्या दाबामुळे कमी होत असते. कारण त्यांचे कार्य हे स्तनांच्या हालचालीवर जास्त अवलंबून असते. स्तनांची हालचाल घट्ट ब्रेसीयर वापरल्याने मर्यादित राहते. तेथील लिम्फवाहिन्या ह्या खूपच बारीक व सूक्ष्म असतात. त्या कुठच्याही दबावाला संवेदनशील असल्याने लगेचच संकुचित होतात आणि हाच लिम्फ प्रवाह, स्तनांच्या आतील विषारी द्रव्ये (जसे डायोक्सीन-बेन्झीन सारखे टॉक्सीन्स, इतर कार्सिनोजेनिक रसायने जे स्तनातील चरबीला चिकटून असतात व शरीराला निरुपयोगी व घातक अशा गोष्टी) पूर्णपणे बाहेर वाहून नेण्यास असमर्थ ठरतो. हे सर्व तिथेच साठून राहिल्याने कर्करोगासहित विविध प्रकारच्या रोगांना आमंत्रण देते जसे की स्तनांच्या आत गाठ/गाठी उत्पन्न होणे, तीव्र वेदना, सूज येणे, लाल चकत्या येणे, त्वचा काळपट- कोरडी पडणे (विशेषतः स्तनाग्र), त्यांवर स्ट्रेच मार्क्स येणे, छाती-मान-पाठ-खांदे यामध्ये दुखणे, हात व काखेमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना, दाबामुळे डोकेदुखी यांसारख्या तक्रारी. योग्य आहार व व्यायाम यासोबत वरील उल्लेखीत गोष्टींचे पालन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. ब्रेसीयर/ब्रा हे तुमच्या स्तनांचा आकार ठरवत नसतात तर तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स व जीन्स ठरवतात हे लक्षात घ्यावे.
  • बाजारात विकत मिळणारी- स्तनांचा आकार वाढवण्यासाठीचे तैल, मॉइश्चरायझर यांसारखी सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळावे. किमान वापरण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे तरी आवश्यक. डीओडरन्ट इ. सुद्धा हानिकारकच आहेत.
    स्तनाच्या संबंधी जर काही तक्रारी जाणवत असतील तर लगेचच तज्ञ वैद्यांना/स्त्रीरोगतज्ञांना दाखवणे गरजेचे. वर्षातून एकदा तरी हे व्हायलाच पाहिजे. भीतीमुळे, लाजेमुळे परीक्षण न करून घेणे हे चुकीचे आहे.
    कॅरोटीनयुक्त फळे व पालेभाज्या खाणार्‍या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग कमी प्रमाणात होताना दिसून आले आहे/अगदीच होत नाही. चरबीयुक्त आहार ज्यांचा आहे, सतत गोड पदार्थ इ. खाण्याने स्थौल्याचे (लठ्ठपणा) रोगी त्यांना कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो. मद्यपान, धूम्रपान या गोष्टीदेखील तेवढ्याच कारणीभूत ठरतात.
    रोगाचे निदान/रोगनिश्चिती व अवस्था जाणून घेण्यासाठी वापरात येणार्‍या मॅमोग्रॅम, सोनोमॅमोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने स्तनांचा कर्करोग होत नसतो. उलट तात्काळ चिकित्सा करण्यास मदतच होत असते पण तरीही लोकांच्या बेजबाबदारपणा, गैरसमज, अंधविश्वासामुळे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असूनदेखील कर्करोगाचे निदान प्राथमिक टप्प्यात होऊ शकत नाही आणि ह्या जागेचे आजार लवकर पसरतात व नंतर नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसते.