>> हडफडे येथील छाप्यात तिघांना अटक
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने हडफडे – बार्देश येथील ग्रीन व्हिलावर रविवारी रात्री छापा मारून आयपीएल बेटिंग घेणार्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश करीत तीन जणांना अटक केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या आखाती देशात सुरू असलेल्या या मोसमातील सामन्यांच्या वेळी या टोळीने आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांचे बेटिंग स्वीकारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
शक्ती पंजाबी, विशाल आहुजा आणि हितेश केसवानी अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून सर्वजण गांधीधाम – गुजरात येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल संच आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही टोळी ग्राहकांकडून मोबाईलच्या माध्यमातून बेटिंग स्वीकारत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी राज्यात आयपीएल बेटिंग घेणार्या आठ टोळ्यांचा आजवर पर्दाफाश केला आहे. आयपीएल बेटिंग प्रकरणात अटक केलेले सर्वजण परराज्यातील रहिवाशी आहेत. हॉटेल किंवा फ्लॅट भाडेपट्टीवर घेऊन आयपीएल बेटिंग करणार्या टोळ्या ऑनलाइन वा मोबाईल ऍपद्वारे बेटिंग स्वीकारत असल्याचे उघड झाले आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर, उपनिरीक्षक नितीन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा मारला.
कळंगुट पोलिसांनी आयपीएल बेटिंग घेणार्या चार टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे, तर गुन्हा अन्वेषण विभागाने आतापर्यंत तीन टोळ्यांचा छडा लावला आहे. पर्वरी पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.