- नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट देवतांचे स्मरण करावे व शास्त्रामध्ये तात्कालिक उपाय म्हणून कुक्कुट द्विज नामक ऋषींचे स्मरण करावे.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व व्यवहार चालू असताना काही गोष्टी निसर्गनियमाप्रमाणे घडत असतात. त्या गोष्टींचा आपल्या व्यवहारात दैनंदिन जीवनात काही चांगला किंवा वाईट परिणाम होतो काय?… असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर आपल्या ऋषीमुनी, शास्त्रकार यांनी फार सखोल विचार केला व काही निष्कर्ष काढले व त्याबाबतची माहिती ग्रंथबद्ध करून ठेवली. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करावा, त्यामुळे आपले कल्याण होईल असे सुचविले. यालाच शकुन विचार असे म्हणतात. आता शकून म्हटले की त्यात दोन प्रकार येतात. शुभशकुन व अशुभशकुन. सामान्यपणे नवविचारांप्रमाणे या गोष्टी अज्ञानजन्य संज्ञेचा विषय किंवा अंधश्रद्धा मानली जाते. पण काही शकुनांचे प्रत्यंतर येते. त्यामुळे हे काही गूढशास्त्र आहे हे मानावेच लागते. शुभाशुभ शकून सर्वत्र, सर्व धर्मांमध्ये रूढ आहे. जगामध्ये सर्वत्र, सर्व संस्कृतींमध्ये हे शकुन पाळले जातात, पद्धत वेगळी असेल.
शकुनांचा विचार करताना शुभ शकुनांचा विचार, संमिश्र शकुनांचा व अपशकुनांचा विचार करूया. शकुन हे वर म्हटल्याप्रमाणे निसर्गनियमाप्रमाणे घडणार्या गोष्टींतून निर्माण होतात. शकुनांमध्ये प्रामुख्याने पाल पडणे, सरडा अंगावर चढणे, काकशब्द, दीपपतन, शिंक येणे, स्वप्ने पडणे, नेत्र स्फुरण, अवयव स्फुरण, घुबड ओरडणे, कोल्हेकुई, तारा निखळताना पाहणे, अकाली मेघगर्जना, कुत्र्यांचे विचित्र भुंकणे, गळ्यातील माळ तुटणे, तोरण तुटणे, जाते फुटणे, पाटा फुटणे, हळद फुलणे, अळू फुलणे, घरात वारूळ येणे, पाण्याचा झरा येणे, अचानक असंख्य मुंग्या येणे, चांचड येणे, रानातील काही प्राणी घरांत येणे, पलंग मोडणे, घरावर कुत्रा चढणे, बेडूक चुलीत पडणे हे सर्व शकुन आहेत. तसेच प्रवासाला निघताना काही गोष्टी अचानक दिसल्या तर त्या गोष्टींचा शुभाशुभ शकुनांत समावेश होतो.
शुभशकुनांचा विचार करताना सकाळी सकाळी भारद्वाज पक्षी दिसणे, मोर दिसणे, कुमारिका दिसणे, उजव्या डोळ्याची पापणी स्फुरण पावणे हे शुभशकुन आहेत.
संमिश्र शकुनांचा विचार करताना खालीलप्रमाणे त्याचा अर्थ लावावा लागतो. पाल अंगावर पडणे. तिची फलनिष्पत्ती अशी- डोक्यावर पाल पडली तर शुभ, कपाळ, भुवया, खालचा ओठ, दोन्ही कान, उदर, उजवा बाहू, ढोपर, पोटर्या, दोन्ही हात, रवांदा, नाभी, मांड्या, डावे मनगट, नखें, तोंड (मुख) इत्यादी अवयवांवर पाल पडली तर वेगवेगळी असली तरी शुभसूचक किंवा शुभफळे मिळतात. काहींच अवयवांवर पडली तर अशुभ फळे आहेत. जास्त करून पावसाळा संपत असताना पाल पडली तरच प्रश्न पहावा.
प्रायः पुरुषांच्या उजव्या व स्त्रियांच्या डाव्या भागावर असेल तरच विचार करावा. पाल अंगावर पडली तर लगेच अंगावर असलेल्या कपड्यांनिशी सचैल स्नान करावे व शंकराच्या मंदिरात किंवा देवघरात तुपाचा दिवा लावावा व नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. दोष असेल तर दूर होतात. पल्ली पतनाचा विचार करताना हल्ली विजेच्या दिव्याजवळ येणारे जीवजंतू खाण्याकरिता अनेक पाली येतात. त्यामुळे सारासार विचार करून निर्णय घ्यावा. सरडा मात्र अंगावर अचानक चढला तर अपशकून समजावा व त्याकरिताही वरीलप्रमाणे उपाय करावा. कावळा रात्रीचा ओरडणे अपशकून आहे. पण शहरांत विजेच्या मुळे प्रकाश असतो व एखादेवेळी कावळे ओरडतात. हा शकून मानू नये. काकस्पर्श हा अपशकून आहे. पण आपण मोठ्या झाडाखाली आहोत. झाडावर कावळे आहेत. खाद्यपदार्थ घेऊन आपण जात आहोत. हातात खाद्यपदार्थ आहे. यावेळी काकस्पर्श झाला तर अशुभ मानू नये. स्नान मात्र करावे. स्वच्छतेकरिता आवश्यक आहे. घुबड हा पक्षी निशाचर आहे. तो दिवसा ओरडला तर अशुभ सूचक आहे. कोंबडा रात्री ओरडणे अशुभ. पण त्याच्या खुराड्यांत साप येणे वगैरेमुळे ओरडला तर काही दोष नाही. पण अचानक ओरडला तर अशुभसूचक. म्हणून खुराड्याचे मालक त्याची व्यवस्था करतात. कोल्हेकुई सुद्धा अशुभ सूचकच आहे. पण हल्ली कोल्हेकुई ऐकायलाच मिळत नाही. विशेषतः भालू ओरडणे वाईट आहे. कुत्रा घरावर चढणे अशुभ आहे. पण आता तो अपशकून कालबाह्य झाला आहे. पहिल्या, दुसर्या मजल्यावर कुत्रे पाळले जातात. वन्य पशू, पक्षी, जनावरे घरांत येणे अपशकून आहे. पण आपण त्याचा अधिवास असलेल्या रानांत घर बांधले असेल तर सारासार विचार करून याबाबत ठरवावे लागेल. नेत्रस्फूरण शकुन आहे. पण परंतु परत-परत डोळा लवत असेल तर वातविकारामुळे होतो असा विचार करण्याची गरज नाही. स्त्रियांचा डावा डोळा शुभ व पुरूषांचा उजवा शुभ, त्यानुसार प्रश्न पहावा. वरील पापण्या लवल्यास शुभ आहे. शिंकेचा शकुन हा परत-परत शिंक आली तर काहींही विचार करू नये. एकच शिंक आली तर शकुनाचा विचार करावा. ती नैऋत्य दिशेची शुभ मागून आली तर चांगली. आसनांवर शयनकाळी, दान देतेवेळी, भोजनाचे वेळी, डाव्या बाजुला मागे शिंक आली तर शुभ सूचक आहे. पूर्व दिशेची अशुभ आहे.
स्वप्नामधूनही काही शुभाशुभ शकुन दिसतात. मात्र स्वप्नाचा विचार करताना काही गोष्टी लक्षांत घेणे आवश्यक आहे. स्वप्ने माणसाला सतत पडत असतात. झोपल्यानंतर बाकी देहाचे सर्व कार्यक्रम थांबतात व मनाचे सुरू होतात. त्यावेळी ती स्वप्ने दिसतात. स्वप्न पडण्याची कारणे म्हणजे अपचन, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, अर्धवट झोप, आरोग्यात बिघाड अति चिंता यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. दुसरे ‘मनी वसे ते स्वप्नी दिस’. याशिवाय अर्धपोटी झोपणे, झोपतेवेळी तहानलेला असणे. यामुळेही स्वप्ने पडतात. पण ही स्वप्ने म्हणजे वासनाविकार असतात. पण काही स्वप्ने अपूर्ण असतात. ही भविष्यसूचक असतात. पण स्वप्ने पडली म्हणून घाबरू नये. कारण रात्रीच्या कुठल्या भागामध्ये स्वप्न पडले यावर शुभ-अशुभ ठरते. उत्तररात्री गाढ झोपेत, अरुणोदय-काळी पडलेल्या स्वप्नांचाच विचार करावा. हीच स्वप्ने शुभाशुभ संकेत देणारी ठरतात. याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. काही नमुनादाखल शुभाशुभ स्वप्ने सांगतो.
नदी, समुद्र, राजवाड्यावर चढणे, विष्ठा अंगास लागणे, मद्यपान, दही भाताचे जेवण, खिरीचे भोजन, पांढरे वस्त्र, गंध फुले, रत्ने अलंकार, सुवासिनी स्त्रिया, आपल्याला बांधलेले पाहणे. पांढरा सर्प उजव्या हाताला चावणे, जंगलात भटकणे, आपल्या शरीरातून रक्त जाणे. प्रेत दर्शन, गायन वादन, ऐकणे अशी काही स्वप्ने शुभ फळ देणारी ठरतात. काही अशुभ फळ देणारी स्वप्ने आहेत. पळस, कडुनिंब यावर चढणे, घड्याळ बंद पडलेले दिसणे, कोळसे, तांबडे वस्त्र दिसणे, उंचावरून खाली पडणे, मधमाश्या उडताना दिसणे. काळा व नग्न पुरुष दिसणे, बंदुकीचे आवाज ऐकणे यांसारखी काही दृश्ये स्वप्नात दिसली तर अपशकून समजावे. एखाद्या माणसाचा मृत्यू स्वप्नांत आपल्याला दिसला तर त्याला शुभसूचक असून आपल्याला अशुभ सूचक आहे. परंतु अशुभ स्वप्ने पडली तरी घाबरून न जाता घरांत सप्तशती पाठ, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्र वाचावे किंवा दुसर्याकडून वाचून घेऊन आपण ऐकावे. स्वप्नातील शुभाशुभ शकुनाशिवाय आणखीही काही शुभाशुभ शकून आहेत. परसात हळद फुलणं शुभशकुन आहे. पण अळू फुलणे अपशकुन मानतात. तारा निघालेला पाहणे, अकाली मेघगर्जना, धूमकेतू दिसणे हे राष्ट्रावर म्हणजेच सर्वांवर येणारे अशुभ सूचक आहे. पलंग मोडणं, पाटा फुटणे, जाते फुटणे, सहाण फुटणे याबाबत सारासार विचार करून शुभाशुभ ठरवावे.
पलंग जुना पोटवाळवी लागलेला, लाकडी असेल तर मोडू शकतो. पाट्यावर काहीतरी मोठी वस्तू नजरचुकीने आपटली गेली, जात्यावरतीही तसेच काही घडून मानवी चुकीने झाले असले तर शुभाशुभ ठरविताना त्याचा जरूर विचार करून निर्णय घ्यावा. घरांत वारूळ येणे व झरा येणे अशुभ आहे. पण घर बांधताना वारुळाच्या जागेकडे किंवा द्वाराकडे दुर्लक्ष झाले असेल. योग्य तपासणी झाली, वाळवी प्रतिबंधक औषध पायामध्ये जमिनीमध्ये घातले नसेल तर फारसा विचार करणे गरज नाही. पण पहिल्या मजल्यावर फरशी बसविलेली असताना वारूळ येणे झर्यासारखे पाणी येणे ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. हे मात्र अशुभ मानून दैवी उपासना करावी. अचानक घरांत मुंग्या येणे (चांचड) हे अशुभ मानले जाते. घरात पावसाळ्यांत ओल येते. दुर्लक्षामुळे तशीच राहते ती बंद करूनही मुंग्या आल्या तरच विचार करावा.
आता प्रवासाला निघतानाचे शुभाशुभ शकुन बघुया. रोजच्या कामालांसुद्धा काही काही गोष्टी घडतात. बाहेर निघताना रिकामी घागर घेतलेली स्त्री दिसणे वाईट. पण जवळच विहीर किंवा सार्वजनिक नळ असेल तर शुभाशुभ नाही. कुमारी दिसली तर शुभ पण समोर शाळा असेल तर त्याचे काही मानण्याची जरुरी नाही. पण प्रायः शुभशकुन म्हणून पुढीलप्रमाणे पुरोहिताच्या वेशातील दोनपेक्षा जास्त ब्राह्मण, कुमारी, मुलाला कडेवर घेतलेली स्त्री. घागर पाण्याने भरलेली घेतलेली स्त्री. शवनयन, गाय, घोडा, मोर, मुंगूस, पांढरा बैल, हत्ती अनेक फळे, वानर, अस्वल, उजव्या बाजूने बसलेला अंग खाजवणारा कुत्रा, देवाचे सिंहासन, मृदंगादी वाद्ये, स्वच्छ वस्त्र, पंचामृत ही विशेषत: डावीकडून उजवीकडे जाणे शुभ शकुन आहेत. व मद्य प्यायलेला, जटा वाढलेला साधू, नग्न दारू पिऊन पडलेला, गर्भिणी स्त्री, मांजराचे भांडण, कुत्र्याचे भांडण, रेड्याची, बकर्याची झुंज, काळा बैल, रेडा, डावीकडे जाणारे मांजर, मिठाची गाडी, रुग्णवाहिका, लाकडाची मोळी, गळ्यातील माळ तुटणे, घड्याळाचा पट्टा तुटणे हे अपशकून मानले जातात. सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत दिनक्रम चालू असतात. घटना घडत असतात. पंचमहाभूतांची क्रिया चालू असते. पण आपणाला याची काही पूर्वसूचना मिळावी म्हणून ही रचना त्याच्यातूनच निर्माण झाली आहे. घटना टळत नसतात. पण आपणाला काही पूर्वसूचना मिळतात. चांगल्या किंवा वाईट गोष्टीबाबत मानसिक तयारी होते. काही अतर्क्य गोष्टी दिसतात. अस्मादिकांच्या जीवनातील हल्लीची घटना स्वप्नामध्ये… मी नेसलेल्या पिवळ्या रंगाचे सोवळे मुंग्यांनी पूर्णपणे खाऊन टाकल्याचं अंगावर असताना मला दिसले. त्या सोवळ्याचे मी विसर्जन केले. पण नंतरच्या काही दिवसांनी मला काहीतरी त्वचारोग झाला. बरा होण्यासाठी खूप काळ गेला. त्वचारोगतज्ञ, इतर डॉक्टर व दैवी उपासना (शंकराची व देवीची) यामुळे मी बरा झालो. ईश्वरी कृपा होती जमले व उपासना मी स्तव: ४१ दिवस अनुष्ठान केले. महारुद्र जप व हवनद्वारा नवचंडी आवश्यक तेवढेच ब्राह्मण बोलाविले. मी स्वत: जप केला. अर्थांत सर्वांना हे जमणारे नाही.
अशा प्रकारचे प्रसंग येतच असतात, शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट देवतांचे स्मरण करावे व शास्त्रामध्ये तात्कालिक उपाय म्हणून कुक्कुट द्विज नामक ऋषींचे स्मरण करावे.
॥ दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वैद्विज॥
॥ स्मरणमात्रेण भवेत् दु:शकुन: शुभ:॥
यांचे स्मरण केले असता दु:शकुनाचा परिहार होऊन शुभ शकुनाप्रमाणे फळ मिळते. त्या मंत्राचा यथाशक्ति जप करावा.
॥ कश्चित दु:ख माप्नुयात्॥ असे म्हणून थांबतो.
॥ इति शुभं॥