तोरण

0
487
  • मीना समुद्र

आपण फारसे पुढारलेले नसलो तरी चालेल; मनात मात्र तोरण अवश्य हवे. आपल्या सुसंस्कारांची, सुविचारांची फुले-पाने त्यात गुंफायला हवीत. मग माणुसकीच्या घराची शोभा, सौंदर्य आणि आब नक्कीच वाढेल यात शंका नाही.

लहानपणी आम्ही राहत होतो त्या वाड्याच्या मालकाच्या लाडक्या लेकीचं लग्न ठरलं आणि सार्‍या वाड्यात उत्साह नुसता ऊतू चालला. घरंदाज पाटील ते. गावाबाहेर जमीनजुमला, शेतीवाडी. स्वभाव दिलदार. वाड्यातली सारी घरं, कुटुंबं आपलीशी केलेली, त्यामुळे सगळ्यांना आपल्याच घरचं कार्य असं वाटत होतं. गृहकार्यादिवशी वाड्याच्या मुख्य दरवाजाला मुलीच्या मामाने चांगले पाच नारळांचे तोरण लावले ते पाहून सगळ्यांचे डोळे निवले आणि मन आनंदाने नाचू लागले.

तोरणाच्या सोनेरी कागदाची करामत उन्हात झळाळू लागली. समांतर लाकडी कामट्यांवर सोनेरी कागद चिकटवून शंकरपाळ्याच्या आकारात शंकर, लक्ष्मी, सरस्वती अशी चित्रे होती. मधोमध विघ्नहर्त्या गणेशाचं चित्र होतं. ॐ, स्वस्तिक, कलश, कोयर्‍या, हत्ती, मोर अशी शुभचिन्हेही रेखलेली होती. वर फेट्याचा तुरा असावा तशा पाच तुर्‍यांनी ते तोरण नटले होते. आणि चंदेरी, सोनेरी कागदांच्या चमचमत्या फुलांच्या माळा अंतराअंतरावर झिरमिरत आणि झिलमिलत होत्या. गडदगुलाबी रंगाचा गोंडा असावा तशी गेंदेदार फुले त्या प्रत्येक छोट्या वीतभर माळेच्या खालच्या टोकाशी त्या तोरणाची एकूणच शोभा वाढवीत होती. उन्हात झमकन् चमकून हलणार्‍या, डुलणार्‍या त्या माळा खुदकन् हसल्यासारख्या वाटत होत्या. आतल्या राहत्या घराच्या दारालाही असंच एक सोनेरी तोरण लागलं अन् संपूर्ण वाड्यालाही झेंडूंच्या माळा आणि दाराला तोरणं लागली… आनंद, उत्साहाचं प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरलं.

आजही कुठल्या दाराला असं चंदेरी-सोनेरी तोरण दिसतं तेव्हा मला ते वाड्याचं तोरण आणि माणसांचा उत्साह आठवतो. लग्नमुंजीच्या निमित्तानं लावलेली तोरणं त्या घराच्या शुभकार्याचं सूचन करतात. सडा, रांगोळी ही नित्यनियमाची गोष्ट असली तरी तोरण हे विशेष कार्याचं सूचन करतात. शुभकार्य झालं आहे किंवा होणार आहे त्यामुळे हेही कळतं.

लग्नमुंजीप्रमाणेच पायाभरणी, गृहप्रवेश, उदकशांत, ऋतुशांत, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, लक्ष्मीपूजन अशा सणा-उत्सवांची सुरुवातच तोरण बांधून होते. गुडीपाडव्यापासूनच अशा तोरणबंधनाला सुरुवात होते. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन या शुभसमयीही तोरण अवश्य लागतेच. रामकृष्णादी देवांचा जन्मोत्सव असो की घरातल्या नवजात बाळाचा नामकरणविधी असो- घराच्या दर्शनी दाराला तोरण लागतेच. ही तोरणं असतात फुलापानांची. फुलं झेंडू, शेवंती अशी गेंदेदार आणि पानं आंब्याची हिरवीकंच. तोरण प्रवेशद्वारीच स्वागतासाठी असते; ते पाहूनच मन प्रसन्न होते. निसर्गातल्या पानाफुलांसारख्या सुंदर गोष्टी एकत्र गुंफून केल्यामुळे ही तोरणं सुंदर साजिरी दिसतात आणि घरच्यांच्या मनातले गोड गोजिरे भाव व्यक्त करतात. हौस आणि आनंदाचं प्रकटन तोरणांनी होतं. बालकवींना श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळात आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य म्हणजे तोरणच वाटते. ‘वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगलतोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे’ असे त्यांनी श्रावणगीतात म्हटले आहे. ‘तोरण’ या शब्दाचा अर्थच मुळी माळ किंवा आरंभ. श्रावणातले इंद्रधनुष्य म्हणजे पुढे येणार्‍या सार्‍या सणांची नांदीच जणू. मनातला उसळता आनंद व्यक्त करण्याचं आणि सौंदर्य, शोभा वाढविण्याचं ते जणू एक साधनच. भाद्रपदात फुलापानांच्या तोरणाखाली औक्षण स्वीकारूनच बाप्पा घरात येतात. आनंदाचे कंदच असे झेंडूचे पिवळे-केशरी गेंद आणि पावसाने आणखीच सतेज झालेली आंब्याची हिरवीकंच पाने. अशी तोरणातल्या रंगांची खुलावट सणाची शोभा आणखीनच वाढवते आणि घटस्थापनेपासून दसर्‍यापर्यंत अशी तोरणे दारावर मिरवत राहतात. कोजागिरीला तर जणू आकाशाला देवकन्यांच्या हातांनी गुंफलेली तारकांची तोरणेच लागतात.

तोरण म्हणजे खरं तर हार किंवा फुलांच्या माळाच. दाराच्या वरच्या बाजूला या माळांच्या मधेमधे उलट्या कमानी करून टांगलेल्या, त्यामुळे ही झुलती तोरणे आणि त्यात गुंफलेली पाने वार्‍याने फडफड करीत आंदोळत राहून घराचे चैतन्य साकार करतात आणि घराला चैतन्यही आणतात. फुलांचे हार किंवा माळा समारंभप्रसंगी, संमेलनप्रसंगी भिंतीवर, पडद्यांवर, दाराच्या चौकटीवरून, खिडक्यांवरून सोडतात. पण ही मात्र तोरणे नव्हेत.

तोरणातली फुलंपानं सदासर्वकाळ ताजी टवटवीत राहत नाहीत. सुकतात, पाकळ्या गळतात, त्यामुळे काही दिवसांनी त्यांचे सौंदर्य ओसरते. पण घराचे सौंदर्य, शोभा, प्रेम, आतिथ्य, आशीर्वाद कायमचा देणारी ही तोरणे लहानमोठे रंगीत मणी, क्रीशी, लोकर वा दोरा विणून, कापडी किंवा प्लॅस्टिकची केली जातात. पूर्वीच्या घरातून दारांना काचनळ्यांची तोरणे असत. ती वार्‍याने किंवा येणार्‍या-जाणार्‍याच्या हलक्याशा धक्क्याने किण्‌किण् वाजत. मंद डोलण्याने आणि त्या नादाने मनाला आनंद होई.

आमच्या सोसायटीत एक गुजराती कुटुंब राहते. त्यांच्याकडे गडद रंगाच्या कापडांची रंगसंगती साधून, मण्या, टिकल्या, आरशांनी सजवून केलेले तोरण दाराला लावलेले. त्याला खाली सुंदरसे गोंडे आणि अधूनमधून अगदी छोट्या वजनाला हलक्या अशा धातूच्या घंटा आहेत. त्यांचाही मंद मंद वार्‍यावर हलल्या की मंजुळ नाद उठतो आणि मन प्रसन्न होते. मग सोसायटीतल्या काहीजणींनी तिला पुढच्या वेळी गुजरातहून येताना अशी सुंदर तोरणं आणायला सांगितलं होतं. अगदी चैत्रांगणाच्या रांगोळीत गौरीच्या घरावरही असे मंगलसूचक तोरण काढले जाते. मंदिराच्या दारांना, गर्भगृहाच्या दारासाठी अतिशय भक्तिभावाने विणलेली, भरलेली, स्वतःच्या हाताने तयार केलेली तोरणे लावली जातात. कुणीकुणी आपल्या ऐपतीप्रमाणे ५, ९, ११ अशा नारळांची तोरणे नवसाची पूर्तता करताना देवालयात बांधतात, अर्पण करतात.

आनंद, पावित्र्य, प्रसन्नता, मंगलसूचन, आरंभ असे सारे शुद्ध सात्त्विक भाव तोरणाद्वारे व्यक्त होत असतात. पूज्य सानेगुरुजींच्या एका लेखात असा उल्लेख वाचला की कोकणात नवान्नपौर्णिमेला दारावर शेतातल्या धान्याचं तोरण भाताच्या ओंब्या, नाचणीची कणसं, झेंडू-कुर्डूची फुलं, आंब्याची पानं गुंफून तोरण तयार करतात आणि त्याला ‘नवे’ हाच शब्द आहे. इंदूरच्या राजवाड्याच्या दारावर गहू, खसखस यांची पिके दाखविली आहेत. एकूण काय तर तोरणं ही नव्याची आणि समृद्धीची सूचकही असतात.

काव्यात आणि साहित्यातही तोरणांचा उल्लेख आढळतो. ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या ‘निरोप’ कवितेत ‘बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण| पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझे करीते औक्षण’ असे म्हटले आहे. छत्रपती शिवरायांनी गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि तो गड मग ‘तोरणागड’ झाला. कविवर्य सुरेश भटांनी एके ठिकाणी म्हटले आहे- ‘ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे| हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले…’

‘पिंजरा’ चित्रपटातल्या एका लावणीत ‘पापण्यांची तोरणं लावून डोळ्यांवरती, ही नजर उधळिते काळजातली पिर्ती’ असा उल्लेख आढळतो आणि तोरण म्हणजे प्रतीक्षेचं प्रतीकही वाटू लागतं. इंदिरा संतांच्या कवितेतही रांगोळी-तोरणाचे उल्लेख येतात. लहानपणी वडीलमंडळींच्या तोंडून ‘कुणाच्याही मरणाला आणि तोरणाला जायला चुकू नये’ असा रिवाज ऐकला होता. आज कोरोनाच्या महामारीमुळे तो पाळता येत नाही ही अतिशय दुःखाची आणि मन व्याकुळ करणारी गोष्ट आहे. ‘मरण आणि तोरण’ या शब्दात फक्त दोन यमकांची जुळणी नाही तर मनुष्यमात्रांचे कर्तव्य आणि त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. माणसांनी सदैव एकमेकांच्या सुख-दुःखाचे सोबती आणि साथी बनून राहावे. लग्नमुंजीसारख्या सुखकारक, आनंददायक (तोरण) प्रसंगात तर खांद्याला खांदा लावून सामील व्हावेच, पण मरणाच्या, मनुष्यजीवनाच्या अंतप्रसंगी त्याच्या आप्तेष्टांच्या दुःखातही सामील व्हावे. सांत्वन करावे. प्रसंगी खांदाही द्यावा.
आपण फारसे पुढारलेले नसलो तरी चालेल; मनात मात्र तोरण अवश्य हवे. आपल्या सुसंस्कारांची, सुविचारांची फुले-पाने त्यात गुंफायला हवीत. मग माणुसकीच्या घराची शोभा, सौंदर्य आणि आब नक्कीच वाढेल यात शंका नाही.