- दत्ताराम प्रभू-साळगावकर
रसाळ वाणी ही एक प्रकारची दैवी देणगी असते. भाषेपेक्षा रसाळ वाणी मनाला भिडते, भावते, अंतरात शिरते. भाषा, वाणी, लिखाण या सर्वात शब्दसामर्थ्य असते; पण परिणामकारक होते ते वापरणार्याच्या तर्हेवर, पद्धतीवर.
भाषा म्हणजे काय? आपण बोलतो, सांगतो, लिहितो ती; म्हणजे आपण बोलण्यासाठी, सांगण्यासाठी, लिहिण्यासाठी वापरतो ते शब्द. भाषेपेक्षा वाणी वेगळी असं मला वाटतं. वाणी म्हणजे आपण जे बोलतो ते. वाणी ही भाषेवर अवलंबून असते; पण भाषेपेक्षा वेगळी असते. वाणीला स्वर किंवा नाद असतो असं मला वाटतं. भाषा सुंदर असतेच, ज्ञानेश्वर माऊलींसारखी; पण वाणीही रसाळ असते, ऐकायला बरी वाटते. बोलणं आवडलं तर आपल्या ओठावर शब्द येतात- ‘काय रसाळ वाणी!’ भाषेतील शब्दांतून काढलेला मधुरस म्हणजे वाणी! भाषा सर्वांना येते, माहीत असते; पण माझ्या मते वाणी सर्वांना असतेच असं नाही. कारण सर्वांची वाणी सारखी नसते, वेगळी असते. रसाळ वाणी ही एक प्रकारची दैवी देणगी असते. भाषेपेक्षा रसाळ वाणी मनाला भिडते, भावते, अंतरात शिरते. भाषा, वाणी, लिखाण या सर्वात शब्दसामर्थ्य असते; पण परिणामकारक होते ते वापरणार्याच्या तर्हेवर, पद्धतीवर.
लिखाण म्हणजे मनातले विचार, कल्पना कागदावर उतरवणारं. त्यात रसाळपणा, माधुर्य असतंच. ते वाचताना मनाला भावतं, मन सुखावतं, आनंदतं, दुखावतं… सर्वकाही! गोष्टीचे पुस्तक, कादंबरी वाचताना ओठावर, तोंडावर हास्य येतं. काहीवेळा मन गंभीर बनतं, विचारमग्न होतं. काहीवेळा रडूही येतं. भाषेला असल्या गोष्टी वर्ज्य नाहीत, कारण योग्य जागी, योग्य वेळी वापरलेल्या शब्दांचा तो परिणाम किंवा परिपाक असतो. भाषा रुक्षही असते, ती वापरणार्याच्या तर्हेमुळे. वाणी व लिखाण यांचा परिणाम वेगळा असू शकतो. कोणी एक चांगलं लिहू शकतो, पण चांगला वक्ता होऊ शकेलच असं नाही. वक्ता सहस्रेषु असं काहीतरी वचन आहे. वक्ता तरी कसा असावा? त्याच्या भाषणाने ऐकणारे म्हणजे श्रोते तल्लीन व्हायला हवेत, रममाण व्हायला हवेत. आमच्या लहानपणी आजच्यासारखी मनोरंजनाची साधने नव्हती. लहानपणी आम्ही कीर्तनाला जायचो; नव्हे आमच्या घरातले वडीलधारे आम्हाला आवर्जून न्यायचे. भाषा, वाणी, संगीत, प्रसंग यांचं मधुरमीलन त्यात असायचं. ते दिवस जवळ जवळ गेले याची खंत वाटते. ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये केवढा गहन विषय हाताळला! आपल्या रसाळ भाषेनं सर्वांना समजेल, उमजेल, रूचेल अशा शब्दांनी सोपा करून सर्वसामान्यांपर्यंतच पोहोचवला! धन्य ती माऊली! त्या काळी असल्या गोष्टीना मोठे किताब, पारितोषिकं नव्हती. सर्वसामान्यांचं समाधान हाच मोठा किताब होता, नोबेलपेक्षाही मोठा! आजच्या काळी माऊली असती तर त्यांच्या रसाळ भाषेवर अवघे विश्व तरले असते!
काही वक्ते असे असतात की त्यांची भाषणं रटाळ असतात. श्रोते कंटाळतात. वाट बघतात केव्हा त्यांचं भाषण संपतं त्याची! वाटल्यास ‘सभात्याग’ही करतात. बर्याच वेळा सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यक्ती आणतात. त्यांचं भाषण ऐकण्यासाठीच विशेषतः लोक जमलेले असतात. सुरुवातीची भाषणं रटाळ असली तरी नाईलाजाने बसतात व प्रमुख पाहुण्यांचं भाषणं संपलं की हॉल जवळजवळ रिकामा व्हायला लागतो. आयोजकांना माईक हाती घ्यावा लागतो व लोकांना सांगावं लागतं की सभा अजून संपलेली नाही! विनंती करावी लागते की सभा संपेपर्यंत कृपया उठून जाऊ नका! हा परिणाम भाषेचा, वाणीचा असतो! भाषा चांगली, वाणी रसाळ असेल तर श्रोते जागेला खिळून बसतात, मंत्रमुग्ध होतात!
काही लोकांची भाषा शिवराळ असते, कठोर असते… भांडण करतात तशी! माझ्या माहितीचे एक गृहस्थ एका ऑफिसात होते. कर्मचार्यांकडून त्यांना न आवडणारं काही घडलं की अंगावर धावून जातात तसे ओरडायचे, तेही सर्वांसमक्ष. काही चुकलं तर मागाहून सांगता येतं व असं करणं बरं असतं. पण त्यांचा स्वभाव, त्याला कोण काय करणार? मला एक कर्मचारी म्हणाला, ‘काहीही झालं तरी खायला येतात.’ मी त्याला गमतीनं म्हणालो, ‘ते ओरडत नाहीत, त्यांचा आवाज थोडा मोठा आहे.’ असा प्रकार रोजच घडायला लागला तर ऐकणार्याना त्याची सवय बनून जाते व त्यांची कातडी गेंड्याची बनते!
असा एक प्रकार मी स्वतः पाहिला. दोन व्यक्तींची कशावरून तरी वादावादी झाली. एक समंजस व दुसरा असमंजस. दुसर्याची भाषा शिवराळ. पहिला म्हणाला, ‘मला तुझ्यापेक्षा एक शिवी जास्त येते, पण मी शिव्या घालणार नाही, कारण मला ते शोभत नाही. तुला येतील तेवढ्या घाल, त्या मी तुलाच साभार अर्पण करतो.’ दुसरा ओरडून ओरडून घसा बसला तसा गप्प झाला. माझी ऐकून थोडी करमणूक झाली.
आमच्या घराशेजारी एक नारळांच्या झाडांची बाग होती. त्यात एक घर होते. बागेच्या मालकाने ते असंच कोणाला राहायला दिलं होतं. मालकाचं स्वतःचं घर दुसरीकडं होतं. मालकाचा फायदा असा व्हायचा की तो मनुष्य त्या घरात राहत असल्यामुळे नारळ चोरीला वगैरे जात नव्हते. वार्याने पडलेले नारळसुद्धा तो मनुष्य गोळा करून ठेवायचा व मालक येईल त्यावेळी प्रामाणिकपणे त्याला द्यायचा. खरं म्हणजे हा अतिरिक्त फायदा. त्यामुळे मालक नारळ पाडायला आला की दहा-पंधरा नारळ त्याला द्यायचा. दोघेही खूश. मालक वारला व त्याचा मुलगा नारळ पाडण्यासाठी यायला लागला. त्यानं त्या मनुष्याला नारळ देणं बंद केलं. पाडलेले सर्व नारळ घेऊन जायला लागला. असं एकदोनदा झाल्यावर मालकाचा मुलगा व हा घरात राहणारा गृहस्थ यांचा काहीसा वाद व्हायला लागला. त्या गृहस्थाचं म्हणणं असं की, तो त्या बागेतल्या घरात राहतो म्हणून तर नारळाचं पूर्ण उत्पन्न त्याला मिळतं; तो राहत नसला तर पडलेले सोडाच, पण माडावरचे नारळ पण चोरीला गेले असते! पण मालकाचा मुलगा त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायचा. एक दिवस वादावादी जरा मोठी झाली. तो गृहस्थ मालकाच्या मुलाला म्हणाला, ‘येतोस व सर्व नारळ पाडून घेऊन जातोस. बागेची राखण मी करतो, म्हणून तर तुला एवढे मिळतात. मी नसतो तर एक बोंडका पण मिळाला नसता. सुरुवातीच्या काळात पाणी घालून मी माड मोठे केले. तू काय केलंस? पाणी घालायचं सोडाच, त्या माडांच्या मुळात कधीकाळी येऊन मुतला तरी होतास?’
तो मुतला असेल की नाही देव जाणे!
पण भाषा व वाणीमुळे आमची करमणूक मात्र झाली!