दीनदयाळ योजनेखाली कोविड उपचार नाहीत ः मुख्यमंत्री

0
277

कोविडवरील उपचार योजना दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली आणायचा विचार नाही यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे, असा खुलासा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना त्यासंबंधी छेडले असता त्यांनी वरील खुलासा केला.
राज्यातील सरकारी इस्पितळात कोविड रुग्णांवर दर्जेदार असे उपचार केले जात आहेत. सरकारने कोविड रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी राज्यात आवश्यक ती सगळी साधनसुविधा उभारली आहे. दक्षिण गोव्यात ईएसआय इस्पितळ व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. तर उत्तर गोव्यात गोमेकॉत उपचार केले जात आहेत.

रुग्णांसाठी खाटांची कमतरता होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर्सचीही सरकारने सोय केली होती, असे सावंत म्हणाले.
ज्या रुग्णांना स्वतंत्र खोली हवी असते असेच रुग्ण खासगी इस्पितळात जाणे पसंत करतात, असे सांगून सरकारी इस्पितळात चांगली सोय असल्याने आता कोविड उपचार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली आणण्याची गरज नसल्याचा खुलासा डॉ. सावंत यांनी यावेळी केला.