अजातशत्रु

0
330

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर बिहारचा एक खंदा सुपुत्र राजकीय रणांगणातून कायमचा निघून गेला. मात्र, जाण्यापूर्वी अवघ्या ३७ वर्षांच्या आपल्या सुपुत्राकडे आपल्या पक्षाची कमान देऊनच रामविलास पासवान गेले आहेत. बिहारच्या अंधार्‍या राजकारणामध्ये येत्या निवडणुकीत आपला हा चिराग उजळेल अशा अपेक्षेत ते नक्कीच होते, परंतु आपल्या लोकजनशक्ती पक्षाची कमान सांभाळणार्‍या आपल्या मुलाचे यशापयश मात्र ते आता कधीच पाहू शकणार नाहीत.
रामविलास पासवान हे बिहारमधून वर आले, परंतु त्यांची बहुतांशी कारकीर्द ही बिहारपेक्षा राष्ट्रीय राजकारणाशीच जोडलेली राहिली. बदलत्या वार्‍याचा अंदाज घेण्यात त्यांच्याएवढा निष्णात कोणीच नसेल. म्हणूनच तर त्यांचा उल्लेख पत्रकार नेहमी ‘मौसम वैज्ञानिक’ म्हणूनच करायचे! विश्वनाथ प्रतापसिंग, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग किंवा नरेंद्र मोदी. केंद्रात सत्ता कोणाचीही असो, सत्तेच्या गाड्याबरोबर पासवानांची नळ्याची यात्रा नेहमीच राहिली. अचूक राजकीय अंदाज बांधून प्रत्येक निवडणुकीपूर्वी कोणाच्या गोटात शिरायचे याची रणनीती आखणार्‍या पासवानांचे अंदाज क्वचितच चुकायचे. त्यामुळे विश्वनाथप्रतापसिंगांच्या सरकारमध्ये जसे ते त्यांचे विश्वासू सहकारी बनले, तसेच वाजपेयींचाही विश्वास कमावू शकले. मनमोहनसिंगांशी त्यांचे सूर जुळले, तसेच नरेंद्र मोदींचाही भरवसा ते कमावू शकले. खरे तर दलितांमधील एका उपजातीतून ते आले होते, परंतु बिहारमधील एक दलित नेता अशी नव्हे, तर जवळजवळ उत्तर भारतातील दीनदलितांचा चेहरा अशी स्वतःची ओळख पासवान यांनी बनविलेली होती, ज्याचा फायदा त्यांना प्रत्येकवेळी होत गेला. राज्याच्या राजकारणापेक्षा केंद्रातील राजकारणाच्या सुरक्षित प्रवाहात सावधपणे पोहणे त्यांनी अधिक पसंत केले, त्यामुळे बिहारच्या दलदलीत फारसे अडकले नाहीत.
वास्तविक रामविलास हे लालूप्रसाद यादव किंवा नीतिशकुमार यांच्यासारखेच समाजवादी चळवळीचे अपत्य. जयप्रकाश नारायणांचे तेही एक अनुयायी. आणीबाणीमध्ये तुरुंगवासदेखील भोगलेले. परंतु कधी जनता दलाच्या कधी भाजपच्या, कधी कॉंग्रेसच्या जवळ जाताना ना त्यांना अडचणीचे ठरले, ना त्या पक्षांना. रामविलास पासवान हे स्वतः एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते, त्यामुळे ते सर्वांनाच वेळोवेळी आपले वाटत गेले. काल त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी ती वार्ता ऐकून आपण निःशब्द झाल्याची भावना व्यक्त केली, तर सोनिया गांधींनी ते एक उत्तुंग नेते होते अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पासवान यांच्या सर्वसमावेशकतेचा याहून दुसरा दाखला काय हवा? आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांची घट्ट नाळ जुळलेली असे. त्यामुळे दिल्लीत असूनही बिहारमधील त्यांचा पाया भक्कम राहायचा.
६९ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपासून वयाच्या २३ व्या वर्षापासून पासवान यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. मृत्युसमयी त्यांचे वय ७४, पण त्यातील जवळजवळ पन्नास पावसाळे त्यांनी राजकारणात काढले. देशामध्ये अनेक राजकीय वादळे या दरम्यान घोंगावली. परंतु पासवानांची इवली होडी त्यात कधी बुडली नाही. प्रत्येकवेळी किनारा गाठल्यावाचून राहिली नाही. एकेकाळी हाजीपूरमधून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विश्‍वविक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेलेला आहे.
पासवान हे केवळ दलितांचे दिखाऊ नेते नव्हते. दीनदलितांचे सशक्तीकरण आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले. मंडल आयोगाचा वणवा देशात भडकला, तेव्हा त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये मोठे योगदान त्यांचे होते. आज ओबीसी आरक्षण देशात लागू आहे ते पासवानांमुळे. ऍट्रॉसिटीविरुद्धचा कडक कायदा झाला आहे तो पासवानांच्या माध्यमातून. मंडल आणि कमंडल यांनी देश दुभंगला, परंतु या दोहोंमधला सेतू कोण असेल तर ते रामविलास पासवान होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम करून संयुक्त पुरोगामी आघाडीत शिरणे जसे त्यांना अडचणीचे बनले नाही, तसेच संपुआला बायबाय करून रालोआत पुन्हा प्रवेशणेही त्यांच्यासाठी गैरसोयीचे नव्हते. त्यांचाच वारसा आज त्यांचे सुपुत्र चिराग चालवताना दिसत आहेत. वरवर पाहता ते नीतिशकुमार यांच्या महादलितांना जवळ ओढण्याच्या राजकारणाचा प्रतिवाद करण्यासाठी रालोआबाहेर पडले आहेत, परंतु भाजपाशी असलेली जवळीक मात्र ना त्यांनी तोडली आहे, ना भाजपाने. पित्याच्या राजकीय चतुराईचा वारसा आज पुत्र चालवू पाहतो आहे. मुलाचे कौतुक करायला मात्र आता पासवान नाहीत. बिहारचा रणसंग्राम तर तोंडावर आहे!