अबुधाबीत आज रंगणार केकेआर-सीएसके लढत

0
77

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) यांच्यात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १३व्या पर्वातील २१सावा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगणार आहे.
एका बाजूने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्स संघ सलग तीन पराभवांनंतर पुन्हा विजयपथावर परतलेला आहे. तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे हा सामना म्हणजे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकसाठी अग्निपरीक्षाच असेल.

केकेआरने आतापर्यंत चार सामने खेळलेले असून पैकी दोनमध्ये विजय मिळवलेला आहे. तर चेन्नई सुपरकिंग्सने पाच लढतींपैकी तीनमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे मोठ्या खेळाडूंची फळी आहे. परंतु त्यांना अपेक्षेनुरुप कामगिरी करता आलेली नाही आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे दिनेश कार्तिक कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही विभागात आतापर्यंत चाललेला नाही आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यांतून केवळ ३७ धावाच बनविल्या आहेत. यापुढे त्याच्या नेतृत्वाची आणखी कस लागणार आहे. दुसर्‍या बाजूने सीएसकेने आपल्या सलामीच्या सामन्यात तुल्यबळ संघ विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवीत आयपीएलच्या १३व्या पर्वाची शानदार सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर त्यांना राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद असे सलग तीन सामने गमावावे लागले होते. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टिका व्हायला सुरुवात झाली होती. परंतु किंग्स इलेव्हन पंजाबवर १० गड्यांनी धमाकेदार विजय मिळवीत त्यांनी दमदार पुनरागम केले. शेन वॉटसन आणि फाफ ड्यूप्लेसिस यांनी १८१ धावांची अविभक्त खेळी करीत सीएसकेला एकहाती सामना जिंकून दिला होता. आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतक्त्यात वरच्या स्थानावर पोहोचण्याचा धोनी अँड कंपनीचा मनोदय असेल.

कोलकाता नाईट रायडर्स (संभाव्य) – शुभमन गिल, सुनील नारायण, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक/कर्णधार), इयॉन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
चेन्नई सुपर किंग्स- शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ ड्यूप्लेसिस, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक/कर्णधार), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, पियुष चावला, दीपक चहर.