कुंकळ्ळीत युवतीचा संशयास्पद मृत्यू

0
268

>> केपे येथे युवकाची आत्महत्या

खेडे – पाडी – कुंकळ्ळी येथे नाल्यात युवतीचा संशयास्पद मृत्यू आणि केपे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्येची घटना काल घडली आहे. या दोन्ही घटनांचा निकटचा संबंध असून स्थानिक पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

कुंकळ्ळी आणि केपे या दोन्ही पोलीस स्थानकांवर दोघांच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेडे पाडी कुंकळ्ळी येथील अनिशा वेळीप (१८) या युवतीला मृतावस्थेत आणण्यात आले. सदर युवतीचा बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य केंद्रातून कुंकळ्ळी पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील इस्पितळात पाठविला. त्यानंतर सदर युवती बुडालेल्या ठिकाणी पाहणी केली असता घटनास्थळावरील नाल्यातील पाण्याची पातळी कमी असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असताना सर्वेश नामक एक युवक तिच्यासोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, अनिशाच्या आईनेसुद्धा बुडालेल्या ठिकाणी सदर युवकाला पाहिल्याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी कावरे केपे येथे सर्वेश याचा त्याच्या घरी शोध घेतला. तथापि, तो सापडू शकला नाही. सदर सर्वेश नामक युवकाचा मृतदेह घराच्या जवळील एका झाडाला लोंबकळत असल्याचे आढळले. केपे पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला आहे.