राज्यात यंदा ४३ टक्के जास्त पाऊस

0
276

राज्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त नोंद झाली आहे. यावर्षी राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत १६५.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. मागील तीन दिवसांत ४.३७ इंच पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासात ०.६४ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे १.३७ इंच, पेडणे येथे १.२० इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी, केपे, म्हापसा, फोंडा, दाभोली व इतर भागात पावसाची नोंद झाली आहे.

पेडणे येथे १९७ इंच पाऊस
राज्यात पेडणे येथे आत्तापर्यंत सर्वाधिक १९७.२३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात मोसमी पाऊस इंचांच्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाचे केवळ तीन दिवस शिल्लक राहिल्याने पेडण्यात पाऊस इंचांचे द्विशतक गाठतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सर्वच भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी सर्वांत कमी पावसाची नोंद मुरगाव येथे १४१.२५ इंच एवढी झाली आहे. राज्यात पेडणे, फोंडा, ओल्ड गोवा, साखळी, वाळपई, काणकोण, केपे आणि सांगे या आठ विभागात १७० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे १५१.६२ इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा, दाभोली, मडगाव आणि मुरगाव येथे १४० इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.