>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून शेतकर्यांचे कौतुक
आपल्या देशातला शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे. जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना प्रभावीपणे करू शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचे उत्तम उदाहरण आहे. देशातल्या शेतकर्यांनी कोरोना काळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल रविवारी मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले की, शेती क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. या बदलांची चर्चा माझ्याशी शेतकरी संघटना करत असतात. कोरोना काळात शेतकरी ज्या पद्धतीने संकटांचा सामना करत आहेत ते आदर्श उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.
कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबे एकत्र आल्याचा फायदा झाल्याचे मोदी म्हणाले. कोरोनामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बरेच जण घरात आहेत. मात्र आता जास्त काळ घरात राहणे कठीण होत आहे. मिळालेला वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडला आहे असे सांगून मोदींनी यावर उपाय म्हणजे हितोपदेश आणि पंचतंत्र वाचून मुलांवर संस्कार करण्याचे आवाहन केले. कोरोना काळाने आपल्याला एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवले आहे, अशावेळी कथा सांगा. आपला देश गुलामीत असताना स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले त्यांच्याही कथा मुलांना सांगा असे आवाहन त्यांनी केले. तसेच धार्मिक कथा सांगण्याचीही देशाला परंपरा आहे. नागरिकांनी दर आठवड्याला गोष्टींसाठी, कथांसाठी वेळ काढावा असे आवाहन केले.