सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासारख्या सध्याच्या आघाडीच्या तरुण अभिनेत्रींपर्यंत एनसीबीचा तपास येऊन थडकला आहे आणि तपास यंत्रणा अधिक खोलात जात राहिल्या, तर याहून मोठी नावेही तपासातून पुढे आल्यास आश्चर्य वाटू नये. बॉलिवूडच्या रुपेरी झगमगाटामागे व्यसनाधीनतेचा गडद अंधार कसा दाटून राहिला आहे त्याचे हे दर्शन विदारक आहे.
जी नवनवी माहिती दिवसेंदिवस बाहेर येत चालली आहे, ते पाहिले तर अमली पदार्थ तस्कर आणि बॉलिवूडचे धागेदोरे कसे जवळून जुडलेले आहेत ते स्पष्टपणे समोर येते. असे या मंडळींजवळ काय कमी आहे म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या मादक द्रव्यांच्या केवळ विनाशाच्या गर्तेत घेऊन जाणार्या व्यसनांची संगत धरावी?
रिया चक्रवर्तीच्या तपासातून जी नावे समोर आली, त्यांची एकेक करून सध्या चौकशी सुरू आहे. मुख्यत्वे व्हॉट्सऍपवरील जुन्या चॅटस्मधील अमली पदार्थांच्या उल्लेखांच्या आधारे हा तपास चालला आहे. निव्वळ चॅटस्मधील उल्लेख हा काही ठोस पुरावा ठरत नाही, परंतु त्याच्या आधारे जे अमली पदार्थ खरेदी व्यवहार उजेडात येतील, ते मात्र निश्चितच महत्त्वाचे आणि निर्णायक असतील. बॉलिवूडमधील ऐंशी टक्के कलाकार हे ड्रग्स घेतात असे रिया चक्रवर्ती म्हणते आहे. बॉलिवूडच्या सावलीत वावरणार्या आणि ड्रग्स पुरवणार्या मंडळींच्या मुसक्या आवळल्या गेल्या तर अनेक रथी महारथींचा पर्दाफाश झाल्याखेरीज राहणार नाही. विशेषतः बॉलिवूडमधील काही टोळीबाज मंडळी, त्यांची पार्टी संस्कृती यांचे खरे स्वरूप जनतेसमोर येऊ शकेल. बॉलिवूड आणि अमली पदार्थ यांचे नाते तसे जुने आहे. यापूर्वीही संजय दत्तपासून फर्दिन खानपर्यंत अनेकांवर अमली पदार्थ सेवनाचे आरोप झाले, त्यांनी ते मान्य केले आणि स्वतः व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करून त्यातून ते बाहेरही पडले. ती सारी वैयक्तिक प्रकरणे होती. त्याचा दोष कोणी समस्त बॉलिवूडला दिला नव्हता. सध्याच्या प्रकरणात मात्र केवळ मौजमजेसाठी अमली पदार्थ सेवन करण्याची जी टूम या तरुण कलाकार मंडळींमध्ये दिसते, ती एकूणच चित्रपटसृष्टीविषयी एक विपरीत प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण करणारी आहे हा यातील मुख्य फरक आहे.
इकडे बॉलिवूडवर हे अमली पदार्थ सेवन प्रकरणाचे काळे ढग दाटून आलेले असताना तिकडे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये देखील अमली पदार्थ सेवन आणि तस्करीचे एक मोठे प्रकरण उजेडात आलेले आहे, ज्यात अभिनेत्री आहेत, गायक आहेत, राजकारणी पुत्रही आहेत. मनोरंजन क्षेत्राला लागलेली ही अशा प्रकारच्या व्यसनांची कीड त्याच्याप्रतीची विश्वासार्हताच पोखरत चालली आहे. चित्रपट माध्यम हे सामाजिक जागृतीचे एक प्रभावी माध्यम मानले जाते. समाजातील गैरगोष्टींविरुद्ध एक उदात्त नैतिक भूमिका घेऊन प्रहार करण्याचे काम चित्रपट उद्योग आजवर करीत आला आहे. समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध, खलनायकांविरुद्ध त्यातील नायक वा नायिका लढत असतात. शेवटी सत्याचा विजय होतो हा विश्वासही ते प्रेक्षकांमध्ये नेहमीच रुजवत असतात. परंतु पडद्यावर ज्यांच्याकडे प्रेक्षक आपले आदर्श म्हणून पाहतात अशा या सेलिब्रिटींच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र जर असा अंधारच असेल तर या पडद्यावरच्या प्रबोधनाला अर्थ तो काय राहिला?
एनसीबीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. चॅटमध्ये नाव आलेल्या एकेका व्यक्तीला तपासासाठी बोलावले जाते आहे आणि जबाब नोंदवून घेतले जात आहेत. परंतु जो तपास आजवर झालेला आहे तो काही सांगोवांगी नाही. त्यामागे ठोस पुरावे सापडू लागल्याचे दिसते आहे. खाली आग लागल्याविना वर धूर येत नसतो म्हणतात. हे सारे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत चाललेले आहे. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात ही मंडळी एकमेकींचा भंडाफोड करीत चालली आहेत. ही सगळी सेलिब्रिटी मंडळी असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या वार्तांकनासाठी अहमहमिका असणे साहजिक आहे, परंतु विशेषतः दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये सध्या ज्या प्रकारचे वार्तांकन चालले आहे ते माध्यम जगतासाठी लाजिरवाणे आहे. आघाडीच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सगळे ताळतंत्र सोडले आहेत असे दिसते आहे. आपल्या अतिउत्साहापोटी तपासाची दिशा भरकटणार नाही, तो योग्य दिशेने होईल हे सर्वांनीच पाहिले पाहिजे. शेवटी या प्रकरणाच्या मुळाशी जाणे अधिक महत्त्वाचे आहे. मनोरंजन उद्योगाच्याच नव्हे, तर समाजाच्या हिताचे आहे.