>> २८ ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांत मतदान
बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसर्या आणि ७ नोव्हेंबरला तिसर्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसर्या टप्प्यात ९४ आणि तिसर्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेद्वारे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यावेळी म्हणाले की, बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असतील.
ही निवडणूक कोरोनाच्या काळात होत असून त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आल्याचे अरोरा म्हणाले.
कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र सोय
क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांनी शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करावे. आरोग्य अधिकार्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्याचे अरोरा म्हणाले. निवडणूक आयोगानं कोरोना रुग्णांना मतदानापासून वंचित राहावे लागू नये म्हणून विशेष व्यवस्था केली आहे. कोरोनामुळे एका मतदान केंद्रावर केवळ एक हजारच मतदार असतील.