>> चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव करत ‘आयपीएल २०२०’मधील सलग दुसर्या विजयाची नोंद करताना स्पर्धेतील आपला अपराजित घोडदौड सुरूच ठेवली. सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या ६४ धावांनंतर कगिसो रबाडा व ऍन्रिक नॉर्के यांनी केलेला प्रभावी मारा दिल्लीसाठी उपयुक्त ठरला. दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला ७ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
मुरली विजय व शेन वॉटसन यांना पुन्हा एकदा दणदणीत सलामी देण्यात अपयश आले. पॉवरप्ले संपेपर्यंत ही जोडी तंबूत परतली होती. फाफ ड्युप्लेसी याने ३५ चेंडूंत ४३ व केदार जाधवने २१ चेंडूंत २६ धावा करत विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, आवश्यक धावगती आवाक्याबाहेर गेल्याने केवळ पराभवाचे अंतर कमी करण्यासाठी त्यांची कामगिरी कामी आली.
तत्पूर्वी, पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दिल्लीला वेगवान सलामी दिली. पॉवरप्लेमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी अंकुश ठेवल्यामुळे केवळ ३६ धावा करणे शक्य झाल्यानंतरही दिल्लीने दहाव्या षटकाअखेर बिनबाद ८८ अशी मजल मारली. आपल्या पहिल्या दोन षटकांत २४ धावा चोपल्यानंतर पीयुष चावलाने जबरदस्त पुनरागमन करत शिखर धवनला पायचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर चावलाने शॉ याला धोनीकरवी यष्टिचीत करत आपला चार षटकांचा कोटा ३३ धावांत संपवत २ विकेटस् मिळवल्या. ऋषभ पंतने आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळाला मुरड घालताना मोजून मापून फटकेबाजी केली. २५ चेंडूंत नाबाद ३७ धावा करून तो नाबाद राहिला. चेन्नईने शेवटच्या दहा षटकात तुलनेने नियंत्रित मारा करत केवळ ८७ धावा दिल्या. गडी हातात असतानासुद्धा दिल्लीला १९० धावांच्या आसपास पोहोचता आले नाही. निर्धारित २० षटकांत त्यांनी ३ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली.
चेन्नईने या सामन्यासाठी एक बदल करताना लुंगी एन्गिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याला संधी दिली. दिल्लीने दुखापतग्रस्त रविचंद्रन अश्विनच्या जागी अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राला पसंती दिली. त्यांनी मोहित शर्माला वगळून आवेश खान याचादेखील संघात समावेश केला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ यष्टिचीत धोनी गो. चावला ६४ (४३ चेंडू, ९ चौकार, १ षटकार), शिखर धवन पायचीत गो. चावला ३५, ऋषभ पंत नाबाद ३७, श्रेयस अय्यर झे. धोनी गो. करन २६, मार्कुस स्टोईनिस नाबाद ५, अवांतर ८, एकूण २० षटकात ३ बाद १७५
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-३८-०, सॅम करन ४-०-२७-१, जोश हेझलवूड ४-०-२८-०, पीयुष चावला ४-०-३३-२, रवींद्र जडेजा ४-०-४४-०
चेन्नई सुपर किंग्स ः मुरली विजय झे. रबाडा गो. नॉर्के १०, शेन वॉटसन झे. हेटमायर गो. पटेल १४, फाफ ड्युप्लेसी झे. पंत गो. रबाडा ४३, ऋतुराज गायकवाड धावबाद ५, केदार जाधव पायचीत गो. नॉर्के २६, महेंद्रसिंग धोनी झे. पंत गो. रबाडा १५, रवींद्र जडेजा झे. मिश्रा गो. रबाडा २, सॅम करन नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ७ बाद १३१
गोलंदाजी ः कगिसो रबाडा ४-०-२६-३, अक्षर पटेल ४-०-१८-१, ऍन्रिक नॉर्के ४-०-२१-२, आवेश खान ४-०-४२-०, अमित मिश्रा ४-०-२३-०