फ्रेंच ओपनसाठी नदालला कठीण ड्रॉ

0
84

विक्रमी १३व्या फ्रेंच ओपन जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदाल याला यंदाच्या रोलंड गॅरो अर्थात फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी कठीण ड्रॉ लाभला आहे. नदाल हा फ्रेंच ओपनच्या आपल्या मोहिमेची सुरुवात बल्गेरियाच्या इगोर गेरासिमोव याच्याविरुद्ध करणार आहे. अंतिम आठमध्ये नदालचा सामना यूएस ओपनच्या उपविजेत्या आलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी होऊ शकतो.

झ्वेरेव याला अजूनपर्यंत एकदाही लाल मातीवरील या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी ओलांडता आलेली नाही. उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केल्यास नदालसमोर यूएस ओपन विजेत्या डॉमनिक थिम याचे आव्हान असू शकते. या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन लाभलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याच्यासमोर पहिल्याच फेरीत स्वीडनचा मिकाईल वायमेर हा असेल. तर सोळावे मानांकन लाभलेला व माजी विजेता स्टॅन वावरिंका याला पहिल्याच फेरीत ब्रिटनच्या अँडी मरे याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

महिला एकेरीत सेरेना विल्यम्स विक्रमी २३ ग्रँडस्लॅम किताबाशी बरोबरी करण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या फेरीत ती अमेरिकेच्या क्रिस्टी ऍन हिच्याविरुद्ध खेळेल. सहावे मानांकन लाभलेल्या सेरेनाचा अव्वल मानांकित सिमोना हालेप हिच्या गटात समावेश आहे. सेरेनाना घोडदौड राखल्यास चौथ्या फेरीत तिला यूएस ओपन उपविजेत्या व्हिक्टोरिया अझारेंका हिचा सामना करावा लागू शकतो.

जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली व २०१९ सालची विजेती ऍश्‍ले बार्टी हिने कोरोना विषाणूंच्या कारणास्तव तयारीला पुरेसा वेळ न मिळाल्याने या स्पर्धेतून अंग काढून घेतले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा यापूर्वी २४ मे ते ७ जून या कालावधीत होणार होती. आता रविवार २७ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.