मुसळधार पावसाने गोवा जलमय

0
303

>> आजही मुसळधार पावसाची शक्यता

आजवर १५३.४८ इंच पाऊस
सरासरीच्या ३५ टक्के अधिक
सांग्यात सात इंच पावसाची नोंद
फोंडा, सत्तरी, केप्यालाही झोडपले

एकदा काल झोडपून काढले. सांगे, फोंडा, केपे, साखळी आणि वाळपई तालुक्याच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अंजुणे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वाळवंटी नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. आज २२ सप्टेंबरला राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली असून केसरी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता यापूर्वीच वर्तविली होती.

राज्यात या वर्षी मोसमी पाऊस पुन्हा एकदा इंचांचा उच्चांक स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्यात आतापर्यंत १५३.४८ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३५ टक्के जास्त आहे. गत २०१९ मध्ये राज्यात १५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील काही वर्षे पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु, गतवर्षी पावसाचे प्रमाण वाढले. यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त आहे.

राज्यात चोवीस तासांत ३.५४ इंच पावसाची नोंद झाली. सांगे येथे सर्वाधिक ७.१० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पाच विभागांत जोरदार पाऊस कोसळला असून या ठिकाणी १२ सेंमी आणि जास्त पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

फोंडा येथे ५.२७ इंच, साखळी येथे ५.१६ इंच, केपे येथे ४.७५ इंच, वाळपई येथे ४.७४ इंच, मडगाव येथे ३.५५ इंच, काणकोण येथे ३.३१ इंच, पेडणे येथे ३.०६ इंच,ओल्ड गोवा येथे २.९५ इंच, दाबोळी येथे २.४३ इंच, मुरगाव येथे १.३५ इंच, म्हापसा येथे १.०७ इंच, पणजी येथे १ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पारोड्यात कार वाहून जाताना
पती – पत्नीला वाचवले

पारोडा येथे कुशावती नदीचे व कालव्याचे पाणी रस्त्यावर भरले असताना पाण्यातून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेली एक मारुती कार पाण्यात बुडाली. मात्र, ही घटना पाहून गोवा ३६५ वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रमेश नाईक राऊत यांनी पाण्यात उडी घेऊन कारचे दार उघडून आतील पती पत्नीला बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मदतीला धाव घेऊन कार पाण्यातून जवळजवळ सातशे मीटर ओढत नेऊन पाण्याबाहेर काढली.

दक्षिण गोव्यात रस्ते पाण्याखाली

कालपासून राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसात नदी नाले दुथडी भरून वाहात असून अनेक घरे व शेती बागायती पाण्याखाली गेल्या आहेत. दक्षिण गोव्यात चिंचोणे, अंबाजी – फातोर्डा, मोतीडोंगर, वेळ्ळी, कोंब, कुंकळ्ळी आदी भागांत रस्त्यावर झाडे कोसळली. त्यामुळे दोन तास वाहतूक खोळंबली.

चिंचोणे व कुंकळ्ळी येथे घरावर झाडे पडून हजारो रुपयांची हानी झाली. अग्निशामक दलाचे जवान सातत्याने झाडे हटवून रस्ते खुले करण्याच्या कामात गुंतले आहेत.

कुंकळळी बाजार ते उस्किणी बांधापर्यंत पाणी भरले होते, त्यामुळे वाहने सांभाळून चालवावी लागत होती. तळेबांध बाणावली येथे पश्‍चिम बगलमार्गाच्या कामामुळे सर्वत्र पाणी भरले. आर्ले, रावणफोंड, मडगाव स्टेशनरोड, जुना बाजार, मालभाट येथेही पाणी भरल्याचे दिसून आले.