कृषी विधेयकावर बोलताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना आपली दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी या विधेयकावरून विरोधक शेतकर्यांची दिशाभूल करत असल्याचे सांगितले. बिहारमध्ये रेल्वे पुलाचे लोकार्पण केल्यानंतर बिहारमधील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
श्री. मोदी यांनी यावेळी सरकारी संस्था गहू, तांदूळ इत्यादी शेतकर्यांकडून खरेदी करणार नाहीत, अशी खोटी व चुकीची बातमी विरोधक पसरवत आहेत. हा तर शेतकर्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले. हे विधेयक म्हणजे शेतकर्यांसाठी सुरक्षा कवच आहे. कॉंग्रेसकडून आता ज्या गोष्टींना विरोध केला जात आहे त्याचाच उल्लेख यांनी जाहीरनाम्यात केला होता. आमचे सरकार शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य किंमत देण्यासाठी कटिबद्ध असून सरकारकडून होणारी खरेदीही आधीप्रमाणे सुरू राहील अशी माहिती दिली.