आयपीएलचा ‘रन’संग्राम आजपासून

0
291

>> चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आमनेसामने

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली होणार्‍या या स्पर्धेत कोणताही थाटमाट दिसणार नाही. किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स या सहभागी फ्रेंचायझींना रिकाम्या स्टेडियम्सवर आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज स्पर्धेतील पहिला सामना होणार असून ‘ज्येष्ठांचा’ भरणा असलेला चेन्नई व युवा तसेच अनुभवींची सरमिसळ असलेल्या मुंबईतील ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. अमिरातीमधील खेळपट्‌ट्यांवर मागील चार वर्षांत प्रथम फलंदाजी करणारा संघ केवळ तीन सामने जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्यास पसंती देण्याची शक्यता आहे. चेन्नईचा संघ या सामन्यात जडेजा, चावला व ताहीर यांच्या रुपात तीन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईला दर्जेदार फिरकीपटूची कमतरता जाणवू शकते. नवोदित राहुल चहर, अष्टपैलू कृणाल पंड्या यांच्यावर त्यांची भिस्त असेल. कायरन पोलार्डला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गवसलेला जबरदस्त फॉर्म मुंबईसाठी जमेची बाजू असेल. चेन्नईच्या प्रमुख सात खेळाडूंनी मागील सहा महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे थेट मैदानावर उतरून कामगिरीचा दबाव त्यांच्यावर असेल. ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर यांच्या गोलंदाजी शैलीला अमिरातीमधील खेळपट्‌ट्या पुरक असून बुमराह व कंपनीला संथ खेळपट्‌ट्यांवर अधिक जोर लावावा लागू शकतो.

रोहितच्या मुंबई इंडियन्सने मागील मोसमात ‘अवे’ मैदानांवर चांगली कामगिरी केली होती. पाच विजय व ३ पराभवांची नोंद त्यांनी केली होती. परंतु, भारताबाहेर त्यांची कामगिरी खराब झाली आहे. २००९ साली देशातील लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल जेव्हा द. आफ्रिकेत खेळविण्यात आली होती. त्यावेळी मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता. १४ सामन्यांतून केवळ ५ विजयांसह त्यांना सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. २०१४ साली यूएईतील टप्प्यात तर त्यांना एकही विजय संपादन करता आला नव्हता.

मुंबईच्या तुलनेत आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा रेकॉर्ड चांगला आहे. २००९ साली चेन्नईने ८ विजय व ५ पराभव अशी कामगिरी केली होती. २०१४ साली तर त्यांनी यूएई टप्प्यातील ५ पैकी चार सामन्यांत विजयाला गवसणी घालत आपले सातत्य दाखवून दिले होते.

मुंबई इंडियन्सचा संघ अबुधाबीमध्ये सुरुवातीपासून आहे. त्यामुळे येथील वातावरणाशी, खेळपट्‌ट्यांशी सरावाद्वारे त्यांनी जुळवून घेतले आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ दुबईत स्थित आहे. दुबई व अबुधाबी येथील वातावरणात खूप फरक असल्याने नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान असेल, असे चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेंमिंग यांना सांगितले आहे.
मुंबई इंडियन्सला २०१२ सालापासून मोसमातील पहिला सामना जिंकणे शक्य झालेले नाही. परंतु, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा त्यांचा मागील दहा सामन्यांतील रेकॉर्ड पाहिल्यास मुंबईचे पारडे जड वाटते. मुंबईने मागील १० पैकी८ लढतींत धोनीच्या चेन्नईला धूळ चारली आहे. त्यामुळे विजयासह आयपीएलच्या तेराव्या मोसमाची सुरुवात करण्याचा त्यांचा इरादा असेल.

मुंबई इंडियन्स संभाव्य ः रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य ः शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ ड्युप्लेसी, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला व इम्रान ताहीर.