गोव्याचे नवपर्यटन

0
249

एकीकडे राज्याचा गळा कोरोनाच्या सार्वत्रिक सामाजिक फैलावाने आवळला गेलेला असतानाच दुसरीकडे पर्यटनाच्या नावाखाली चाललेला जुगार, अमली पदार्थ व्यवहाराचे गोव्याशी जुळणारे धागेदोरे, सीमेवर पकडली जाणारी चोरटी दारू अशा एकामागून एक उघडकीस येणार्‍या प्रकारांनी जनतेमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. कळंगुटमध्ये एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारावरील छाप्यात ४२ जणांना अटक होऊन ते लगोलग जामीनावर मोकळेही झाले. मुंबईतील सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण अमली पदार्थ व्यवहाराचे जे अंग समोर आलेले आहे, त्याचे धागेही थेट गोव्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. देवभूमी मानला जाणारा आणि कलाकारांची खाण असलेला हा गोवा आज कोणत्या गोष्टींसाठी ओळखला जाऊ लागला आहे याचे हे अस्वस्थ करणारे दृश्य आहे.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा. खाण व्यवसाय बंद झाल्यावर तर गोव्यासाठी तो एकमेव आधार उरलेला आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली हे जे काही राज्यात चालले आहे, त्यातून गोव्याची प्रतिमा सातत्याने कलंकित होत चालली आहे. कोणत्याही पर्यटनस्थळी जेव्हा एखादे कुटुंब भेट देते तेव्हा ते तेथील सुरक्षित वातावरण, राहण्या – जेवण्याच्या सोयी, तेथील माणसे, त्यांची संस्कृती यांचा विचार करूनच तेथे जात असते. गोव्यामध्येही जगभरातील पर्यटक आकृष्ट व्हायचे ते केवळ येथील निसर्गसौंदर्यामुळे नव्हे. गोव्याहून कैक पटींनी सुंदर समुद्रकिनारे तर देशात आणि जगात अनेक ठिकाणी आहेत, परंतु गोव्यातील मोकळे वातावरण, येथील दिलखुलास माणसे, त्यांचे आतिथ्य यामुळे पर्यटकांना नेहमीच गोवा हे एक आकर्षणस्थळ वाटत आले. परंतु जगभरातून येणारी माणसे शेवटी स्वतःची संस्कृतीही घेऊन येत असतात. स्वतंत्र गोव्याच्या पर्यटनाचा विकास करताना पर्यटकांच्या सोयीच्या नावाखाली मद्याचा महापूर वाहिला. निव्वळ पोर्तुगीज सरंजामशाहीतून निर्माण झालेली ‘खा, प्या, मजा करा’ हीच गोव्याची ओळख बनावी याच दिशेने सरकारची पावले पडत राहिली. परिणामी, गोवा हे जगभरातील व्यसनी, बदफैली लोकांचे आकर्षणस्थळ बनत गेले. मद्यपि आले, हिप्पी आले, गांजेकस आले, चरसी आले, नवनवे व्यसनाधीश येत राहिले. काहींनी पर्यटकाच्या बहाण्याने येऊन येथे बस्तान बसवले. अवैध व्यवसाय थाटले, मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. पर्यटकांसाठी म्हणून कॅसिनो आले, उच्चभ्रू वेश्या आल्या, डान्स बारही आणण्याचा प्रयत्न झाला. हळूहळू गोव्याच्या पर्यटनाची हीच ओळख बनू लागलेली आहे.
दिल्ली, मुंबईच्या धनदांडग्यांसाठी गोवा हे आपले सारे थेर करण्यासाठी हक्काचे स्थान बनले आहे. सेकंड होमच्या नावाखाली त्यांनी येथे मालमत्ता खरेदी केल्या आहेत. दिल्ली – मुंबईहून गोव्याकडे सर्वाधिक विमाने धावतात ती देखील याच पार्टी संस्कृतीचे अनुयायी असलेल्या संभावित उच्चभ्रू मंडळींच्या बळावर. कोरोनाने मध्यंतरी ही लाट थोपवली, परंतु आता पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे.
कौटुंबिक पर्यटक आता गोव्याकडे पाठ फिरवू लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. तो केरळकडे वळतो, अंदमानला जातो, कोकणाकडेही पाहतो, परंतु गोव्यापासून दूर राहतो. पर्यटकाच्या नावाखाली धिंगाणा घालण्यासाठी येत आहेत ते दिल्ली – मुंबईचे ‘छिछोरे’. मैत्रिणींना घेऊन गोव्यात यायचे, रेन्ट अ बाईक घेऊन टोळक्यांनी हिंडायचे, सगळी व्यसने भोगून घ्यायची, चैन करायची आणि आपल्या या खुणा येथे ठेवून परतायचे हे आता नेहमीचे झाले आहे. कोरोनाने या सगळ्याला काही काळ अटकाव झाला. गोव्याच्या रस्त्यांनी थोडा मोकळा श्वास घेतला, पर्यटन व्यवसायाला फटका जरूर बसला, परंतु अनिष्ट गोष्टींनाही काही काळ आळा बसल्याचे पाहायला मिळाले. परंतु आता सीमा खुल्या झाल्यापासून पुन्हा पर्यटनाच्या नावाखालचा हा धागडधिंगा पुन्हा सुरू झालेला पाहायला मिळतो आहे.
हॉटेलमध्ये चाललेल्या जुगारावर कारवाई झाली. हे लोक केवळ जुगार खेळण्यासाठीच गोव्यात आलेले होते हे या छाप्यात सिद्ध झाले आहे. गोवा हे अशा गैरकृत्यांसाठी सुरक्षित स्थान आहे हे या धनदांडग्यांना आता कळून चुकलेले दिसते. अमली पदार्थ व्यवहाराबाबतीत उजेडात आलेली माहिती तर अधिक गंभीर आहे. तो एक मोठा स्वतंत्र विषय आहे. कोरोनाने राज्याचा श्‍वास गुदरमलेला असताना गोव्याच्या पर्यटनाचे हे जे काही धिंडवडे निघत आहेत, ते पाहूनही आम गोमंतकीय जर अस्वस्थ होणार नसेल, आणि जे आजूबाजूला चालले आहे ते वास्तव म्हणून निमूट स्वीकारत असेल तर ते गोव्याच्या हिताचे नक्कीच नसेल!