सण म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे!

0
365

योगसाधना – ४७४
अंतरंग योग – ५९

  • डॉ. सीताकांत घाणेकर

हत्तीचे कान सुपासारखे असतात. सुपाचा गुण म्हणजे ‘सार सार को ग्रही लही और चोथा देही उडाये’- सूप फोलपटें फेकून देते व फक्त स्वच्छ धान्यच स्वतःकडे ठेवते. नेत्यांकडून हेच अपेक्षित आहे. सर्वांचे आधी शांतपणे ऐकून घ्यावे. त्यातील सार ग्रहण करावे व इतर तत्त्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात.

आपल्या भारतात विविध सण आहेत. प्रत्येक सणाचा गोडवाच वेगळा. त्यामागील तत्त्वज्ञान तर अत्यंत महत्त्वाचे. कारण इथे विविध अतिमहत्त्वाचे पैलू आहेत- धर्म, निसर्ग, मानवता, अध्यात्म. थोडे विषय अत्यंत गहन व गंभीर आहेत पण कठीण विषय सोपा करण्यासाठी आपल्या ज्ञानी तत्त्ववेत्त्यांनी प्रत्येक विषयावर कथा सांगितल्या. त्यामुळे बालकांना आवड निर्माण झाली. तसेच इतर सर्वांना बोध मिळाला. पण झाले काय… आपण सण साजरा करतो फक्त कर्मकांडं म्हणून. मौजमस्ती करतो पण अपेक्षित गोडवा असेलच याची खात्री नाही. म्हणून सर्व पैलूंचे ज्ञान असले तर सणाबद्दल दृष्टिकोनच बदलून जातो.

भाद्रपद महिन्यात येणारा अत्यंत आनंदाचा सण म्हणजे श्रीगणेश चतुर्थी. त्याबद्दल आपला सखोल विचार चाललाय. गणपतीला हत्तीचे डोके कसे लावले गेले… ती गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली, पाहिली. तसेच थोडे तत्त्वज्ञानही पाहिले. आता थोडं पुढे जाऊया.

  • विचार करणार्‍या व्यक्तीच्या डोक्यात असा विचार येतो, की हत्तीचेच मस्तक का जोडले गेले? इतर दुसर्‍या प्राण्याचे का नाही?
    पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात – * हत्तीच्या मस्तकाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये अत्यंत बुद्धिमान आहे.
    ‘‘महान जीवनाच्या उंचीवर असलेल्या शिखराला गाठण्याचा प्रयत्न करणारा तत्त्ववेत्ता बुद्धिमान असला पाहिजे. तसाच समाजाला योग्य वळण देऊन खर्‍या रस्त्याने नेण्याची अभिलाषा बाळगणारा नेता निर्बुद्ध असला तर कसे चालेल?’’
  • तेजस्विता – हा हत्तीचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. त्याचे लाड करून त्याला खाऊ द्यायला हवे. त्याला खायला घालताना त्याचा माहूत जर काही रागाने बोलला तर हत्ती खात नाही. तसेच कुत्र्याप्रमाणे शेपटी हालवत तो खाण्यासाठी धावत येत नाही. कुत्र्याला जरी मारले तरी खायला दिल्यावर तो लगेच येतो.
  • तसाच तत्त्ववेत्ता व नेता तेजस्वी वृत्तीचा हवा. कारण निस्तेज नेता समाजालाही स्वतःसारखा दीन व लाचार बनवतो.

भारतीय इतिहासात अनेक राजे, महाराजे, सम्राट होऊन गेले. ते देशप्रेमी, निःस्वार्थी, शूरवीर होतेच पण मुख्य म्हणजे ते तेजस्वी होते. त्यातील काही म्हणजे छत्रपती शिवाजी, संभाजी, महाराणा प्रताप. त्यांची मान त्यावेळच्या मुसलमान बादशहासमोर कधीच झुकली नाही.
शाळेत असताना बाल शिवाजी व जिजामातेच्या काही गोष्टी नियमित सांगितल्या जात. काही विषयांवर आम्ही मुले लहान लहान नाटिकादेखील करीत असू. अशीच एक बालशिवाजीची गोष्ट-

  • शहाजीराजे (शिवबाचे वडील) आदिलशहाचे एक शूर सरदार होते. खरे म्हणजे शहाजींची योग्यता महाराज बनण्याची होती. पण दुर्भाग्य या भारतमातेचे. अनेक मराठा सरदार आदिलशहाचे मिंधे होते- स्वार्थापोटी! त्यामुळे शहाजींना त्यांचे सहकार्य नसे. म्हणून शहाजीराजे मोगलांचे सरदारच राहिले. दरबारात त्यामुळे त्यांना पाठ वाकवून मोगलांना कुर्निसात करावा लागत असे.

एक दिवस शहाजी राजे बाल शिवाजीला दरबारात घेऊन गेले. स्वतः त्यांनी ‘कुर्निसात’ केला आणि शिवाजीलादेखील करायला सांगितले. पण तो बालक मान वर करूनच उभा राहिला… कुर्निसात न करता. वडलांनी समजावले तरी तो वाकेना. आदिलशहाचा तो अपमान झाला. त्यांना रागही आला. पण ते बाहेरून शांत राहिले. कारण शहाजीराजांना फार मान होता. ते अनेक लढाया जिंकत असत.
घरी आल्यावर जिजाबाईंना शहाजीराजांनी ही घटना निवेदन केली. तेव्हा जिजाबाईंनी बालशिवाजीला त्यामागचे कारण विचारले, तेव्हा तो लहानगा मुलगा म्हणाला–

  • ‘‘मी म्हणता नाही नाही
    दरबारी नेले आई,
    आत शिरोनी पाही- शिर झुकेना आई
    देशाचा राजा नाही, मी धर्मनिष्ठ होऊ कसा?
    पण माते, तू सांग….
    हे शिर कापोनी तव चरणी अर्पीन मी’’.
    खरे म्हणजे जिजामातेनेच आपल्या मुलाला तसे तेजस्वितेचे संस्कार दिले होते. त्यामुळे मनातून तिला आनंदच झाला. त्यावेळी हे वाचून आमच्या अंगात वीरश्री संचारत असे. इतकी वर्षे झालीत, पण आजही या ओळी आठवल्या की मान वर उंचावते.

तसेच संभाजीराजे… औरंगजेबासमोर कधीच झुकले नाहीत. मराठी सरदारांच्या फितुरीमुळे ते पकडले गेले आणि निर्दयी औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारून टाकले. पण ते कधीही वाकले नाहीत अथवा आपला धर्म बदलला नाही. त्यांच्यासारखेच महाराणा प्रताप. त्यांनीही कुणासमोर आपली मान झुकवली नाही.
या देशातील महिलाही अशाच तेजस्वी होत्या, त्यातील एक म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई! ब्रिटिशांशी ती मोठ्या धैर्याने लढली. स्वतःचे बलिदान दिले. पण ही तेजस्वी स्त्री वाकली नाही. काही भारतीय राजांनी तिला दगा दिला.

इथे मुख्य मुद्दा म्हणजे नेत्याची तेजस्विता. श्रीगणेशाच्या हत्तीच्या शिरावरून निघालेला हा मुद्दा. अशा गोष्टींमुळे आपल्या डोक्यात उतरतो. खरे म्हणजे प्रत्येक नेत्याने या गुणाची नोंद घ्यायला हवी.
हत्तीची आणखी एक सवय आहे –

  • हत्ती म्हणे स्वतः खाण्यापूर्वी दोन-तीन घास बाजूला उडवून देतो. कारण म्हणजे गजराज जेव्हा जेवत असतो तेव्हा दुसर्‍या अनेक छोट्या जीवजंतूंचे पोट भरले पाहिजे. अशी त्याची उदार वृत्ती असते. या संदर्भात संत तुलसीदास म्हणतात- ‘मुखिया मुख सो चाहिए खान पान करे एक,
    पालत पोषत सकल अंग तुलसी धरत विवेक|’
  • खाण्यापिण्याचे काम तोंड करते पण पुष्टी सर्व शरीराला मिळते. त्याचप्रमाणे नेत्याच्या परिश्रमाने संपूर्ण समाजाला पुष्टी मिळाली पाहिजे.
    आहेत का असे आमचे नेते- तेजस्वी व उदार??
  • हत्तीचे कान – सुपासारखे असतात.
    सुपाचा गुण म्हणजे ‘सार सार को ग्रही लही और चोथा देही उडाये’- सूप फोलपटें फेकून देते व फक्त स्वच्छ धान्यच स्वतःकडे ठेवते.
    नेत्यांकडून हेच अपेक्षित आहे. सर्वांचे आधी शांतपणे ऐकून घ्यावे. त्यातील सार ग्रहण करावे व इतर तत्त्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात.
    तसेच मोठे कान हे उत्तम श्रवणशक्तीचे दिग्दर्शक आहेत.
    पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-
  • ‘‘आपल्याकडे बहुश्रुत माणसाला मूल्य आहे, ‘वेल रेड’ माणसाला नाही.’’
    पाश्‍चात्त्य देशात ज्याचे वाचन जास्त त्याला अधिक मान मिळतो. कारण त्याला जास्त ज्ञान असते असे ते मानतात. तिथे पुष्कळ पदव्या असलेल्या व्यक्तीलासुद्धा ‘वेल रेड’ म्हणतात.

श्रीगणेशचतुर्थीच्या उत्साहात कोरोना राजाला विसरू शकत नाही. त्याचे थैमान चालूच आहे. गणपतीबाप्पा विघ्नहर्ता आहे. आमचा त्याच्यावर विश्‍वास आहे. दृढ श्रद्धा आहेच पण तरीही काही बंधने- जी कोरोनापासून बचावासाठी सांगितली आहेत, ती पाळायलाच हवीत. ती पाळली नाहीत तर देव तरी किती हस्तक्षेप करेल, कशी मदत करेल… कुणालाही माहीत नाही.
माणसाला स्वातंत्र्यापेक्षा स्वैराचार जास्त प्रिय आहे. त्यामुळे यावेळूसुद्धा मस्ती झालीच. अनेक फोटो बघितले तेव्हा कळले की कित्येक ठिकाणी अनेकांनी मास्क घातलेच नव्हते. ‘सामाजिक अंतरही’ पाळले नाही.

काही कुटुंबांनी बोट भाड्याने घेतली. मांडवीच्या मध्यभागी जाऊन गणपतींचे विसर्जन केले. त्यांचा उत्साह कौतुकास्पदच. पण वृत्तपत्रात, व्हॉट्‌सऍपवर जे फोटो आलेत, तिथे गर्दी दिसतच होती. ३० ते ४० जणं होते. त्यांनी कसलीही बंधने पाळली नाहीत. मला कौतुक वाटले आणि रागही आला. मनात म्हटले, ‘गणपती बाप्पा, यांना सांभाळ. सद्बुद्धी दे. तू तर बुद्धीची देवता आणि यांची बुद्धी कशी भ्रष्ट झाली?’
दोन-चार दिवसांनंतर कळले की त्यातील अनेकांना कोरोनाने गाठले. झाले… सर्व सोपस्कार सुरू झालेत. आर्थिक ताण आलाच पण मानसिक ताणही वाढला. भगवंतही असमर्थ ठरतो अशावेळी. यापुढे तरी अनुभवामुळे बुद्धी जागृत होईल अशी आशा करूया व तशी प्रार्थनादेखील. करूया.