- अनुराधा गानू ‘संशयी दादा, लहरी आप्पा, त्यांची संगत, नकोरे बाप्पा’… थोडं लांबच असलेलं बरं. स्वभावाच्या अशा वैविध्यतेमुळे माणसांचं आयुष्य मात्र चटकदार, लज्जतदार भेळीसारखं बनतं. नाहीतर ते फारच निरस आणि मिळमिळीत पनीरसारखं झालं असतं, हे मात्र खरं!!
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जसा एक माणूस दुसर्यासारखा दिसत नाही, असतही नाही, तसाच एका माणसाचा स्वभाव दुसर्या माणसासारखा असत नाही. प्रत्येक माणसाचा वेगळा, विशिष्ट स्वभाव असतो आणि त्या स्वभावाच्यासुद्धा गडद, पुसट अशा वेगवेगळ्या छटा असतात.
काही माणसं अतिशय तापट असतात, चिडखोर असतात तर काही माणसं अतिशय नरम आणि गरीब स्वभावाची असतात. काही माणसं अतिशय स्मार्ट आणि धडपडी असतात. लहानपणापासूनच कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ही माणसं पुढे कितीही मोठी झाली तरी कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव जात नाही तर काही माणसं इतकी आळशी असतात की पुराचे पाणी पायाशी पोहोचेपर्यंत उठत नाहीत. म्हणजेच संकट दाराशी येईपर्यंत त्यावर उपाय न शोधता नुसती बसून असतात, उपायांची काहीच तजवीज न करता!
काही माणसं खेकड्यासारखी असतात. आपल्यापेक्षा दुसर्याचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. टोपलीतल्या खेकड्यासारखे लगेच त्यांचे पाय ओढतात. हा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो. पण काही माणसं दुसर्याचं चांगलं व्हावं म्हणून सतत झटत असतात. काही माणसं शिवराळ असतात. ती माणसं साधं बोलतच नाहीत. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी असते. पण काही माणसं चुकूनसुद्धा अपशब्द वापरत नाहीत. इतकं साधं सरळ बोलणं आणि वागणंसुद्धा. काही माणसं फणसासारखी असतात. वरून काटेरी, रागीट दिसतात पण मनातून खूप छान, गोड असतात. अशा माणसांच्या स्वभावाच्या वेगळ्या छटा असतात. म्हणजे जसं एका मोबाइलमध्ये दोन सिमकार्ड असतात ना तसंच. अगदी तसंच एका माणसामध्ये दोन वेगवेगळ्या स्वभावविशेषांची सिमकार्ड घातलेली असतात.
आता ही स्वभाववैशिट्यिे त्या त्या माणसांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा त्यांच्यावर झालेल्या संस्कारानुसार बनत असतात किंवा पूर्वसुकृतानुसारही बनत असावीत. कारण काही वेळेला एकाच परिस्थितीत वाढलेल्या भिन्न भिन्न माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतात किंवा एकाच घरात, एकाच संस्कृतीत वाढलेल्या माणसांचे स्वभाव भिन्न भिन्न असतात. काही वेळेला जी माणसं लहानपणापासून परिस्थितीचे चटके खात, अपमान सहन करतच मोठी होतात, त्या माणसांचा स्वभाव रागीट आणि तिरसट असतो. सगळ्या समाजावरच त्यांचा राग असतो. मग तो त्यांचा राग कोठेही कोणावरही काढला जातो. कारण समाजाने त्यांना तसंच वागवलेलं असतं. पण तीच परिस्थिती काहींना संयम, माणुसकीही शिकवते. अशी माणसं आपल्यासारखे चटके दुसर्याला बसू नयेत म्हणून झटत असतात.
आमच्या माहितीतले एक गृहस्थ लहानपणापासूनच परिस्थितीशी झगडत, दुसर्याच्या उपकाराखाली दबतच मोठे झाले. अशा माणसाचा स्वभाव खूप शांत असायला हवा होता. पण झालं उलटंच. ते गृहस्थ खूप रागीट, चिडखोर झाले. सतत आपल्या बायको-मुलांवर चिडायचे, ओरडायचे. घरात शांतता अशी नाहीच. अशा माणसांबद्दलचा आदर हळुहळू कमी होत जातो. अशी माणसं आयुष्यात एकटी पडतात. काही माणसं उदार असतात. दुसर्यासाठी पटकन् खर्च करतात तर काही माणसांचा स्वभाव अतिशय कंजूष असतो. असेच एक ओळखीचे गृहस्थ. अतिशय कंजूष. नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे. पण बायकोचा पैसा कधी तिच्या हातात येऊच दिला नाही. का? तर म्हणजे खर्च होईल. दुसर्यांना द्यायची तर गोष्ट सोडाच, पण घरातल्यांनासुद्धा पैसा पैसा मोजून देणार नाही, तेही छप्पन्न प्रश्न विचारून. अशा माणसांबद्दलही कोणाला आदर वाटत नाही. आणि मग ती एकटी पडतात. पण त्यांना त्याची पर्वा नसते. ते आपल्या कंजुषीतच मग्न!
काही माणसांचे स्वभाव अल्पसंतोषी असतात. आपल्या मेहनतीवर आपल्याला मिळतंय त्यात ती समाधानी असतात. तर काही माणसांचा स्वभाव हावरट असतो. प्रत्येक गोष्टीची त्यांना हाव असते. माझंही मला मिळालं पाहिजे आणि दुसर्यांचंही मलाच मिळालं पाहिजे. ते मिळवण्याासाठी अशी माणसं कोणत्याही थराला जातात. दुसर्याचं लुबाडायलाही कमी करत नाही. आजकाल अशी माणसंच जास्त सापडतात, अगदी प्रत्येक क्षेत्रात आणि पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत! अशा माणसांच्या घरात सर्व सोयी साधनं असूनही सुख शांती मात्र नसते. आपल्या कर्माची बोच त्यांना कुठेतरी टोचत, कायम टोचत असते. ती बोचच त्यांचं स्वास्थ्य बिघडवून टाकते.
काही माणसांचा स्वभाव खूप उद्धट असतो. समोरचा माणूस आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याचं- आपलं नातं काय आहे याचा जराही विचार न करता पटकन् बोलतात. पण त्यामुळे समोरचा माणूस दुखावला जातोय हे त्याच्या लक्षातही येत नाही. एखादेवेळेस नंतर त्याच्या लक्षात येतही असेल पण तोपर्यंत शब्दांचा बाण लागायचा तिथे लागलेला असतो. पण काही माणसं अगदी उलट असतात. ती दुसर्यांच्या मनाचा विचार आधी करतात. मगच दुसरा दुखावणार नाही असंच बोलतात, अगदी समोरच्याची चूक असली तरी. अशी माणसं सगळ्यांना हवी असतात. काही माणसं उद्धट नसतात पण स्पष्टवक्ती असतात. अशा माणसांबद्दल गैरसमज व्हायची शक्यता असते. त्याच्याउलट काही माणसं कुढत बसणारी असतात. सगळे सल, दुःख मनातच दाबून ठेवतात. काही माणसांचा स्वभाव तुसडा असतो. ती भावनिक नात्यानं कोणाशीच जोडली जात नाहीत. काही माणसं लाघवी आणि प्रेमळ असतात. अशा माणसांचा संपत्ती-संचय जरी मोठा नसला तरी व्यक्तिसंचय मोठा असतो. आणि तीच शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरते.
काही माणसांचा स्वभाव संशयी असतो. ती कधी कोणावर संशय घेतील सांगता यायचं नाही. आणि काही माणसं लहरी असतात. ती कधी कोणाशी कशी वागतील याचा थांगपत्ता लागणार नाही- संशयी दादा| लहरी आप्पा॥ त्यांची संगत| नकोरे बाप्पा॥ थोडं लांबच असलेलं बरं.
स्वभावाच्या अशा वैविध्यतेमुळे माणसांचं आयुष्य मात्र चटकदार, लज्जतदार भेळीसारखं बनतं. नाहीतर ते फारच निरस आणि मिळमिळीत पनीरसारखं झालं असतं, हे मात्र खरं!!