>> ९ दिवसांत कोरोनामुळे ७० जणांचा बळी
राज्यात कोविड स्वॅबच्या नमुन्याच्या तपासणीमध्ये वाढ झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवे ६१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ६ कोरोना रुग्णांचा मृत्यूची नोंद काल झाली आहे.राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २२ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रूग्णसंख्या २२,२५१ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४८३३ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या २६२ झाली आहे. मागील ९ दिवसात ७० जणांचा बळी गेला आहे.
राज्यात मागील काही दिवस कोविड नमुन्यांची कमी प्रमाणात चाचणी केली जात होती. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास येत होती. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २१२३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ६२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोविड प्रयोगशाळेत ४८५ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने २१४० स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. जीएमसीच्या आयझोलेशनमध्ये १८३ जणांना दाखल करण्यात आले आहेत.
आणखी ६ जणांचा बळी
राज्यात काल आणखी ६ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत होणारी वाढ कायम आहे. नऊ दिवसात ७० जणांचा बळी गेला आहे. राज्यात दरदिवशी सरासरी सात ते आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गोमेकॉमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मडगाव कोविड इस्पितळात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एका कोरोना रुग्णाला मृतावस्थेत उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले.
नावेली येथील ५७ वर्षांचा पुरुष, फोंडा येथील ३३ वर्षांचा युवक, हरमल येथील ६५ वर्षांची महिला, फातोर्डा येथील ८७ वर्षांची महिला, कुडतरीतील ७५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले. इस्पितळात दाखल केलेल्या दोन कोरोना रुग्णांचा चोवीस तासांत मृत्यू झाला. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात अंदाजे ४० वर्षांच्या अनोळखी रुग्णाला ८ रोजी दुपारी २.२० च्या सुमारास मृतावस्थेत आणण्यात आले होते.
२८१ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित २८१ जण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७,१५६ एवढी झाली आहे. कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या २२४ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ८२११ एवढी झाली आहे.
पणजीत एकाच कुटुंबांतील
१४ जण बाधित
भाटले पणजी येथील एकाच कुटुंबातील १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भाटले परिसरात एकाच कुटुंबातील १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पणजीत नवे ४२ रुग्ण
पणजी शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे ४२ पॉझिटिव्ह आढळून आले असून एकूण रूग्णसंख्या २४३ एवढी झाली आहे. पणजी परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.