आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २५० खाटांचे नवीन कोविड इस्पितळ येत्या शुक्रवारपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राणे यांनी मडगावातील नवीन कोविड इस्पितळावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. मडगावच्या कोविड इस्पितळात गोमेकॉ आणि आरोग्य खात्यातील डॉक्टर व कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
या इस्पितळासाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यांचा वापर गंभीर कोरोना रुग्णांना गोमेकॉ किंवा कोविड ईएसआय इस्पितळात हालविण्यासाठी वापर केला जाणार आहे. इस्पितळातील खाटांच्या कमतरतेमुळे तातडीची गरज नसलेल्या शस्त्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिसियोचे पुन्हा जिल्हा इस्पितळात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणार्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना नॉन कोविड विभागात नियुक्त केले जाणार असून येथील प्रशिक्षित नर्सची कोविड विभागात नियुक्ती केली जाणार आहे.
या बैठकीला आरोग्य सचिव नीला मोहनन, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. गीता काकोडकर, डॉ. दीपा कोरय्या, डॉ. सुनंदा आमोणकर, डॉ. राजेश पाटील, डॉ. मोहनदास पेडणेकर यांची उपस्थिती होती.
व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेमुळेच बळी ः ढवळीकर
व्हेंटिलेटर व एचएफसीएनओ-२ या सेमी व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेमुळेच राज्यात कोविड रुग्णांचे बळी जात आहेत असे आमदार सुदिन ढवळीक यांनी सांगितले. हे व्हेंटिलेटर्स जर सरकारने लगेच आणले तर सर्व कोविड रुग्णांचे प्राण वाचतील असे दै. नवप्रभाशी बोलताना आमदार ढवळीकर म्हणाले. यावेळी त्यांनी कोविड मुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.