भाजणे ः लक्षणे, कारणे, उपचार

0
599

डॉ. सूरज स. पाटलेकर
अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय

अंगाला गरम वाफेचा स्पर्श होणे अधिक घातक आहे. जेथे संपर्क होतो तेथे इजा होतेच आणि तीव्रता जास्त असल्याने शरीरात खूप खोलवर ती जाते व आतील शरीरावयवांना नुकसान पोहोचवते. म्हणूनच स्वयंपाकघरात काम करणार्‍या बायकांनी प्रेशरकुकर हाताळताना विशेष काळजी घ्यावी.

प्रत्येकाला पूर्ण आयुष्यात कधी ना कधी चटके हे बसलेच असतील. आता येथे हे चटके मनावरचे न घेता, शरीरावरचे (बाहेरील व आतील बाजूचे) असाच अर्थ घेऊया. यांच्यामुळे किरकोळ जखमा, त्वचा कुरूप दिसणे, अपंगत्व किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. जगात दरवर्षी कोट्यांनी लोक याचे बळी पडतात. आधुनिक शास्त्रात ह्याला बर्न असे म्हटले जाते.
त्वचा ही नेहमीच शरीराला विद्युत प्रवाहापासून (इलेक्ट्रिक करंट फ्लो) एक प्रकारचा अडथळा निर्माण करून इन्सुलेटर (विद्युतरोधक) प्रमाणे बचाव करत असते व तीच त्वचा ज्यावेळी नष्ट होते तेव्हा त्याचे परिणामही तेवढेच भयानक होतात.

ह्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. त्यातीलच काही आहेत – १) जे सामान्यतः कोरड्या उष्णतेमुळे (ड्राय हीट) होते. जसे की आग, गरम धातू – इस्त्री लागल्याने इ., बॉम्बस्फोट, भाजल्याने (रोस्ट- भट्टी/पापड इ. भाजत असताना, बेक -ओवनमध्ये केक इ., ग्रिलिंग – बार्बेक्यु इ., रॉटिसेरी – फिरत्या सळईवर भाजणे) यासारखे.

२) स्काल्ड्स – उष्ण द्रव्याने जो घाव होतो. बॉॅयलिंग- उकळणे (शॉवरचे गरम पाणी, गरम तेल, गरम चहा ई.), सॉटिंग- तळणे, फ्राय – डिप/ शॅलो/ पॅन/ स्टीर, सीयरिंग इ. करत असताना अंगावर हे द्रव/गॅस/वाफ पडल्याने, फटाक्यांच्या आतषबाजीच्या वेळेस अंगावर ज्वाला पडल्याने होते. हा थर्मल बर्नचाच एक प्रकार.

  • गरम पाणी जेव्हा अंगावर पडते तेव्हा शरीराच्या ज्या भागावर ते पडते तेथे निश्चितच मार बसतो पण ते पाणी पातळ व वाहते असल्याकारणाने त्याचे तापमान कमी-कमी होत जाते आणि जास्त आत प्रवेश करत नाही (वरचेवर असते). तुलनेत अंगाला गरम वाफेचा स्पर्श होणे अधिक घातक आहे. जेथे संपर्क होतो तेथे इजा होतेच आणि तीव्रता जास्त असल्याने शरीरात खूप खोलवर ती जाते व आतील शरीरावयांना नुकसान पोहोचवते. म्हणूनच स्वयंपाकघरात काम करणार्‍या बायकांनी प्रेशरकुकर हाताळताना विशेष काळजी घ्यावी.

३) इलेक्ट्रिक/विद्युत – यामध्ये लो-व्होल्टेज (कमी दाब/६०० व्होल्ट्सपेक्षा कमी)मुळे जेथे स्पर्श होईल तेथील त्वचा व त्वचेखालील भाग प्रभावित होतो. स्नायू व हाडे यांना क्वचितच मार बसतो. पण शक्यता मात्र असते.

  • तर हाय-व्होल्टेज (उच्च दाब/६०० व्होल्ट्सपेक्षा जास्त)मुळे जेथे स्पर्श होईल तेथील भागाला तर मार बसतोच, त्याशिवाय शरीरामध्ये विजेचे वहन करणारे टिश्यू/मेदयुक्त जे भाग असतात त्यांनासुद्धा इजा पोहोचते. मेंदू, हृदय (कार्डिऍक अरेस्ट, कार्डिऍक अरिदमिया), हाडे (फ्रॅक्चर, डिस्लोकेशन) व इतर अवयवानादेखील मार बसतो. यामध्ये आतील झालेले नुकसान बाहेरून दिसून येत नाही. किती वेळासाठी संपर्क झाला हेपण तेवढेच महत्त्वाचे ठरते व त्यानुसार नुकसान होते. वीज याचाच एक प्रकार जो सर्वांत घातक आहे.
  • मुखातील भाजण्याच्या प्रकारात विद्युत प्रवाह असलेला दोरखंड (वायर) मुखाशी संपर्क आल्याने मुखात मार बसतो (आपण ज्यावेळी वायर आपल्या दाताने तासत असतो त्यावेळी काळजी घेतली गेली पाहिजे). हा प्रवाह मुखातून एका भागातुन दुसर्‍या भागामध्ये जाऊन विकृती उत्पन्न करतो.
  • फ्लेम बर्न हा अशा वस्तूंशी संपर्कात आल्याने होतो जे विद्युत स्रोताने प्रज्वलित (ईलेक्ट्रिकल सोर्स) होतात. असेच अजूनही बरेच प्रकार आहेत.

त्वचेला २ जागी स्पर्श होत असतो. पहिला जेथे त्या विद्युतचा स्पर्श होतो आणि दुसरा जेथून तो प्रवाह शरीराच्या बाहेर निघतो (जमिनीच्या लागत). स्नायू (मसल), मज्जातंतू (नर्व्ह), रक्तवाहिन्या (ब्लड व्हेसल्स) यांचा प्रतिकार कमी असतो म्हणून जास्त बाधित होतात. विद्युतने स्नायूला झालेल्या नुकसानामुळे लघवीला पोर्ट वाईनचा लालसर रंग येतो.

४) केमिकल बर्न (रासायनिक) : हे जवळपास २५,००० पेक्षा जास्त प्रकारच्या पदार्थांनी होऊ शकते. त्यामधील बहुतांश हे आम्लारी/ बेस (५५%) किंवा आम्ल/ऍसिड(२६%) असतात. टॉयलेट क्लीनर (शौचालय साफ करण्यासाठी वापरले जाणारे द्रव्य) मधील सल्फ्युरिक ऍसिड; ब्लिचिंग पावडरमधले सोडिअम हायपोक्लोराईट; पेंट रिमूव्हर (रंग काढण्यासाठी वापरतात ते)मधील हॅलोजीनेटेड हायड्रोकार्बन्ससारखे अनेक जे आपल्या दैनंदिन वापरात येतात.. त्याने शरीराला इजा होऊ शकते. त्याचे परिणाम हे त्या द्रव्याचे वापरण्यात आलेले प्रमाण, द्रव्यातील रसायनाचे प्रमाण, त्वचेशी किती वेळ संपर्क झाला ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

५) रेडिएशन बर्न (विकिरण/उत्सर्जित किरण) : अल्ट्राव्हॅायलेट रे/लाइट (सूर्यप्रकाश, टॅनिंग बूथ, आर्क वेल्डिंग) किंवा चिकित्सा देताना/व्याधीचे निदान करत असताना (रेडिएशन थेरपी, क्ष-किरण सारखे) यांच्या संपर्कात आल्याने होते. शक्यतो यांचा अति प्रमाणात संपर्कच कारणीभूत ठरत असतो. केस गळणे, त्वचा लालसर होणे, त्वचेची साल निघणे, सूज येणे, नेक्रोसीस (पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होणे) ह्या गोष्टी संपर्कात आल्यानंतर दिसून येतात. मायक्रोव्हेव ओवेन जे जेवण गरम करण्यासाठी वापरतो त्यातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे देखील दुष्परिणाम शरीरावर होत असतात.

६) कोल्ड बर्न – हे त्वचा अतिप्रमाणात थंड गोष्टींच्या संपर्कात आल्याने होते. हे सनबर्न (सूर्यप्रकाशामुळे)च्या सदृशच दिसते. त्वचा लाल, पिवळसर, पांढरी किंवा निळ्या रंगाची होते. त्वचा सुन्न/संवेदनशुन्य /बधीर होते, खाज सुटते, मुंग्या चालल्यासारखे/आल्यासारखे वाटणे, दुखणे, फोड येणे, त्वचा मध्येच घट्ट होणे. बर्फाळ किंवा थंडगार प्रदेशात राहणे, जास्त वेगवान वार्‍याच्या संपर्कात येणे हेसुद्धा कारण होते. त्वचेतील पेशीमधील पाण्याचा बर्फ होतो व त्वचेची रचना बिघडते, रक्तप्रवाह कमी होतो (रक्त गोठल्याने). फ्रॉस्ट बाइटमध्ये हे सर्व होते. चिल्डब्लेन (एकच जागा संपर्कात राहिल्याने जसे की कान व पायाच्या बोटाची त्वचा, श्लेष्मल त्वचा लाल होते/ईरीथिमा).

  • ट्रेंच फूट हे थंडगार प्रदेशात देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना सतत पाय बुटामध्ये राहिल्याने, अतिशीतपाण्यात चालल्याने, घट्ट कपडे घातल्याने, रक्तपुरवठा कमी असल्याकारणाने होतो.
  • इमर्शन फूटमध्ये ट्रेंच फूट प्रमाणेच लक्षणे असतात व त्याचाच एक प्रकार आहे पण गारठत नाहीत. यात गॅन्ग्रीन व इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. होडीत जास्त काळ व्यतीत केलेल्यानां हे होते.